तात्त्विक दृष्टिकोन.. लोकशाहीसाठी
श्रीनिवास हेमाडे
तत्त्वज्ञान हे नेहमी लोकांकडून लोकांसाठी निर्माण केले जाते. साहजिकच लोकांचेच प्रश्न सोडविणे, हे तत्त्वज्ञानाचे काम असते. एखाद्या सामाजिक प्रश्नाला तात्त्विक प्रश्नाचा दर्जा कधी लाभतो, हाच एक तात्त्विक प्रश्न असतो. राज्य म्हणजे काय ? या तात्त्विक प्रश्नाचे सामाजिक रूप 'आदर्श राज्य म्हणजे नेमके कोणते राज्य ?' हे आहे. मूळ तात्त्विक प्रश्नाच्या उत्तराकडून सामाजिक प्रश्नाकडे जाणे हाच तात्त्विक प्रवास बनतो.
ज्ञान, अस्तित्व, तर्क, सौंदर्य, आणि नीति या तत्त्वज्ञानातील पाच मुलभूत संकल्पनांच्या आधारे अनुक्रमे ज्ञानशास्त्र, अस्तित्वशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि नीतिशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या या शाखा पाच प्रश्न उपस्थित करतात - ज्ञान म्हणजे काय ? (ज्ञानशास्त्र) अस्तित्व म्हणजे काय ? (अस्तित्वशास्त्र), तर्क म्हणजे काय ? (तर्कशास्त्र), सौंदर्य म्हणजे काय ? (सौंदर्यशास्त्र) आणि नीति म्हणजे काय ? (नीतिशास्त्र).
हे प्रश्न म्हणजे एका अर्थाने कोणत्याही ज्ञानशाखेला ज्ञानाचा आणि विज्ञानाचा दर्जा देण्याचा साचा. उदाहरणार्थ राज्य, समाज, शासन, प्रशासन किंवा प्रेम, मत्री, करुणा, स्वातंत्र्य, समता, निर्भयता, सुरक्षितता, शेजारधर्म, वाहतुकीचा नियम, किंवा अगदी रस्त्यावर चालावे कसे ? शेजारी मयत झाली असेल तर आपण डीजे वाजवावा का ? किंवा संगणक, टोलनाका, दुकान, शिक्षणसंस्था, वृत्तपत्र या सारख्या संकल्पना सुस्पष्टपणे समजावून घ्यावयाचे असतील तर हे पाच प्रश्न उपयोगी असतात. आदर्श राज्य ही संकल्पना समजावून घ्यावयाची असेल तर मूलत राज्य म्हणजे काय ? (राज्याचे ज्ञानशास्त्र) राज्य अस्तित्वात कसे येते? (राज्याचे अस्तित्वशास्त्र), राज्य चालते म्हणजे काय ? (राज्याचे तर्कशास्त्र), ते सुंदर असू शकते काय ? (राज्याचे सौंदर्यशास्त्र) आणि त्याची नतिक ध्येयधोरणे कोणती ? (राज्याचे नीतिशास्त्र), हे समजावून घेणे गरजेचे आहे.
राज्याचे ज्ञानशास्त्र राज्य संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करते, राज्याचे अस्तित्वशास्त्र रानटी टोळी समाजापासून राज्य ही सुव्यवस्थित रचना कशी निर्माण होते, हे स्पष्ट करते, राज्याचे तर्कशास्त्र 'राजकारण' नेमके कसे होत असते, याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करते, तर राज्याचे सौंदर्यशास्त्र राज्याच्या कला, साहित्य, संगीत, धर्मविषयक धोरणांची एकात्मता सांगू पाहते आणि राज्याचे नीतिशास्त्र राजेशाही, घराणेशाही, लष्करशाही, हुकुमशाही की लोकशाही, अशा कोणत्या स्वरूपाचे राज्य नतिक ठरू शकते, याचे स्पष्टीकरण देऊ पाहते. या साऱ्या प्रश्नांच्या उत्तर देण्यातून 'आदर्श राज्याचे स्वरूप कोणते?' याचे ज्ञान होते.
भारतात महाभारतकाळापासून 'राज्य' संकल्पनेची तात्त्विक चर्चा चालू आहे. ग्रीक परंपरा अथेन्स-स्पार्टा किंवा पेलोपोनेसियन युद्धापासून ही चर्चा करते. रामराज्य ही प्राचीन काली आणि शिवराज्य ही मध्ययुगीन भारतात आदर्श राज्यव्यवस्था व समाज व्यवस्था मानली गेली होती.
