शेतीचे नीतिशास्त्र
श्रीनिवास हेमाडे
शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि 'जगण्याचा समान हक्क' मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..
शेती व्यवसायाचा आणि
तत्त्वज्ञानाचा संबंध काय? याची दोन उत्तरे शक्य आहेत.
पहिले असे की शेती करणे ही मूलभूत नतिक कृती आहे. त्यामुळे शेतीचे नीतिशास्त्र
रचणे, त्या शास्त्राची बौद्धिक मांडणे करणे यातून शेतीचा
तत्त्वज्ञानाशी संबंध येतो. दुसरे म्हणजे शेती करण्यामागील मानवी बौद्धिक श्रम
लक्षात घेऊनच शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी ज्ञानशाखा विकसित होते. ही मांडणी लिंडसे फालवेय् (१९५०) या ऑस्ट्रेलियन विचारवंताने केली.
शेतीचे नीतिशास्त्र ही मुख्यत
सार्वजनिक धोरणांशी निगडित असलेल्या नैतिक समस्यांवर शक्य असलेल्या उपाययोजनांची
तात्त्विक आणि नैतिक दृष्टिकोनातून चर्चा करणारी उपयोजित नीतिशास्त्रातील नवी उगवती
उपशाखा आहे. अन्नाचे उत्पादन आणि इतर औद्योगिक उत्पादनासाठी नसíगक, जैविक साधनसंपत्ती यांचा वापर केला जात
असताना दूरदर्शीपणा, रास्तपणा आणि मानवी चेहरा टिकविणारे
व्यवस्थापन कसे होईल, याच्याशी ते निगडित आहे. शेतीविषयक
धोरणे ही नेहमीच सार्वजनिक धोरणे असतात,याचे भान शेतीचे
नीतिशास्त्र विकसित करते.
बेन मेफम (विद्यमान) या शेतीतज्ज्ञ
आणि तत्त्ववेत्त्याच्या मते, इतर कोणत्याही
उद्योगधंद्यातील उत्पादनापेक्षा 'अन्न' हे शेती संस्कृतीचे उत्पादनाचे स्वरूप मूलत वैशिष्टय़पूर्ण आहे. इतर
मानवी उत्पादनाच्या तुलनेत अन्न हे प्रत्येक मानवाला आणि मानवेतर जिवांना केवळ
विधायक अर्थाने जगण्याचा मूलभूत हक्क देते. परिणामी अन्न हेच केवळ निखळ, नि:संशय, निसंदिग्ध, निरपेक्ष,
सुस्पष्ट नैतिक दर्जा असणारे एकमेवाद्वितीय उत्पादन आहे.
शेतीच्या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट
सामाजिक कराराच्या संदर्भात सार्वजनिक धोरण ठरविणे आणि त्या धोरणाचा सविस्तर
आराखडा निश्चित करण्यासाठी समर्पक ठरू शकेल अशी, सुसंगत
आणि एकात्म नतिक चौकटीची योजना करणे, हे आहे. इथे सामाजिक
करार याचा अर्थ सामाजिक सहकार्य, कायदेशीर रक्षण आणि उचित
प्रशासन राबविण्याकरिता समाजातील सर्व सदस्यांनी एकमेकांत केलेला अलिखित करारनामा
असा आहे. असा करार लोकशाहीतच कल्पनीय असल्याने, शेतीचे
नीतिशास्त्र ही लोकशाही जीवनशैलीतच शक्य असणारी तात्त्विक विचारसरणी आहे. गरिबातील
गरीब नागरिकालाही परवडणारे सुरक्षित, पोषक अन्न पुरविणे
हे लोकशाहीचे काम असते. त्यामुळे करार करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि शासन यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी ते किमान मुद्दय़ावर
एकत्र येणे, हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी नेहमीच
हितावह असेल; अशा सामंजस्याचा सामाजिक करार राबविला गेला
पाहिजे. मेफमच्या मते, या प्रक्रियेत नतिक भूमिका म्हणजे
योग्य धोरणे ठरविणे हे नाही तर, प्रस्तावित विशिष्ट धोरणे नैतिकदृष्टय़ा स्वीकारणे समर्थनीय आहेत की नाहीत याचे मूल्यमापन करण्यासाठी मदत
करणारे नैतिक सिद्धान्त रचणे असते.
