Wednesday, 24 December 2014

तत्त्वभान ५० भान न सोडता २५ डिसेंबर २०१४

                        भान न सोडता 
philosophy links relation between man and world
इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४)
श्रीनिवास हेमाडे 

दैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न 'तत्त्वभान' बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले. मागे वळून पाहिल्यास त्यांची उत्तरे मिळतात..

जगातील वाईटपणा, दुरिते टिकून राहण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी आणि ही सर्व प्रकारची दुरिते अधिक समृद्ध व्हावीत ; यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते. ती म्हणजे चांगल्या माणसांनी काहीच करावयाचे नसते!
           माणूस आणि जग यांच्या नात्याचा शोध घेणारा अतिप्राचीन प्रयत्न म्हणजे 'तत्त्वज्ञान' या विषयाचा परिचय करून देणे, हा 'तत्त्वभान' या सदरामागील उद्देश होता. येथे 'परिचय' हा शब्द केवळ त्या शब्दाचा अतिपरिचय असल्यामुळे उपयोगात आणत आहे एवढेच. या सदरात जे काही अपेक्षित होते त्यासाठी वस्तुत: 'पूर्वपीठिका' (prolegomena) ही संज्ञा अधिक योग्य वाटते. तत्त्वज्ञानाबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आणि जिज्ञासा या अभिवृत्ती व्यक्त करण्यासाठी जे काही करावयाचे आहे, त्या साऱ्या प्रयत्नांना 'तत्त्वज्ञानाची पूर्वपीठिका' म्हणता येईल. 
     तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबाबत परिचय (introduction) व पूर्वपीठिका (prolegomena) या दोन संकल्पनांमध्ये फरक करता येईल. 'इंट्रोडक्शन' या संकल्पनेत अनंत विद्वतजड पंडिती गोष्टींची अपेक्षा असते. ज्यांना परिचय करून दिला जातो त्या वाचकांना-प्रेक्षकांना काहीएक पूर्वज्ञान आहे, असे गृहीत धरलेले असते. त्या गृहीतावर आधारित प्रदीर्घ युक्तिवाद मांडणे आणि निष्कर्षांप्रत येणे असे परिचय देताना घडते. 'प्रोलेगोमिना' या संकल्पनेत अशा तांत्रिकदृष्टय़ा किचकट गोष्टींची गरज नसते. पूर्वपीठिका ज्ञानासाठी उत्सुक असलेल्या सामान्यजनांसाठी असते. शब्दबंबाळ, बोजडपण टाळून सामान्य भाषेत ती मांडलेली असते. त्याच वेळी पुढील चच्रेची पूर्वतयारी म्हणून परिभाषेची, वादविवादाच्या उपकरणांची, काही मूलभूत सिद्धांताची ओळख पूर्वपीठिकेत करून दिली जाते. 
        आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांटने (१७२४-१८०४) आपले प्रगल्भ तत्त्वज्ञान 'शुद्ध बुद्धीची मीमांसा' (क्रिटिक ऑफ प्युअर रीझन) या ग्रंथात प्रामुख्याने मांडले पण त्याला सुशिक्षित वर्गाकडून व तत्त्ववेत्त्यांकडूनही प्रतिसाद मिळेना. अखेर त्याने सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या रीतीने साध्या भाषेत 'प्रोलेगोमिना टू एनी फ्यूचर मेटाफिजिक्स' हा ग्रंथ लिहिला. कांटने वापरलेला 'प्रोलेगोमिना' हा शब्द मी त्याच अर्थाने येथे वापरात आणत आहे. 