भारतीय चातुर्वण्र्य, जातीव्यवस्था, स्त्री-पुरुष लिंगभेद ही एकेकाळी आदर्श राज्य रचना आणि समाजव्यवस्था होती. पण इंग्रजी विद्या आणि वसाहतवाद यांचा परिणाम म्हणून या साऱ्या सनातन आदर्श व्यवस्थेचे नवे ज्ञानशास्त्र, अस्तित्वशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि नीतिशास्त्र रचण्याचा प्रयत्न झाला. राजा राममोहन रॉय, न्या. रानडे, आगरकर व्हाया फुले-शाहू- आंबेडकर ते आताचे (उदा.) मेधा पाटकर वा अण्णा हजारे यांच्यापर्यंत या सनातन व्यवस्थांचे नवे ज्ञानशास्त्र व नीतिशास्त्र मांडण्याचा प्रयत्न चालू आहे. सीता आणि द्रौपदीने काही प्रश्न उपस्थित केले; त्यांचे वर्णन आज आपण 'स्त्री-मुक्तीवादी प्रश्न' असे करतो. आज वर्ण- जाती-लिंगभेदातील अनैतिकता उघड झाली आणि दलित अध्ययनशास्त्र या नव्या घटनेचा उदय झाला. भारतीय प्रबोधनाचे फलित म्हणजे हे सारे नवे ज्ञान, असे संक्षेपात म्हणता येते. पण आजच्या भारताचे चित्र पाहता 'भारतीय प्रबोधनाचे नीतिशास्त्र रचले गेले आहे काय ? ते यशस्वी होत आहे काय ?' असे ज्ञानशास्त्रीय प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
लोकशाही राज्यव्यवस्थेतील कोणतीही निवडणूक ही या साऱ्या व्यवस्थांचे नवे ज्ञानशास्त्र रचू पाहते आणि नव्या कल्याणकारी नीतिशास्त्राची अपेक्षा करते. लोकशाहीत राज्यकर्त्यांचे नीतिशास्त्र जनतेशी बांधील राहिले नाही, ते निव्वळ आत्मकेंद्री झाले की जनता ते राज्य उलथवून टाकते, नव्या राज्यकर्त्यांचा प्रयोग करते. हे नेहमीच घडते. हे लोकशाहीचे तर्कशास्त्र असते.
आता अगदी खासगी गोष्ट घ्या. रस्त्यावर चालावे कसे ? हा प्रश्न नतिक असतो. का ? याचे कारण तो नागरिकशास्त्राचा प्रश्न असतो तर 'मयत होणे' ही घटना 'मृत्यू म्हणजे काय ?' हा तात्त्विक प्रश्न निर्माण करतो. पुढे, माझ्या घरात मृत्यूची घटना घडणे आणि दुसऱ्याच्या घरात घडणे व त्याच वेळी माझे मनरंजन मी करू पाहाणे हे सामाजिक नतिकतेचे प्रश्न बनतात. हेच प्रेम व युद्ध या दोन घटनांबाबत कसे घडते, ते पाहा.
प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असते, याचा अर्थ प्रेम आणि युद्ध हे ज्ञान आणि नीती यांच्या पलीकडे असतात का ? असा नवा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. प्रेम ही ज्ञानाची गोष्ट नसून करण्याची गोष्ट आहे, असे एक उत्तर दिले जाते. ते निश्चित नसते. कारण प्रेम विकृत झाले की हिंसा घडते. िहदी सिनेमा या विकृतीचे दर्शन घडवितो. प्रेम जितकी मुलभूत नैतिक गोष्ट असते तितकीच युद्ध ही मुळातच अनैतिक घटना असते. याचे उघड कारण युद्ध समाजाचा नाश करते. म्हणजे युद्धाचे नीतिशास्त्र ही महत्त्वाची बाब बनते. मग ते युद्ध रस्त्यावरचे भांडण असो, प्रेमयुद्ध असो वा सीमायुद्ध असो, महायुद्ध, ती अनैतिकच बाब बनते. म्हणूनच प्रेम म्हणजे काय ? हा तात्त्विक प्रश्न काव्य, साहित्य किंवा नाटकाचा प्रश्न बनवून 'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते' असे अत्यंत खासगी व अतार्किक उत्तर न देता गंभीर तात्त्विक उत्तर दिले पाहिजे. कारण पुढे, देशप्रेम ही आणखी गंभीर बाब असते.
या आणि अशा साऱ्या संकल्पना नीटपणे समजावून घ्यावयाच्या असतील समाजात काहीएक निश्चित तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होणे, हीच ज्ञानशास्त्रीय गरज असते. तात्त्विक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रत्येकाला तात्त्विक प्रशिक्षणाची गरज असते. आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड (१८६१-१९४७) हा ब्रिटिश तत्त्ववेत्ता म्हणतो, 'समाजातील सार्वजनिक शिक्षणव्यवस्था जोपर्यंत जनतेत तात्त्विक दृष्टिकोन निर्माण करू शकत नाही तोपर्यंत अस्सल लोकशाही समाज निर्माण होऊ शकत नाही. तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ उदात्त भावनांचा एकगठ्ठा कल्लोळ नसतो. कोणत्याही भावनिक प्रक्षोभात चांगले काही होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. तत्त्वज्ञान असे कधीही नसते. तत्त्वज्ञान हे नेहमी मानवी प्रतिभेचे एकाचवेळी समीक्षात्मक आणि परिशीलन करणारे, आशयघन व सामान्य स्वरूपाचे - सर्वाना उपयोगात आणता येईल असे साधन - असते. तत्त्वज्ञानात वस्तुस्थिती, सिद्धान्त, पर्याय आणि आदर्श यांना एकाच पारडय़ात समान रीतीने तोलले जाते. शक्यता आणि त्यांची वस्तुस्थितीशी केलेली तुलना यांचे ते निरपेक्ष सर्वेक्षण असते.' (अॅडव्हेंचर्स ऑफ आयडियाज, १९३३ )
आता, विद्यमान भारतीय शिक्षणव्यवस्था असा तात्त्विक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करते की निर्घृण आणि विकृत आíथक दृष्टिकोन निर्माण करते, हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. कारण 'अज्ञान नव्हे, तर अज्ञानाचे अज्ञान हाच ज्ञानाचा मृत्यू असतो', असे अन्य एका ठिकाणी व्हाइटहेड म्हणतात.
No comments:
Post a Comment