मेफमच्या निरीक्षणानुसार जमिनीची मालकी,
जमिनीचे शोषण आणि या शोषणाचा तिच्या उपजक्षमतेवर होणारा परिणाम
या तीन मुख्य घटकांमधून शेतीविषयक अनंत नतिक समस्या उद्भवतात. मेफमच्या मते,
शेतीविषयक नैतिक समस्यांचे तीन गट आणि शेतीविषयक नैतिक सिद्धान्ताचे असे दोन गट अधोरेखित करता येतील. यापैकी 'नतिक
समस्यां'चे उपगट असे: (१) आíथक-सामाजिक
रचना [न्याय कुणाला? कसा?](२)
जैवनीतिशास्त्रीय दृष्टिकोन [प्रामुख्याने जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनामुळे व इतर
प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या.](३) शेती-पर्यावरणीय
दृष्टिकोन [शेतीचा भौतिक तसेच सामाजिक पर्यावरणावर होणारा परिणाम ].
नैतिक सिद्धांताचे असे दोन गट असे :
(२)प्रक्रियाकेन्द्री आणि (२) आशयकेन्द्री. प्रक्रियाकेन्द्री नैतिक सिद्धान्त
म्हणजे घेतले जाणारे निर्णय गटबाजीचे व हितसंबंधी आहेत की सार्वजनिक हिताचे आहेत,
यापेक्षा निर्णय कसे घेतले जातात याच्याशी संबंधित असणारे
(वैधानिक बहुमत, शेतकऱ्यांच्या वा राजकीय संघटना, पक्ष तसेच एखाद्या उद्योगसमूहाचा विविध प्रकारचा दबाव वा छोटय़ा गटात 'दादा'गिरी, साहेबांचे
'एक'मत). आशयकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे प्रस्तावित धोरणांचा तपशीलवार आशय विचारात घेऊन रचला जाणारा सिद्धान्त (उपयुक्ततावादी किंवा कर्तव्यतावादी). दुसऱ्या प्रकारचे पुन्हा आणखी
काही उपप्रकार आहेत.
पॉल थॉमसन या अमेरिकन
शेतीनीतिज्ञाच्या मते, शेतीच्या नीतिशास्त्रात अभ्यासल्या
जाणाऱ्या समस्यांचे तीन विभाग आहेत : (१) मानवी आरोग्य आणि सुरक्षा (२) पर्यावरण
ऱ्हासाचा व्यापक प्रश्न (३) एक जीवनमार्ग म्हणून आणि कुटुंब, चालीरीती इ. विविध सामाजिक संस्थांशी असलेला शेतीचा संबंध पाहता शेतीची
सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक उचितता, हे आहेत. पहिला विभाग, साधे रोजचे जेवण,
ठरविलेला आहार, पोषण व अन्न सुरक्षा
याच्याशी निगडित आहे. दुसरा विभाग, शेतीविषयक पर्यावरणीय
व्यवस्था आणि त्या बाबतचे माणसाचे उत्तरदायित्व (प्राण्यांचा जगण्याचा हक्क,
शाकाहारवाद इ.), तिसरा विभाग, शेतीचे औद्योगिकीकरणाशी (कॉर्पोरेटीकरण) निगडित आहे.