       विसाव्या शतकातील प्रसिद्ध तत्त्ववेत्ते हान्स रायखेनबाख यांच्या भाषेत सांगावयाचे तर सहजबुद्धी जे शिकविते त्यापेक्षा अधिक शिकण्याची इच्छा होण्याइतपत वाचकाकडे सहजबुद्धी असेल तर या सदरातील प्रतिपादन समजण्यासाठी तेवढी तयारी पुरेशी आहे. वाचकांना तत्त्वज्ञान या विषयात रुची वाटावी, ती वाढावी तसेच विद्यमान जग, त्यातील वास्तवाचे विविध स्तर, त्यातील समस्या आणि त्यांची गुंतागुंत यांचे विश्लेषण करण्यासाठी कोणती तत्त्वज्ञानात्मक आयुधे वापरता येतील, इतपत माहिती त्यांना असावी, हा उद्देश या लेखनामागे आहे. त्याचप्रमाणे जे वाचक अधिक काही करू इच्छित आहेत, ते प्राप्त करण्यासाठी त्यांना काय करावे लागेल, त्याचे केवळ दिग्दर्शन केले आहे. त्या हेतूने नंतरच्या लेखांमध्ये विविध ग्रंथ, व्यक्ती, तत्त्ववेत्ते आणि त्यांच्या सिद्धांताचा गोषवारा देण्यावर भर दिला गेला. 
        केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न (१९५५- विद्यमान) यांच्या मते, तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध करून देणे म्हणजे तत्त्वज्ञानाचे अर्थहीन सुलभीकरण करणे नाही. तर लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे आणि त्यांना तसा विचार करण्यास उत्तेजन देणे, असा केला पाहिजे. त्यामुळे जगाचे स्पष्टीकरण कसे करावे, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे ते समजावून घेण्याची क्षमता विकसित होते. 
         हे सदर तत्त्वभान देण्याचे. ते भान पुढील प्रकारचे असू शकते. त्यात भर पडू शकते. 
१) एखाद्या विषयाकडे, समस्येकडे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहता येते का? तसे पाहणे म्हणजे नेमके काय करणे? त्या समस्येचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र विकसित करणे अपेक्षित आहे का? 
२) त्या समस्येचा, त्या विषयाचा व तत्त्वज्ञान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचारपद्धतीचा नेमका कोणता संबंध आहे? असेल तर तो तत्त्ववेत्त्यांच्या, तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून कसा होऊ शकेल? यासाठी तत्त्वज्ञानाची कोणती विचारपद्धती अवलंबता येईल? 
३) तत्त्वज्ञ, तत्त्ववेत्ते, व्यावसायिक तत्त्ववेत्ते (तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक) सर्व विषयांत पारंगत असतील असे नाही. ते ज्यात पारंगत असतात, त्याबद्दलचे भान या निमित्ताने विकसित करणे आणि त्यांच्या पारंगततेचा उपयोग करून घेऊन इतरांनी एकूण ज्ञानरचनेचा विस्तार करावयाचा असतो. 
       या सदरात भान किंवा ज्ञानात्मक जाणिवेचे स्वरूप, तत्त्व म्हणजे काय, तत्त्वज्ञानाच्या परिचयाचे मार्ग, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रवेश, तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील खंडन-मंडन, सॉक्रेटिसचा संवाद, द्वंद्वविकास, विश्लेषण या चच्रेच्या पद्धती तसेच वैज्ञानिक पद्धती आणि सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या पाच शाखा; अशा किमान साधनसामग्रीची ओळख; ही पूर्वपीठिका निर्माण होण्यासाठी करून देण्यात आली. तत्त्वज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा, तत्त्वज्ञानाचा देशाच्या चारित्र्याशी कोणता ताíकक व नतिक संबंध आहे याचाही थोडक्यात आढावा दिला. 
