Monday 9 June 2014

तत्त्वभान ०७ सॉक्रेटिसचा प्रभाव १३ फेब्रुवारी २०१४

सॉक्रेटिसचा प्रभाव
श्रीनिवास हेमाडे

 तत्त्वज्ञानाचा मूलशोध घेण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न सॉक्रेटिसने विचारले. ती पद्धत आजही महत्त्वाची मानली जाते आणि सॉक्रेटिस त्यासाठी ओळखला जातो. त्याच्या पद्धतीचा प्रभाव केवळ तत्त्वज्ञानाच्या नव्हे, तर साहित्याच्या क्षेत्रातही दिसत राहिला, त्या प्रभावाची ही ओळख..


       'तत्त्वज्ञानाचा संत' मानला गेलेला सॉक्रेटिस (इ.स.पू. ४६९ ते ३९९) हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता ग्रीक-पाश्चात्त्य तात्त्विक परंपरेचा मुकुटमणी मानला जातो. त्याची माहिती त्याचा सर्वोत्तम शिष्य प्लेटो आणि झेनोफोन, अ‍ॅरिस्टोफोनिस, अ‍ॅरिस्टॉटल यांच्या लेखनातून मिळते. सॉक्रेटिस या ग्रीक नावाचा अर्थ 'सुरक्षित एकात्म सामथ्र्य' असा होतो. 
         सॉक्रेटिसच्या काळात अथेन्समध्ये लोकशाहीवादी व महाजनवादी यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता. चर्चा-संवादांच्या माध्यमातून सॉक्रेटिसने मांडलेले तत्त्वज्ञान ही या नतिकतेच्या ऱ्हासावरची एक प्रतिक्रिया होती. जिथे काही माणसे जमलेली असतील, गप्पाटप्पा चाललेल्या असतील, अशा बाजारपेठेसारख्या सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: जिथे तरुणवर्ग असेल ठिकाणी जाऊन सॉक्रेटिस प्रश्नोत्तरे करीत असे. आपल्याला ज्ञान नाही, पण ज्यांच्यापाशी ते आहे, त्यांच्याकडून आपल्याला ते शिकायचे आहे, अशी भूमिका घेऊन तो लोकांशी संवाद साधे. त्याची पद्धती अशी- 'न्याय म्हणजे काय?', 'धैर्य म्हणजे काय?' असे नतिक मूल्यांच्या किंवा संकल्पनांच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न तो उपस्थित करी. समजा, 'न्याय म्हणजे काय?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून एखाद्याने न्याय्य असलेल्या एका विशिष्ट कृत्याचा उल्लेख करून 'असे कृत्य करणे म्हणजे न्यायाने वागणे,' अशा स्वरूपाचे उत्तर दिले तर त्या उत्तरावर सॉक्रेटिस एक लहानशी शंका काढी, तिचे उत्तर त्याला मिळे. त्याच्यावर तो आणखी एक लहानशी शंका घेई.. जसे की- 'एखाद्याची उसनी घेतलेली वस्तू परत करण्यात न्याय असतो.' पण या प्रकारच्या उत्तराने सॉक्रेटिसचे समाधान होत नसे. एखादे विशिष्ट कृत्य जर न्याय्य असेल, तर ते न्याय्य का आहे, याचे उत्तर त्याला पाहिजे असे. म्हणजे कोणते विशिष्ट गुण अंगी असले तर आणि तरच कोणतेही कृत्य न्याय्य असते, हा त्याचा प्रश्न होता. त्याला 'न्याय', 'धैर्य', 'श्रद्धा' इ. नतिक संकल्पनांच्या सामान्य आणि सुस्पष्ट व्याख्या पाहिजे होत्या. उदा., 'धर्य म्हणजे नेमके काय,' असा प्रश्न तो विचारी. त्यावर ज्यांना निश्चितपणे धर्याची म्हणता येतील अशी कृत्ये सांगून त्यांच्या आधारे उत्तर देणारा श्रोता धर्याची एक व्याख्या करी; पण त्यावर ज्यांना धर्याची कृत्ये असे निश्चितपणे म्हणता येणार नाही, अशी काही कृत्येही त्या व्याख्येत बसतात, असे सॉक्रेटिस दाखवून देई. साहजिकच तो श्रोता आपल्या व्याख्येला योग्य ती मुरड घाली; पण ही सुधारित व्याख्याही अडचणी निर्माण करते, असे जेव्हा सॉक्रेटिस दाखवून देई, तेव्हा त्याही व्याख्येला मुरड घालावी लागे किंवा नवीन व्याख्या करावी लागे. अखेर 'धैर्य' या संकल्पनेबाबत आपल्या मनात गोंधळ आहे, हे श्रोत्याच्या लक्षात येई. मानवी जीवन सफल करणारी काही वस्तुनिष्ठ मूल्ये आहेत. त्यांचे ज्ञान होऊ शकते, अशी त्याची धारणा होती; पण त्यासाठी मन पूर्वग्रहदूषित असता कामा नये आणि स्वत:च्या मताची व इतरांच्या मतांची आपण चिकित्सक दृष्टिकोनातून परीक्षा केली पाहिजे, असा चिकित्सक विचार करावयाला लोकांना प्रवृत्त करणे, हे सॉक्रेटिसचे जीवितकार्य होते. यासाठी हे ज्ञान आपल्याला अगोदरच अवगत आहे, हा लोकांच्या मनात घर करून राहिलेला भ्रम दूर करणे आवश्यक होते. हे साध्य करण्यासाठी त्याने उपरोधाचा म्हणजे श्रोत्यांच्या उलटतपासणीचा प्रयोग केला. ज्या लोकांना एखाद्या मुद्दय़ावर चर्चा करायची आहे त्या मुद्दय़ाची त्यांच्यापाशीच कितपत एकवाक्यता आहे हे सॉक्रेटिस पाहत असे. त्यांना त्या मुद्दय़ावर अधिक विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी तो प्रश्न विचारी. ते साधारणत: असे मांडता येतील: 
