पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या परिचयाचे मार्ग
श्रीनिवास हेमाडे बर्ट्रांड रसेल (१८९७-१९७०) |
दर्शन,
तत्त्वज्ञान आणि Philosophy या तीनही
शब्दांचा उगम,त्यानुसारचा त्यांच्या अर्थातील फरक, त्यांच्या सांस्कृतिक व तात्त्विक
पार्श्वभूमीसह आपण पाहिला आहे. आता, या सदरातील या लेखापासून आपण पाश्चात्य-युरोपीय
विचार विश्वासाठी मराठीत 'तत्त्वज्ञान' हा शब्द Philosophy चे मराठी
भाषांतर म्हणून आणि भारतीय विचारविश्वासाठी मराठीत 'दर्शन' हा संस्कृत शब्द उपयोगात
आणू. दर्शन हा शब्द जास्त आशय व्यक्त करणारा प्रौढ शब्द आहे. त्यामुळे पाश्चात्य
दर्शन अथवा पाश्चात्य दार्शनिक, अरब दार्शनिक असा शब्दप्रयोग करणे जास्त भारदस्त व
आशयसंपन्न बनते. दर्शन शब्दाच्या उपयोजनाने अभारतीय विचारविश्वाचे वेगळे 'दर्शन'
होते.
ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय ही
भौगोलिक विभागणी आहे. ग्रीसमध्ये निर्माण झालेले आणि प्राचीन ग्रीक भाषेत मांडलेले
तत्त्वज्ञान म्हणजे ग्रीक तत्त्वज्ञान. पाश्चात्य देशात निर्माण झालेले आणि आंग्ल (इंग्लिश)
भाषेत मांडलेले (मुख्यत्वे ब्रिटीश)
तत्त्वज्ञान म्हणजे पाश्चात्य तत्त्वज्ञान. युरोप खंडातील विविध देशात निर्माण
झालेले पण केवळ इंग्लिशमध्ये नव्हे तर त्या त्या देशातील (फ्रेंच,जर्मन इ.)
भाषांमध्ये मांडलेले आंग्लेतर (उर्वरीत युरोपीय continental ) तत्त्वज्ञान म्हणजे युरोपीय तत्त्वज्ञान. वेगवेगळ्या भाषांमध्ये मांडले गेलेले ग्रीक आणि आंग्लेतर तत्त्वज्ञान ब्रिटीश वसाहतवाद आणि अन्य काही
कारणामुळे इंग्लिशमध्ये भाषांतरीत होऊन जगात पसरले. आपल्याकडेही मराठी, व इतर
प्रादेशिक भाषेत विराजमान झाले. अशा तऱ्हेने ग्रीक-पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञान
या सगळ्यांनी मिळून जो तत्त्वविचारांचा साठा बनतो त्या विचारविश्वाला पाश्चात्य तत्त्वज्ञान म्हणण्याची
पद्धत आहे.
'पाश्चात्य
तत्त्वज्ञान'ही अगदी अलीकडील काळातील, गेल्या शंभर वर्षातील नवी संज्ञा आहे. या
तत्त्वज्ञानाचे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि समकालीन असे चार प्रकार केले
जातात. तथापि 'पाश्चात्य तत्त्वज्ञान'ही संज्ञा बरीचशी संदिग्ध आणि फारशी उपयुक्त नाही.
उदाहरणार्थ प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानालाच काही वेळेस पाश्चात्य तत्त्वज्ञान
म्हंटले आहे तर काही वेळेस आधुनिक तत्त्वज्ञानाला पाश्चात्य तत्त्वज्ञान म्हंटले
आहे. शिवाय केवळ तत्त्ववेत्तेच नव्हे तर अनेक कवी, वैज्ञानिक, लेखक, साहित्यिक
यांनीही तत्त्वज्ञान निर्माण केले आहे. त्यात अनेक संस्कृती, सभ्यता, परंपरा,
राजकीय संघटना यांचा सहभाग आहे. मुख्य म्हणजे जगातील विविध पाश्चात्य, युरोपीय आणि
मध्यपूर्व देशांमधील धर्मानी तत्त्वज्ञान सांगितले आहे. ते त्या त्या धर्माचे स्वतंत्र
तत्त्वज्ञान आहे. ते सारे तार्कीकदृष्ट्या चिकित्सक असेलच असे नाही. तर्कशुद्ध
युक्तिवाद, समर्थन आणि अनुभव हे निकष ते पूर्ण करीत नाहीत. तरीही ते
तत्त्वज्ञानाचा हिस्सा बनले आहेत.