       या लेखमालेत अनेक विषय राहून गेले. धर्माचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे नीतिशास्त्र, उपयोजित तत्त्वज्ञान (आणि त्यातील अनेक विषय), राजकीय- सामाजिक- कायद्याचे, इतिहासाचे-कलेचे- शिक्षणाचे तत्त्वज्ञान; त्याचप्रमाणे भारतीय दर्शनांची ओळख, दर्शनांना आलेली कुंठितावस्था, त्यांची विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील चिकित्सा अशा अनेक विषयांना न्याय देता आला नाही.
     तत्त्वज्ञानाच्या पाच शाखांपकी ज्ञानशास्त्र व नीतिशास्त्रावर अधिक भर दिला. विशेषत: सप्टेंबरपासून उपयोजित नीतिशास्त्रातील व्यवसाय, उद्योगसमूह, माध्यमे, जागल्या, राजकीय, पर्यावरण इत्यादी नीतिशास्त्रे काहीशी विस्ताराने मांडली. 
      तत्त्वज्ञानाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झाले तर आणि तरच त्याला नतिक मूल्य लाभते, या विश्वासातून हे लेखन झाले. उदाहरणार्थ, शेती, भारतीय शेती या विषयाचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ तर आली आहेच. पण पुढे जाऊन भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र रचले गेले तर शेतीविषयक धोरण निश्चित करता येईल, हे सुचविले आहे. म्हणूनच या विषयाला सर्वाधिक तीन लेख वाहिले. 
       तत्त्वज्ञान केवळ विद्यापीठीय, महाविद्यालयीन उच्च पातळीवरच अभ्यासले गेले पाहिजे, हा आग्रह पूर्ण सोडून दिला पाहिजे. पाश्चात्त्य-युरोपीय राष्ट्रांमध्ये तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. विविध प्रकारच्या संशोधनाला उत्तेजन देऊन संशोधनाचा उपयोग केला जातो. त्यामुळेच तेथे शेतीचे नीतिशास्त्र विकसित झाले. भारतीय समाजात विविध कारणांनी, तत्त्वज्ञान या विषयाला सरकार, धोरणकत्रे शिक्षणसंस्थाचालक, प्राचार्य यांच्या पातळीवर काहीही महत्त्व उरलेले नाही. आजची स्थिती तर फारच वाईट आहे. (त्यावर स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल) त्यामुळे तत्त्वज्ञानात रुची असणाऱ्यांनी एकत्र येऊन ही परंपरा पुढे नेली पाहिजे. 
      या सदराचा हेतू वाचकांमध्ये तात्त्विक विचार करण्याची तयारी केली पाहिजे, याचे केवळ भान आणणे आणि त्यानुसार कृती करणे, हा होता व आहे. शहाणपण शिकविणे हा हेतू नसून शहाण्या माणसांमधील शहाणपणाला हाळी देणे हा आहे. इथे तत्त्वभान हे सदर 'समाप्त' असे लिहिले तरी तत्त्वचिंतन कधी समाप्त होत नसते, ती अखंड वैचारिक आणि निखळ व्यावहारिक प्रक्रिया आहे. मेरी वॉरनॉक (१९२४-विद्यमान ) या ब्रिटिश विदुषीच्या मते, तत्त्वज्ञान हा एक अतिशय उच्च दर्जाचा सर्वसामान्य तऱ्हेचा शोध आहे आणि असा खेळ आहे की यात कुणीही, अगणित माणसे भाग घेऊ शकतात! 