थॉमसनच्या मते, शेतीविषयक नैतिक विचारांचा इतिहास झेनोफोन (इ.स.पू. ४४४-३७५) आणि अॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२) यांच्यापासून सुरू होतो. मग तमोयुगाचा काळ वगळता हा इतिहास
लॉर्ड फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६) पासून पुन्हा सरू होतो. बेकनने विज्ञान आणि
शेतीविकास या संबंधात पहिले सविस्तर यथार्थ लिखाण केले. लागवड-मशागतीचा पहिला
वैज्ञानिक ग्रंथराज शेतीतज्ज्ञ जेथ्रो टूल (१६२७-१७४१) याने १७३३ साली लिहिला. जॉन
लॉक (१६३२-१७०४), मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५), हेगेल (१७७०-१८३१), थॉमस माल्थस (१७६६-१८३४),
बेंथम (१७४८-१८३२), जॉन स्टुअर्ट मिल
(१८०६-१८७३) यांनी विविध अंगांनी शेतीविषयक मतप्रदर्शन केले. तथापि अनेक गतकालीन
तत्त्ववेत्त्यांच्या शेतीविषयक लेखनाकडे समाजाचे आणि शासनाचे दुर्लक्ष झाले,
अशी खंत थॉमसन व्यक्त करतो. विज्ञान-तंत्रज्ञानाशी लगटून असूनही
शेतीच्या नीतिशास्त्राच्या तात्त्विक इतिहासात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.
त्यानंतर थेट विसाव्या शतकात ग्लेन एल
जॉन्सन (१९१८-२००३) या शेती अर्थशास्त्रज्ञाने शेतीविज्ञानावर अनेक चांगल्या,
विधायक लेखमाला लिहिल्यानंतर या विषयाकडे लोकांचे लक्ष गेले.
वेन्डेल बेरी या कवी-कादंबरीकाराने लिहिलेल्या 'द
अन-सेटलिंग ऑफ अमेरिका' (१९७७) या ग्रंथात औद्योगिक शेती,
विद्यापीठांना मोठय़ा जमिनी दान करणे आणि आधुनिक शेतीविज्ञान यावर
तात्त्विक मर्मग्राही टीका केली. त्यामुळे तत्त्ववेत्त्यांचे शेतीतील नतिक नैतिक समस्यांकडे लक्ष वेधले गेले. लिबर्टी बेले (१८५८-१९५४) हा अमेरिकन शेतीशास्त्रज्ञ,
सर अल्बर्ट हॉवर्ड (१८७३-१९४७) यांच्या 'अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट' आणि 'सॉइल अँड हेल्थ' या ग्रंथांनी मोठी क्रांती
केली. पीटर सिंगर, ओनोरा ओनील आणि अमर्त्य सेन (सर्व
विद्यमान) यांनी भूकबळीची समस्या हाताळली. गॅरेट हार्डीन (१९७५-२००३) आणि नॉर्मन
बोरलॉग यांनी लोकसंख्या वाढ आणि अन्न उत्पादन प्रक्रियेतील तणावाचे विश्लेषण केले.
राशेल कारसन (१९०७-१९७६) या विदूषीने शेतीच्या विषारीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला.
कॅरोलिन साख या विदूषीने आणि भारतात वंदना शिवा यांनी पहिल्यांदा शेतीचा
स्त्रीवादी अभ्यास पुढे आणला. नंतर थॉमस रुहेर, अॅलन
रोसेनफिल्ड यांनी प्रथम शेतीचे नीतिशास्त्र ही नवी विद्याशाखा १९८० मध्ये
शिकविण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये गॅरी कॉमस्टॉक यांनी शेती नीतिशास्त्रावर
शेकडो कार्यशाळा घेतल्या. पॉल थॉमसन हा पहिला तत्त्वज्ञ अधिकृतरीत्या टेक्सास-
मध्ये शेती नीतिशास्त्रज्ञ म्हणून नेमला गेला. बेन मेफम यांनी १९९० मध्ये जागतिक
परिषद आयोजित केली. १९९८ मध्ये प्रथम 'द युरोपियन सोसायटीफॉर अॅग्रिकल्चरल अँड फूड एथिक्स' स्थापन झाली. २०००
मध्ये ' द जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड एन्व्हायर्न्मेंटल एथिक्स'चा पहिला अंक दिमाखात प्रकाशित झाला. 'एन्सायक्लोपीडिया ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर एथिक्स 'ची पहिली आवृत्ती १९९८ मध्येच आली होती, तर या
वर्षी - २०१४ साली त्याची नवी आवृत्ती आली.
भारतात काय घडले ते पुढील लेखात !
No comments:
Post a Comment