धर्मसंस्थांप्रमाणेच
'विज्ञान' या क्षेत्राचाही मोठा परिणाम तत्त्वज्ञानावर झाला आहे.आधुनिक समजल्या
जाणाऱ्या कालखंडात विज्ञान व तत्त्वज्ञान एकत्र निर्माण झाले; विसाव्या शतकात
विज्ञानाचा, संशोधनाचा महास्फोट झाला. त्याचा परिणाम होऊन वैज्ञानिक तत्त्वज्ञान
ही नवी गोष्ट आली. त्यामुळेच बर्ट्रांड रसेलच्या मते तत्त्वज्ञान हा शब्द
ईश्वशास्त्र आणि विज्ञान यांच्या 'मध्ये' कुठेतरी येतो. तो त्याच्या ' हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फीलॉसॉफी'
या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हणतो " ईश्वशास्त्र आणि विज्ञान यांच्या दरम्यान
एक 'निर्जन प्रदेश' (नो मॅन्स लँड) आहे ज्यावर दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत
राहतात; हा प्रदेश म्हणे तत्त्वज्ञान." अशा रितीने अनेक व्यक्ती, त्यांचे
विचार, चळवळी, घटना या सगळ्यांनी मिळून 'पाश्चात्य तत्त्वज्ञान' बनते.
या
तत्त्वज्ञानाचा परिचय करून घेण्याचे आज साधारणतः दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे तत्त्वज्ञानाच्या
समग्र इतिहासाचा आढावा घेणे हा आहे. यात प्रथम प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा आणि
त्यानंतर पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानातील दिग्गजांचा परिचय करून घेणे. दुसरा
आधुनिक समजला जाणारा 'समस्या केंद्रीत मार्ग ' .
तत्त्वज्ञानाच्या समग्र इतिहासाचा आढावा घेताना
मुख्यतः ज्यांनी पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञानाचा पाया रचला त्या सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरिस्टॉटल या तीन तत्त्वज्ञांचा परिचय हा मुलभूत
अभ्यास आहे. मग त्यानंतरच्या मध्ययुगीन कालखंडातील ऑगस्टीन, अॅन्सेल्म इत्यादी
तत्त्ववेत्ते, मग आधुनिक कालखंडातील देकार्त, लायब्नीज, स्पिनोझा, पास्कल, लॉक, बर्कले, ह्यूम, रुसो कांट, हेगेल, मार्क्स, नीत्शे, किर्केगार्द आणि अखेरीस विसाव्या
शतकातील रसेल, विटगेनस्टाईन, व्हाईटहेड, सार्त्र, कामू, , फेयराबँड, रॉल्स, चार्ल्स टेलर, पॉपर इत्यादींची माहिती मिळविणे.
तत्त्वज्ञान शिकण्याचा हा एक लोकप्रिय राजमार्ग आहे. कारण खऱ्या
अर्थाने पाहता तत्त्वज्ञान म्हणजे व्यक्ति आणि त्यांच्या पिढ्या यांच्यातील २६०० वर्षांचा
संभाषणाचा इतिहास आहे. या इतिहासाकडे दोन-तीन
दृष्टीकोनातून पाहता येते. पहिला, इ.स.पूर्वी ६०० वर्षे आधीपासून ते आजपर्यंत
आपले पूर्वज नेमके काय सांगू पाहत होते, आणि दुसरा, विद्यमान समकालिन वंशज काय सांगू
पाहात आहेत, हे जाणून घेणे. आणि तिसरा, विद्यमान अंत्यजांपैकी एक अंत्यज म्हणून
"स्वतः मी प्रथमपुरुषी एकवचनी माणूस" त्यातील नेमके काय ग्रहण करीत आहे,
हे स्वतःहून या संभाषणात सहभागी होऊन साक्षात जाणून घेणे. अशा सहभागाचा लाभ होणे
हा एक सन्मान आहे.