Thursday, 18 December 2014

तत्त्वभान ४९ कामसंबंधाचे नीतिशास्त्र १९ डिसेंबर २०१४


Work ethic

कामसंबंधाचे नीतिशास्त्र 

श्रीनिवास हेमाडे 
मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पैलूंचे परीक्षण नैतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.
              उपयोजित नीतिशास्त्र ज्या अनेक  नैतिक समस्यांच्या प्रांतांची चिकित्सा करते आणि उपाय सुचवू पाहते त्या सर्व प्रांतांतील अतिप्राचीन प्रांत म्हणजे मानवी कामसंबंधाची रचना. विवाह व कुटुंबसंस्थेमुळे मानवी कामसंबंधाचे स्वरूप जितके सरळ दिसते, तितके वास्तवात सरळ नाही.  नैतिकतेचा प्रश्न जिथे अतिशय उग्र, वादग्रस्त, तापट आणि सर्वाधिक संवेदनशील बनतो ते हे क्षेत्र आहे. नैतिक म्हणजे विवाहसंमत संबंध आणि अनैतिक म्हणजे विवाहबाहय़ संबंध (विबासं) असा ढोबळ, पण कडक निकष असणारा हा लोकमान्य लोकप्रिय प्रांत आहे. ('विबासं' या नावाची अरुण म्हात्रेची अंतर्मुख करणारी कविता आहे.) 'इतर मानवी व्यवहारांत अनैतिकता असते, त्याचाही गंभीर विचार केला पाहिजे', असा विचारच माणसाला सुचू देत नाही, इतका या प्रांतातील  नैतिक निकषाचा विचार भयानक मजबूत, शक्तिशाली आणि मेंदू बंद करणारा असतो.
              एखादी व्यक्ती कितीही लबाड, गुन्हेगारी वृत्तीची असली, पण विबासं कृती करीत नसेल, तर ती  नैतिक व्यक्ती आणि एखादी व्यक्ती सचोटीची, प्रामाणिक, कर्तव्यकठोर असली, पण विबासं कृती करीत असेल, तर ती अनैतिक, ढोंगी मानली जाते. शिक्षण, उच्च प्रशिक्षण, समजूतदारपणा, अभिवृत्ती, शहाणपणा, प्रज्ञान इत्यादी काहीही नसलेल्या सामान्य माणसालाही ही बांधेसूद अनैतिकता समजते.
            दोन व्यक्तींमधील कामसंबंध एका सूत्रबद्ध व्यवस्थेत बांधून टाकण्यासाठी लग्न आणि कुटुंबसंस्थेची रचना झाली. त्याचवेळी विबासंकृत अनैतिकतेचा उगम झाला; पण मुळात कुटुंबसंस्थेतून सर्व संस्कृतींतील वर्ण, जात-जमाती आणि लिंगभेदाच्या शोषणाचा पाया रचला गेला. Family आणि 'कुटुंब' या संस्कृत-मराठी शब्दाचा मूळ अर्थ घरगुती गुलाम, वेठबिगार. (कुटुंबव्यवस्थेत थोडेफार काही चांगले असते, तर सुटुंबव्यवस्था म्हटले असते! ) 
          ब्रह्मचर्य, हस्तमथुन, विवाह, प्रजनन, गर्भनिरोधन, कपटप्रणयचेष्टा (flirting), लैंगिक स्वैराचार, जारकर्म, तात्पुरते कामसंबंध, लैंगिक छळ, पाशवी वर्तन, विनंती संभोग, भावनिक ब्लॅकमेिलग, विनयभंग, बलात्कार तसेच वेश्यागमन, समिलगी संबंध, जबरी संबंध, लिव्ह इन रिलेशन, अगम्य आप्तसंभोग (इन्सेस्ट- निकटच्या निषिद्ध नात्यांमधील विवाह किंवा इतर लैंगिक संबंध), लैंगिक अपमार्गण (पॅराफिलिआ), अश्लील साहित्यांचा उपभोग आणि विविध लैंगिक विकृती व आजार या व अशा इतर अनेक संकल्पनांचा अचूक शोध घेणे, त्यांचे नेमके अर्थ निश्चित करणारी उपयोजित तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे लैंगिकतेचे तत्त्वज्ञान (the philosophy of sexuality) ही नवी विद्याशाखा. संकल्पनांचे अर्थ निश्चित झाले की, त्यांचा अभ्यासाचा, चिंतनाचा आणि मानवी आरोग्य व जीवन सुधारण्याचा मार्ग खुला होतो. हे महत्त्वाचे कार्य लैंगिकतेचे तत्त्वज्ञान करते. 
