Thursday 12 June 2014

तत्त्वभान १२ भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती ! २० मार्च २०१४

Debiprasad.jpg
देबीप्रसाद चट्टोपाध्याय
 (१९१८-१९९३)



भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती!

श्रीनिवास हेमाडे
भारतीय विज्ञान किंवा वैज्ञानिक पद्धती असे शब्द उच्चारताच आश्चर्य वा शंका या प्रतिक्रिया येऊ शकतात. विज्ञानमूलक विचार अस्फुट रूपात असणे आणि त्या विचारांची प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धती बनणे, हा भारतीय आणि पाश्चात्त्य विज्ञानाच्या वाटचालींतील फरक आहे. तो का आहे, हेही समजून घेतले पाहिजे..

         आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात चर्चा करताना 'विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती ही केवळ ग्रीक-पाश्चात्त्यांची, देन आहे', असा एक सामान्य समज आहे. त्यात तथ्यही आहे, परंतु 'निसर्गातील आंधळ्या शक्ती सोडल्या तर जगात चलनवलन करणारे असे काही नाही की त्याचा उगम ग्रीसमध्ये नाही', अशी दर्पोक्ती सर हेन्री मेन (१८२२-१८८८) या ब्रिटिश इतिहासकाराने केली. यातून युरोपियनांचा अहंकार दिसतो. कारण ज्याला भारतीय दर्शन परंपरेचा योग्य परिचय आहे, त्या अभ्यासकाला हा दावा उद्दाम व हास्यास्पद आहे, हे लक्षात येऊ शकते. 
       मानवी संस्कृतीत वस्तुत: प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीक परंपरा या दोनच स्वायत्त व अस्सल तात्त्विक परंपरा आहेत. या दोन संस्कृतींमध्ये इतर कोणत्याही मानवी संस्कृतीपेक्षा जास्त असे काही तरी आहे. विश्व व मानव यांचे नाते आणि मानवी जगाची विविध प्रकारची रचना करताना त्यात समाविष्ट असणाऱ्या अनेक घटकांची संकल्पनात्मक, तार्किक मांडणी करून त्यातील योग्य ते घेणे व कालबाह्य़ ते टाकून देणे, या कृतींद्वारे तत्त्वज्ञान निर्माण करणे, त्याचे तर्कशास्त्र रचणे, हे तत्त्वज्ञानात्मक कार्य केवळ या दोन संस्कृतींमध्ये घडले आहे. पण भारतीय आणि ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेतील फरक असा की, भारतीय परंपरा कुंठित झाली आणि पाश्चात्त्य परंपरा प्रवाही, गतिमान राहिली. जिला 'आधुनिकता' (मॉडर्निटी) असे नाव दिले जाते तिची निर्मिती युरोपीय-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाने केली आहे आणि आपण भारतीय या अर्थाने आज आधुनिक आहोत. विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती ही आधुनिकता आहे. भारतीय संस्कृती व दर्शन परंपरा प्राचीन असल्याने भारतातही प्राचीन काळापासून वैश्विक विज्ञान व वैज्ञानिक पद्धती होती, असा दावा केला जातो. पण ज्या सांस्कृतिक अभिसरणाने पाश्चात्त्य विज्ञान व वैज्ञानिक पद्धती सर्वमान्य झाली, तशी भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती का होऊ शकली नाही, याचा शोध घेणे आवश्यक आहे. आणि असा प्रयत्न चालू आहे. देबीप्रसाद चट्टोपाध्याय (१९१८-१९९३) या भारतीय तत्त्ववेत्त्याच्या मते भारतीय दर्शन परंपरेत एक अतिशय बलशाली भौतिकवादी विज्ञानवादी विचार होताच, पण विज्ञान परंपरा होती. त्यांच्या मते आयुर्वेद म्हणजे चरकसंहिता हाच केवळ एकमेव प्राचीन ग्रंथ असा आहे, की जो खऱ्या अर्थाने इहवादी आणि आधुनिक अर्थाने ज्यास विज्ञान म्हणता येईल, अशा क्षमतांचा आहे. देबीप्रसाद यांनी प्राचीन भारतीय विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती या विषयासाठी सारे आयुष्यच वाहून घेतले. या संदर्भातील 'लोकायत' आणि 'सायन्स अ‍ॅण्ड सोसायटी इन एन्शंट इंडिया' ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. तथापि त्यांच्या मते वर्ण-जाती-िलग भेदभाव हाच विज्ञान विकासातील मुख्य अडथळा ठरला. 'व्हॉट इज लिव्हिंग अ‍ॅण्ड व्हॉट इज डेड इन इंडियन फिलॉसॉफी' या त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, 'भारताच्या विद्यमान तात्त्विक गरजा समोर ठेवून आपल्या दार्शनिक परंपरांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे' आणि 'आपल्या विद्यमान तात्त्विक गरजा म्हणजे इहवाद, बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा.' 