           १) हे तुम्ही का म्हणताय? २) म्हणजे नक्की काय? ३) हे जे तुम्ही आत्ता म्हणालाय ते आधीच्या मुद्दय़ाशी कसे लागू पडते? ४) या मुद्दय़ाचे स्वरूप नेमके स्पष्ट कराल काय? ५) तुम्हाला आधीच काय काय माहीत आहे? ६) एखादे उदाहरण देऊ शकाल का? ७) आता, तुम्ही हे .. म्हणताय की दुसरेच काही म्हणावयाचे आहे?
            पवित्रता, शहाणपण, दूरदर्शीपणा, धर्य आणि न्याय या नतिक संकल्पना म्हणजे निखळ तात्त्विक आणि अंमळ दुबरेध दुस्तर कोडी बनतात, पण चांगल्या (शुभ) जीवनासाठी ही कोडी सोडविणे भाग असते, असे तो म्हणतो.
           सॉक्रेटिस स्वत:कडे अज्ञानी माणसाची भूमिका घेऊन जे प्रश्नोत्तराचे तंत्र अवलंबित होता, त्यालाच 'सॉक्रेटिसचा उपरोध'- (सॉक्रेटिक आयरनी)- असे म्हटले जाते. सॉक्रेटिसच्या मते, लोकसंवाद हा सामाजिक परीक्षणासाठी असतो तर आत्मसंवाद हा आंतरिक परीक्षणासाठी असतो. योग्य, नतिक दिशेने विचार करणे हा आत्मसंवाद असून आत्म्याचे आरोग्य राखण्याचे ते एकमेव औषध आहे, यावर तो भर देतो. सॉक्रेटिसच्या संवाद पद्धतीतूनच 'सॉक्रेटिसची प्रश्नपद्धती' हा शब्दप्रयोग उपयोगात आला. प्राचीन उपनिषदात अशीच प्रश्नोत्तर पद्धती आढळते. सॉक्रेटिसच्या काळातील लोकशाहीवादी व महाजनवादी यांच्यातील सत्तासंघर्ष आज भारतात आढळतो. 
           सॉक्रेटिसच्या संवाद पद्धतीवर प्राचीन काळापासून नाटके, कथा, चरित्रलेखन, चित्रपट, असे बरेच साहित्य निर्माण झाले. सिसिरो या प्राचीन रोमन राजकारण धुरंधर इतिहासतज्ज्ञाचा 'ऑन कॉमनवेल्थ' हा ग्रंथबोएथियस (इ.स. ४८०-५२५) या तत्त्ववेत्त्याचा द कन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथसंत ऑगस्तीनचे (इ.स. ३५४- ४३०) कन्फेशन हे आत्मचरित्र या पद्धतीने लिहिले गेले. विसाव्या शतकात ओवेन बारफिल्ड (१८९८-१९९७) या तत्त्ववेत्त्याने 'वर्ल्ड्स अपार्ट : अ डायलॉग ऑफ द सिक्स्टीज' हा आठ तज्ज्ञांच्या संवादाचा ग्रंथपीटर क्रिफ्ट या विद्यमान प्राध्यापकाने साहित्यिक सी. एस. ल्युईस, अ‍ॅल्डस हक्सले आणि जे. एफ. केनेडी या (एकाच दिवशी दिवंगत झालेल्या) तिघांच्या काल्पनिक संवादावर आधारलेली 'बिट्विन हेवन अ‍ॅण्ड हेलही कादंबरीजॉन ओस्बोर्न या लेखकाची 'द पेपर चेस' ही कादंबरी यांवर सॉक्रेटिस पद्धतीचा प्रभाव आहे. १९७३ मध्ये 'द पेपर चेस' नावाचा चित्रपट आणि १९७८ ते १९८६ दरम्यान दूरदर्शन मालिकाही प्रदíशत झाली. या चित्रपटानंतरच्या काळात (आणि त्याच्या प्रभावानेसुद्धा) 'युनिव्हर्सटिी ऑफ शिकागो लॉ स्कूल' या संस्थेने सॉक्रेटिसच्या संवादपद्धतीला कायद्याच्या अभ्यासक्रमात अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे. अमेरिकेतील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये 'सॉक्रेटिसची संवाद पद्धती' हा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात अनेक देशांत सॉक्रेटिस मंडळे (सॉक्रेटिक सर्कल्स) सुरू झाली. अमेरिकेत ख्रिस फिलिप या पत्रकार, छायाचित्रकार आणि शिक्षकाने 'सॉक्रेटिक कॅफे' ही संकल्पना राबविली. या नावाचे त्याचे पुस्तक २००१ साली प्रसिद्ध झाले. आज युरोप-अमेरिकेत असे ६०० कॅफे आहेत. पुणे, मुंबई, नागपूर व कोल्हापुरात काही महाविद्यालयांमध्ये प्लेटो क्लब, अ‍ॅरिस्टॉटल क्लब, सॉक्रेटिस क्लब आहेत. 
         आधुनिक प्रयोगशील मराठी नाटककार व कादंबरीकार मकरंद साठे यांचे सॉक्रेटिसच्या जीवनावर व तत्त्वज्ञानावर आधारित सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक विशेष गाजले. मनुभाई पंचोली यांच्या सॉक्रेटिस या कादंबरीचे भाषांतर मृणालिनी देसाई यांनी मराठीत केले आहे. डॉ. नीता पांढरीपांडे यांनी सॉक्रेटिसचे चरित्र लिहिले आहे.



No comments:

Post a Comment