              लैंगिकतेच्या तत्त्वज्ञानाची दोन गृहीत तत्त्वे आहेत. एक- कामानंद व कामसमाधान मिळवून देणाऱ्या मानवी कृती आणि इच्छा शोधणे. दोन- या मानवी कृती आणि इच्छा केवळ कामानंद व कामसमाधान देणाऱ्या नसून नवी माणसे जगात आणणे, म्हणजे मानवजात टिकविणे याच्याशी निगडित आहेत, हे लक्षात आणून देणे. लैंगिकतेचे तत्त्वज्ञान वरील संकल्पनांचा व आनुषंगिक मुद्दय़ांचा सांकल्पनिक आणि आदर्शवादी असा दोन प्रकारचा शोध घेते. 
          सांकल्पनिक शोध म्हणजे कामेच्छा आणि कामकृती या मूलभूत कल्पना स्पष्ट करणे; त्यांच्या व्याख्या, मर्यादा, त्यातील भावी संशोधन यांचे विश्लेषण करणे. जसे की, एखादी इच्छा कामेच्छेत रूपांतरित होते म्हणजे नेमके काय घडते किंवा फसवून कामोपभोग घेणे आणि अहिंसक बलात्कार या संकल्पना व त्याप्रमाणे होणारी कृती यात नेमका फरक काय आहे? यांचे विश्लेषण करणे. (उदाहरणार्थ बटरड्र रसेलचे लग्नाबद्दलचे मत.) 
           आदर्शवादी शोध म्हणजे कामेच्छा, कामकृती व कामसमाधान यांच्या  नैतिक मूल्यमापनाची कसोटी रचणे. या कसोटय़ा शोधणे, रचणे, त्यांच्या समर्थनाचे युक्तिवाद रचणे हे मोठय़ा जिकिरीचे, अवघड आणि नाजूक काम असते. थोडक्यात, लैंगिकतेचे तत्त्वज्ञान दोन हेतू सांगते. पहिला- मानवी जीवन गुणवान, शुभ पातळीला नेण्यात मानवी लैंगिकता कोणते योगदान देते आणि कामकृती करताना कोणती  नैतिक बंधने पाळणे आवश्यक व अनिवार्य आहे, याची मांडणी करणे. दुसरा- आपली कामकृती व आपले कामसमाधान साधताना समाजातील इतरांशी संवाद कसा करावा, त्याकरिता कोणती  नैतिक जबाबदारी पार पाडावी याची मांडणी करणे. 
           या दोन्ही हेतूंमधून कामसंबंधाचे नीतिशास्त्र निष्पन्न होते. मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण  नैतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र. (सेक्सुअल एथिक्स, सेक्स एथिक्स किंवा सेक्सुअल मॉरॅलिटी). विवाहपूर्व, विवाहोत्तर, विवाहित स्थितीतील लैंगिक संबंधातून लिंगभेद आणि सत्तास्पर्धा कशी व्यक्त होते, त्याचा वेध हे नीतिशास्त्र घेते. व्यक्तिगत आणि व्यापक सामाजिक आरोग्यावर लिंगभेद आणि सत्तास्पर्धा कशी परिणाम करते, याचाही शोध यात घेतला जातो. 