        देबीप्रसाद यांचे मत लक्षात घेता प्राचीन भारत म्हणजे विद्यमान नकाशात दिसणारा भारत असा नसून भारतीय उपखंड असे समजणे योग्य आहे. अश्मयुगीन काळापासून भारतीय उपखंडात जीवन जगण्याची रीत म्हणून काही एक विज्ञान होतेच. मेहेरगढ(आता पाकिस्तानात)पासून मानवी वस्ती आढळते, याचा अर्थ काहीएक निश्चित विज्ञान होते. बौधायन, आपस्तंभ, लगद, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, कणाद, वराहमिहिर, नागार्जुन, सुश्रुत, चरक, पतंजली, लल्ला गोिवदस्वामी, गणेशोपाध्याय, पक्षधर, नारायण पंडित नीलकंठ ते श्रीनिवास रामानुजन, श्रीराम अभ्यंकर, वसिष्ठ नारायण सेठ, दिवाकर विश्वनाथ, रामन, नरेंद्र करमरकर, जगदीशचंद्र बोस, सी. चंद्रशेखर, प्रसंतचंद्र महालनोबीस, डी. के. रायचौधरी, शकुंतलादेवी, जयंत नारळीकर, यशपाल यांच्यापर्यंत विज्ञान विचाराची परंपरा आहेच. व्याकरण, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशात्र, अर्थशास्त्र, एवढेच काय पण कामशास्त्रही प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे. पण या साऱ्यांमधून विज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, वैज्ञानिक पद्धती अशी ज्ञानरचना विकसित झाली आहे, असे दिसत नाही. शिवाय भारतात िहदू, बौद्ध, जैन हे तीन प्राचीन आणि शीख हा अर्वाचीन धर्म मिळून चार धर्म आहेत. त्यांची प्रत्येकाची स्वतंत्र धार्मिक अधिसत्ता आहे. तिचा प्रभाव सर्वाधिक आहे. 
       विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत विज्ञान शिकविले जाते म्हणजे सिद्धांत शिकविले जातात; पण वैज्ञानिक दृष्टी दिली जात नाही. प्रत्येक भारतीय नागरिकात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, हे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार (विभाग ४ अ, कलम ५१ अ) सरकारी धोरणांचे कर्तव्य आहे. वैज्ञानिक पद्धती प्रश्न विचारण्यापासून सुरू होते, पण आपली परीक्षा पद्धती मुलांचे प्रश्न विचारणे बंद करून टाकते. पाठांतरावर भर देणारे पोपट तयार करणे, हे शालेय पोपटविज्ञान शिक्षण व्यवस्था आणि पालक मंडळीही पाळतात. 
      भारतात विज्ञान व वैज्ञानिक पद्धती या संज्ञा भावनिक व धार्मिक अर्थाने येतात. उदाहरणार्थ, बौद्ध दर्शनात विज्ञान शब्द येतो, हा आधुनिक अर्थ नाही. त्याचा अर्थ मानवी जाणीव. पण यात वैज्ञानिक पद्धतीही उपलब्ध आहे, असाही काही जणांचा दावा आहे. (वालपोला राहुला, पॉल डेमीविल - व्हॉट बुद्धा टॉट १९७४ - Walpola Ra¯hula, Paul Demie´ville : What the Buddha Taught). आता हेही खरे आहे की, रसेल, आइनस्टाइन, ओपेनहायमर, नील्स बोर या सारख्या दिग्गजांनी बौद्ध तात्त्विक विचारात वैज्ञानिक विचाराची बीजे शोधली, पण 'बौद्ध विचार हे आधुनिक अर्थाने विज्ञान आहे' असे त्यांनी म्हटलेले नाही. विपश्यना गुरू सत्यनारायण गोएंकासुद्धा यात विज्ञान शोधतात, पण ते कोणत्या अर्थाने हे तपासले पाहिजे, असे करणे हीच वैज्ञानिक दृष्टी आहे. 
      योगविद्या हे विज्ञान आहे, असा योग शिक्षकांचा आणि योग व निसर्गोपचार केंद्र मालकांचा आवडता सिद्धांत आहे. पण योग हे परंपरेनुसार भारतीय मानसशास्त्र समजले जाते, तरीही पाश्चात्त्य मानसशास्त्र ज्या रीतीचे मानसशास्त्र आहे तसे ते विज्ञान नाही. विज्ञानमूलक विचार अस्फुट रूपात असणे आणि त्या विचारांची प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धती बनणे यात फरक आहे. विज्ञानाच्या जवळ जाणारा अथवा विज्ञानाची बीजे असणारा विचार असणे आणि वैज्ञानिक पद्धती बनविणारा अस्सल वैज्ञानिक विचार असणे, या संकल्पनांमध्ये फरक केला पाहिजे. म्हणूनच पाश्चात्त्य विज्ञान तत्त्ववेत्त्यांनी मिथ्या विज्ञान आणि अस्सल विज्ञान असा फरक केला. गेल्या काही दशकांपासून भारतीय परंपरेचे पुनर्मूल्यांकन होत आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच्या राजकीय व सामाजिक सुधारणांपेक्षा हे पुनर्मूल्यांकन वेगळ्या रीतीचे व भिन्न उद्दिष्टांचे आहे. परंपरेचे पुनर्मूल्यांकन नेहमीच तात्त्विक असावे लागते, त्यानुसार इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च या संस्थेने संशोधन प्रकल्प राबविला आहे. देबीप्रसादांच्याच संपादनाखाली आयसीपीआरतर्फे 'हिस्ट्री ऑफ सायन्स, फिलॉसॉफी अ‍ॅण्ड कल्चर इन इंडियन सिव्हिलायझेशन' हा ५० खंडांचा प्रकल्प भारत सरकारने राबविला आहे. यातील काही खंड केवळ भारतीय विज्ञान व वैज्ञानिक पद्धती या विषयावरील आहेत.

No comments:

Post a Comment