ऐतिहासिक
दृष्टिकोनाचा फायदा असा की एकतर जिज्ञासूला तात्त्विक शोधात सातत्य राहून एक समग्र
व्यापक आकलन होते. दुसरे म्हणजे असा ज्ञानाचा एक मोठा साठा हाती लागला की त्यातील
कोणत्याही विचारप्रणालीचा उपयोग त्या जिज्ञासूला त्याच्या अभिरुची असलेल्या
विषयाच्या पुढील सखोल आकलनासाठी आणि अधिक विश्लेषणासाठी करता येतो. तत्त्वज्ञानाचा
असा अभ्यास करणे सुलभ जाते, कारण तत्त्वज्ञान तसे घडत गेले आहे आणि त्यावर आधारित
समाजव्यवस्था येत-जात राहिल्या आहेत. विद्यमान समाजव्यवस्था सुद्धा या अनुक्रमाने
येत गेलेल्या तात्त्विक विचारांचाच परिपाक आहे.अर्थात हा मार्ग कितीही नैसर्गिक
वाटला तरीही ऐतिहासिक दृष्टिकोन अंगिकारण्यात काही पेच असू शकतात.
अर्थात हा मार्गही काहीजणांना
पसंत पडत नाही. कारण त्यांना 'तत्त्वज्ञानाने जे करावे' असे त्यांना वाटते, ते यात होत नाही. या
काहीजणांना 'तत्त्वज्ञानाने काय करावे' असे वाटते ? तर त्यांच्या मते,
तत्त्वज्ञानाने (म्हणजे तत्त्ववेत्त्यांनी) आजच्या विद्यमान तत्त्वज्ञानात्मक समस्यांचा
विचार करावा , त्यांची चर्चा करावी, त्यांची उत्तरे द्यावीत. या लोकांना (वैचारिक
कार्यकर्त्यांना) अशा समस्या सोडवून परिस्थितीत तातडीने बदल व्हावा, अशी घाई
झालेली असते. उदारणार्थ न्याय, समता, नैतिकता,
स्वातंत्र्य किंवा ईश्वर. हा तत्त्वज्ञानाचा परिचय करून घेण्याचा दुसऱ्या मार्गाला
'समस्या केंद्रीत मार्ग ' मानता येईल.
तत्त्वज्ञानाचा परिचय करून
देणारी पुस्तके बहुधा दोन प्रकारच्या चुकीच्या गृहीतकावर आधारलेली असतात. ती एकतर
खूपच सोपी असतात किंवा मग खूपच अवघड असतात. काही नावालाच परिचयात्मक असतात. अवघड
पुस्तकांशी वाचकाला झुंजावे लागते. मग त्याचा समज असा होतो की तत्त्वज्ञान हा विषय
फक्त काही निवडक दीडशहाण्यानीच अभ्यासावा असा विषय आहे आणि त्याचा प्रत्यक्ष
जगण्याशी काही संबध नाही ! दुसरीकडे काही बाळबोध
लेखन नावालाच तत्त्वज्ञानाचे असते. कारण त्यात जीवनविषयक भरमसाठ मोहक मुक्ताफळे
असतात, पण तत्त्वज्ञानाची परिभाषा नसते. असे लेखन वाचणाऱ्या वाचकाला तत्त्वज्ञान
हा उथळ विषय वाटतो आणि यात वेळ घालविण्यात काहीच शहाणपण नाही, या
निष्कर्षाला तो येतो. या दोन्हीतून मार्ग काढणे आवश्यक असते.
Epaper Link
पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास : रसेलकृत परिचय - अनुवाद :श्रीनिवास हेमाडे
DOWNLOAD THE PDF OF
A HISTORY OF WESTERN PHILOSOPHY And Its Connection with Political and Social
Circumstances from the Earliest Times to the Present Day
पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास : रसेलकृत परिचय - अनुवाद :श्रीनिवास हेमाडे
DOWNLOAD THE PDF OF
A HISTORY OF WESTERN PHILOSOPHY And Its Connection with Political and Social
Circumstances from the Earliest Times to the Present Day
No comments:
Post a Comment