         कामसंबंधाच्या नीतिशास्त्राच्या मुख्य तीन भूमिका मानल्या जातात. (१)  नैतिक शून्यवाद (मुळात चांगले आणि वाईट असे काहीच नसते, सारे निर्थकच असते.) (२)  नैतिक सापेक्षतावाद ( नैतिकता व्यक्ती, परिस्थिती, संस्कृती देशकालसापेक्ष असते. त्यातून सार्वत्रिक नियम बनविता येत नाहीत.) (३) नैतिक सार्वत्रिकवाद (नतिकता सार्वत्रिक असते आणि ती सक्तीची असते.) याशिवाय सुखवाद, उपयुक्ततावाद, कर्तव्यवाद, व्यक्तिवाद, उदारमतवाद (परस्पर सहमतीने होणारा कामसंबंध  नैतिकदृष्टय़ा समर्थनीय मानणे), आधुनिकतावाद (परस्पर सहमतीने, कृतीची पूर्ण जाणीव असणारा, बांधीलकी मानणारा आणि प्रेमभावनेने युक्त असणारा कामसंबंध  नैतिकदृष्टय़ा समर्थनीय मानणे) हे आणखी नैतिक  सिद्धान्त आहेत. चंगळवाद, व्यापारीकरण, व्यावसायिकीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी नव्या आर्थिक बाजूंमुळे लैंगिक वर्तन गुंतागुंतीचे बनले आहे. लैंगिक सुख ही विक्री वस्तू बनविली गेल्याने व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्य हा प्रश्न अधिक उग्र बनला आहे. विवाह व कुटुंबसंस्थेच्या रचनेवर धर्मसंस्थेच्या वर्चस्वाने विधायक आणि विघातक (देवदासी) परिणाम केले आहेत. या सर्व आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, जैविक, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय बाजूंचा अभ्यास कामसंबंधाच्या नीतिशास्त्रात होतो.
           हे सारे पैलू लक्षात घेता कामनीतीविषयक पारंपरिक आणि विविध आधुनिक युक्तिवादांचा समाजातील विविध सामाजिक संस्थांवर आणि मानवी वर्तनावर काहीएक परिणाम होतो. त्यामुळे या युक्तिवादांचे गुणधर्म आणि त्यांच्या त्रुटी यांचे मूल्यमापन, कामनीतीविषयक विविध पातळ्यांवर होणारी चर्चा आणि समकालीन लैंगिक वर्तनाचे प्रकार यांचे विश्लेषण, त्यासाठी विविध  नैतिक संकल्पना आणि सिद्धान्त यांचे उपयोजन ही कामसंबंधाच्या नीतिशास्त्राची उद्दिष्टे बनतात. स्त्रीवादाने या नीतीचे यातील पुरुषी वर्चस्व नाकारले आणि नव्या नीतीची मागणी केली. 
          भारतात कामनीतीचा एकात्म, बांधेसूद विचार आहे. त्यातून व्यापक सर्व समाजाला, जातीजमातींत लागू पडेल, अशी ज्ञानाची खुली परिस्थिती नाही. काम एकीकडे विश्वाचे आदिबीज आणि माणसाचा पुरुषार्थ बनला. दुसरीकडे षड्रिपूंमध्ये काम हा मुख्य शत्रू आहे! कामविषयक (आणि एकूण) सर्व ज्ञानाचे साहित्य अतिशय अवघड रचनेत, किचकट रीतीने, लोकभाषा प्राकृतऐवजी संस्कृतात लिहिले गेले. कामशास्त्र, तंत्रशास्त्र गुप्त ठेवल्याने त्यात नवीन सुधारणा, नवा तपास, संशोधन, प्रगती शून्य झाली. सगळे तत्त्वज्ञान, साहित्य इत्यादी वर्ण, जात आणिलिंगभेद यांनी ग्रस्त झाल्याने सर्वसामान्य लोकांत म्हणजे सर्व जातीजमातींत कोणत्याही ज्ञानाचा योग्य, यथार्थ प्रसार-प्रचार झाला नाही. आचरणात नीट काही उतरले नाही. त्यात कामशास्त्रही आहे. कामशास्त्र हा चांगल्या, समृद्ध जीवनाचा आराखडा देणारा ग्रंथ आहे, हे वाचल्याशिवाय कसे कळणार?

