Friday 27 June 2014

तत्त्वभान २६ सत्ताशास्त्र ... सत्य म्हणजे ? २६ जून २०१४

सत्ताशास्त्र ... सत्य म्हणजे ? 

श्रीनिवास हेमाडे

विस्मयचकित करणारे विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे 'नासदीय सूक्त' (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले; तिथे शिष्याच्या पात्रतेच्या गाळणीमुळे पुरुषसूक्तातील वर्णव्यवस्थेची अवैज्ञानिक उत्पत्ति स्पष्ट करणारे श्लोक हेच सामाजिक सत्य मानले गेले. आणि येथे वर्णजातलिंग हे उपमुद्दे महत्वाचे ठरले.

       "मग सांग तर, सत्य म्हणजे काय ?" पायलेटने प्रश्न विचारला आणि उत्तरासाठी तो प्रभूपुत्र येशूकडे पाहू लागला. येशू नि:शब्द.हा प्रसंग आहे येशूच्या शिक्षेचा. न्यायनिवाडा करतो तो तत्कालीन रोमन सम्राट टीबेरियस याचा सुभेदार पाँटीअस पायलेट. येशूने दिलेल्या उत्तरावर त्याने केवळ खांदे उडवून येशूचा आणि त्याच्या उत्तराचा उपहास केला. पायलेटचा प्रश्न तात्त्विक असून त्याचे वैशिष्ट्य हे की एका धुरंधर शासकाने तो उपस्थित केला. कुठलाही राजकारणी अशा तऱ्हेचा तात्त्विक प्रश्न; तोही थेट सत्याविषयी कधी उपस्थित करीत नसतो. 
         सत्य म्हणजे जे आहे, असतेच, "जे नाही, असे म्हणता येत नाही" असे. सत्याचे असणे म्हणजे सत्तावत्, सत्तावान असणे. 'सत्' पासून 'सत्ता' शब्द होतो. म्हणून सत्य हीच सत्ता. अस्तित्व हा सत्य या शब्दाचा समांतर शब्द मानला गेला. या सत्तेच्या ज्ञानाची सुव्यस्थित रचना करणे, याचा अर्थ सत्ताशास्त्र रचणे.पाश्चात्य परंपरेत सत्ताशास्त्राला Metaphysics (मेटॅफिजिक्स) अशी संज्ञा आहे. ती ऱ्होडचा अँड्रोनिकस (इ.स.पू.६०) या पंडित ग्रंथपालाने प्रचारात आणली. स्वतः ॲरिस्टॉटल मेटॅफिजिक्सचा उल्लेख 'आदितत्त्वज्ञान' (The First Philosophy), 'प्रज्ञान' (Wisdom), ईश्वरविद्या असा करतो. 
       Metaphysics या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून संस्कृत, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अतिभौतिकी, अस्तित्वशास्त्र, तत्त्वमीमांसा, अध्यात्मशास्त्र, सत्ताशास्त्र, सद्वस्तूशास्त्र या संज्ञा मराठीत उपयोगात आणल्या जातात. यातील अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र या विषयी भारतीय मनाचे बरेच स्वतंत्र समज-गैरसमज आहेत. 
        सत्ताशास्त्र ज्यांना सत्य मानते ते दोन प्रकारचे आहे. पहिला प्रकार हा निसर्ग नियम आणि सामाजिक नियमरुपी तत्त्वांचा आहे. दुसरा प्रकार जग, माणूस आणि त्यांचा परस्पर संबंध यांचा आणि त्या संबंधातून व्यक्त होणाऱ्या, पण निसर्गाचा व समाजाचा घटक नसणाऱ्या तत्त्वांचा आहे. त्यांना परतत्त्वे म्हणता येईल. ही सारी तत्त्वे म्हणजे अमूर्त संकल्पना असतात. या सर्वांचा अभ्यास, चिकित्सा हा सत्ताशास्त्राचा विषय आहे. सत्ताशास्त्र तीन सत्ता स्वीकारते: (१) अनुभवास येणारे जग आणि माणसासह सर्व प्राणिजात (२) अमूर्त संकल्पना आणि (३) परतत्त्वे. या तत्त्वांना मान्यता दिली, त्यांचे अस्तित्व स्वीकारले किंवा नाकारले तर काय होईल ? या संकल्पनांना, परतत्त्वांना खरेच अस्तित्व आहे काय? त्यांच्या असण्या-नसण्याचा समाजावर परिणाम काय होईल ? यांचा अभ्यास सत्ताशास्त्र करू पाहते आणि निष्कर्ष मांडते. 
       अनुभवास येणारे जग निसर्ग नियमाने चालते. ते नियम म्हणजे काही मुलभूत भौतिकतत्त्वे असतात. त्यांना गृहीत धरले तरच निसर्ग अभ्यासता येतो, विज्ञान शक्य होते. उदाहरणार्थ, निसर्गात कार्यकारणसंबंध असतो; असे पदार्थ विज्ञान गृहीत धरते. प्रत्येक विज्ञानाची अशी गृहीतकृत्ये असतात आणि त्याप्रमाणे आपल्या विषयाचे वर्णन करण्यासाठी त्यांचा उपयोग ते करीत असते. किंबहुना त्यांचा उपयोग केल्याशिवाय कशाचेही वर्णन करणे, त्याच्याविषयी विधाने करणे अशक्य असते. अशा मूलभूत संकल्पना म्हणजे 'वस्तु' किंवा 'सत्', 'वस्तूप्रकार', 'द्रव्य-गुण', 'कार्यकारणभाव, 'संबंध', 'अवकाश' किंवा 'दिशा', 'काल', 'संख्या' इत्यादी. व्यवहारातील विधाने व वैज्ञानिक विधाने यांना आधारभूत असलेल्या या संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचे आशय, परस्परसंबंध स्पष्ट करणे हे काम कोणतेही विशिष्ट विज्ञान करीत नाही. जसे की 'कार्यकारणसंबंध सत्य आहे काय?' किंवा 'कार्यकारणसंबंध सत्य आहे असे मानायला काय आधार आहे?' असे प्रश्न विज्ञान उपस्थित करीत नाही. हे प्रश्न त्या विज्ञानातील प्रश्न नसतात, तर त्या विज्ञानाविषयीचे प्रश्न असतात. पण स्वतः ते विज्ञान हे प्रश्न सोडवीत नाही. पण ते सोडविले, त्यांची चर्चा, चिकित्सा केली तरच विज्ञान शक्य होते. तेंव्हा अशा सर्व विशिष्ट विज्ञानांना आणि ज्ञानशाखांना आधारभूत असलेल्या गृहीतकृत्यांची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजे तत्त्वमीमांसा. 
       आता, समाज जीवन जगताना माणूस समाज, राज्य, कुटुंब, प्रेम, ज्ञान, आदर्श इत्यादी आणि स्व/ आत्म, (Self), मन, आत्मा (Soul), चैतन्य (Spirit) या संकल्पना वापरतो. विश्वाबद्दल विचार करताना अस्तित्व म्हणजे काय ? त्याचे मुलभूत घटक कोणते आणि त्याचे गुणधर्म कोणते ? हे प्रश्न विचारतो. माणसाचे विश्वाशी काय नाते आहे, हे शोधताना आणि भौतिक जगात कार्यकारण संबंध आढळल्याने या विश्वाचे कारण म्हणून तो धर्म, ईश्वर, परमात्मा, अंतिम सत्य (Ultimate Reality)अशा संकल्पना निर्माण करतो. या साऱ्या संकल्पनांना तो 'सत्य (Real) समजतो. 
      ही तत्त्वे स्वीकारली की चिद्वाद, नाकारली की जडवाद आणि तटस्थ राहिले की अज्ञेयवाद या विचारसरणी निर्माण होतात. ईश्वरवाद, निरीश्वरवाद यातूनच येतात. ईश्वर मानला की मग तो पुरुष की स्त्री की निर्लिंग की उभयलिंग किं बहुलिंगीय ? हे प्रश्न आलेच. सत्ताशास्त्र केवळ अस्तिकांचेच असते असे नव्हे, तर तुम्ही नास्तिक असला तरी तुम्हाला तुमचे नास्तिक सत्ताशास्त्र निर्माण करावे लागते. जसे की, लोकायतांनी इहलोकाचे सत्ताशास्त्र मांडले, हे लक्षात घेतले पाहिजे. 
     सत्य म्हणजे काय ? हा प्रश्न आणि सामाजिक न्याय-अन्याय, शोषण, विषमता यांचा संबंध काय ? असा प्रश्न विचारू. त्याचे इतिहास देतो ते उत्तर असे : परत्त्वांचे ज्ञान ही सर्व समाजाचा हक्क नाही, तो केवळ पात्र शिष्यांना लाभणारा दुर्मिळ हक्क आहे. हे सर्व संस्कृती मान्य करतात आणि येथून विषमतेची बीजे पेरली जातात. भारतात हे अधिक ठळकपणे, जोमदारपणे आणि निर्दयतेने मांडले गेले. वैदिक सत्य म्हणजे केवल ब्रह्म. या ब्रह्मसत्याचे मुख सुवर्णपात्राने झाकलेले आहे, (हिरण्यमये पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् – ईशोपनिषद १५.) ही संकल्पना शिष्याच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित करते. 
      उपनिषद या संज्ञेचा अर्थ "गुरूच्या सान्निध्यात खासगी बैठकीत केलेला गुप्त उपदेश' असा आहे. उपनिषद ग्रंथांमधील उपदेश गुप्त मानल्यामुळे अनधिकारी व्यक्तींकडून त्याचा विपरीत अर्थ लावला जाईल किंवा त्याचा दुरुपयोग होईल म्हणून त्यांच्यापर्यंत तो जाऊ नये, याबाबत विशेष दक्षत घेतली गेली. कठोपनिषदात नचिकेतसच्या बुद्धीची शुद्धता आणि सामर्थ्य यांची कसोटी घेतल्यानंतरच यम त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. साहजिकच तिथे पात्रतेचा मुद्दा, निकष लागू झाला. पात्रापात्रतेचा विचार न करता सर्वांना अंतिम सत्याचे ध्यान देण्याची अनिच्छा केवळ भारतातच होती, असे नाही तर ती सर्वच प्राचीन मानवांमध्ये होती. उदाहरणार्थ "ज्यांना सोने हवे असेल त्यांनी त्यासाठी खणण्याचे श्रम केले पाहिजेत, नाहीपेक्षा त्यांनी तृणांवरच समाधान मानले पाहिजे" असे प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लीटस म्हणतो, असे असे एम. हिरीयण्णा हे तत्त्ववेत्ते नमूद करतात. 
     चार्वाकांचा वगळता सर्व दर्शनांच्या अध्यात्मशास्त्रांनी शोषणाचा पाया रचला. ब्रह्म सत्य असो वा नसो पण भौतिक जगाचे ज्ञान सुद्धा मक्तेदारी बनली. परिणामी आजच्या राजकारणाला 'केवल धर्म-वर्णजातीयवादाचे स्वरूप' लाभले, हेच सत्य समोर उभे ठाकलेले आहे. "सत्य मेव जयते नानृतम / सत्येन पन्था विततो देवयानः" या वचनातील 'सत्य', क्रूसस्थ येशुप्रमाणे केवळ अशोक स्तंभाचे मानकरी ठरले आहे ! 


















No comments:

Post a Comment