Wednesday, 10 December 2014

तत्त्वभान ४८ वैद्यकीय नीतिशास्त्र ११ डिसेंबर २०१४

medical ethics

वैद्यकीय नीतिशास्त्र
 श्रीनिवास हेमाडे
भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.

''औषधे घेणे टाळण्याचे प्रशिक्षण लोकांना देणे हे डॉक्टरचे आद्य कर्तव्य आहे''

           माणूस आणि विविध प्रकारच्या अतिसूक्ष्म ते महाकाय पशुपक्ष्यांचा नैतिक मूल्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणारी उपयोजित नीतिशास्त्राची शाखा म्हणजे जीवनीतिशास्त्र (बायोएथिक्स). मानवेतर पशुपक्षी हे माणसाचे केवळ सहनिवासी नाहीत तर नातेवाईक आहेत, असे जीवनीतिशास्त्र गृहीत धरते. त्यावर आधारित ''जगातील कोणत्याही मानवेतर सजीवाशी माणसाचे कोणते आणि कशा स्वरूपाचे नैतिक  नाते असावे'' याचा धोरणात्मक नैतिक निर्णय घेते. पृथ्वीवर जीवन कसे सुरू झाले, जीवनाचा अंत कसा होतो, शेतीविषयक संशोधन आणि वैद्यकीय संशोधनाची मूल्ये (वैज्ञानिक आणि नैतिक) कोणती? यांचा अभ्यास हे जीवनीतिशास्त्राचे मुख्य विषय आहेत. जीवनीतिशास्त्रातून वैद्यकीय नीतिशास्त्राचा उगम होतो. 
        सार्वजनिक आरोग्यविषयक धोरण, जीवनाचा अंत करण्याची नीती, साथीचे रोग, सजीवांचे प्रजनन, मानवी सुप्रजनन (?), प्राण्यांवरील प्रयोग, वैद्यकीय प्रशिक्षणात रोग्यांवर प्रयोग करण्याचे नीतिशास्त्र (क्लिनिकल एथिक्स), क्लोिनग आणि स्टेमसेल, जीवतंत्रज्ञान हे (तसेच नीतिशास्त्र आणि विज्ञान हा व्यापक मुद्दा) हे जीवनीतिशास्त्र आणि वैद्यकीय नीतिशास्त्र यांचे समान विषय आहेत. 
         हे विषय केवळ माणसापुरते सीमित करण्यात आले तेव्हा मानवी वैद्यकीय नीतिशास्त्र (मेडिकल एथिक्स किंवा ह्य़ूमन मेडिकल एथिक्स) अस्तित्वात आले. त्याच वेळी प्राणिहक्क, प्राण्यांवरील प्रयोग, त्यांचे पृथ्वीवर अस्तित्वात असण्याचे महत्त्व, प्राण्यांचे नैतिक व सौंदर्यशास्त्रीय मूल्य (विशेषत: बालकांच्या भावजीवनातील पशुपक्ष्यांचे अविभाज्य स्थान!) इत्यादींचा विचार होऊन प्राणिवैद्यकीय नीतिशास्त्र (अ‍ॅनिमल मेडिकल एथिक्स) अस्तित्वात आले. 
        हिप्पोक्रेटिसची (इ.स.पू. ४६०-३७०) शपथ, फॉम्र्युला कोमिटिस अर्कित्रोरम (इ.स.पू. पाचवे शतक) ही आचारसंहिता, रोमन डॉक्टर गालेन (१३१-२०१), इस्लामी परंपरेत इश्क इब्न अल-रुहावी या अरबी वैद्याचा आदाब अल-तबीब हा ग्रंथ, मुहम्मद इब्न झकेरिया आर-राझी आणि ज्यू वैद्य-तत्त्ववेत्ता माईमोनिडेस (११३५-१२०४), थॉमस अक्विनास (१२२५-१२७४) असा वैद्यकीय नीतिविचार सर्व संस्कृतीत आढळतो. थॉमस पर्सव्हिल (१७४०-१८०४) या ब्रिटिश डॉक्टरने प्रथम 'मेडिकल एथिक्स' आणि मेडिकल ज्युरिसप्रूडन्स हे शब्द वापरले. 
         वैद्यक व्यवसाय करताना डॉक्टर आणि इतर पूरक सेवा देणाऱ्या प्रत्येक सहकारी घटक व्यक्ती व संस्था यांनी कोणती नतिक मूल्ये आणि नतिक निर्णय उपयोजनात आणावेत, त्याचे मार्गदर्शन करणाऱ्या तत्त्वांची सुव्यवस्था रचना करणे म्हणजे वैद्यक व्यवसायाचे नीतिशास्त्र. वैद्यकाचा इतिहास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान या साऱ्यांचा यात समावेश होतो.
      'वैद्यकनीतीची चार सूत्रे (चतु:सूत्री) नावाने ओळखली जाणारी चार मूलतत्त्वे' 'प्रिन्सिपल्स ऑफ बायोमेडिकल एथिक्स' या ग्रंथात टॉम ब्यूचॅम्प आणि जेम्स चिल्ड्रेस (दोघे विद्यमान) अमेरिकन तत्त्ववेत्त्यांनी दिली आहेत. (१) रुग्णाची स्वायत्तता (उपचार घेण्याचा अथवा नाकारण्याचा रुग्णाचा हक्क), (२) परोपकारभाव (डॉक्टरने केवळ रुग्णाचे हित पाहावे म्हणजेच आíथक लोभ टाळावा), (३) रुग्णाविषयी केवळ शुद्ध व निखळ हितचिंतकवृत्ती (रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत इजा न करणे) बाळगावी, (४) न्यायबुद्धी (औषधांचा तुटवडा असताना उपलब्ध औषधांचे योग्य वाटप करणे आणि उपचार करताना कोणास कसे किती प्राधान्य द्यावयाचे याचे तारतम्य बाळगणे, म्हणजे रुग्णाबाबत रास्तपणा आणि समता बाळगणे). त्याचप्रमाणे हिप्पोक्रेटिसची शपथ, डॉक्टर-रुग्ण संबंध (पितृत्ववाद- डॉक्टरने रुग्णाचा पिता असणे), डॉक्टर-डॉक्टर संबंध आणि डॉक्टर-समाज संबंध असे मुख्य तीन दृष्टिकोन; विश्वासार्हता आणि सचोटी (रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना उपचाराची माहिती देणे व त्यांची संमती मिळविणे), रुग्णाची व्यक्ती म्हणून असलेली प्रतिष्ठा, रुग्णाचे हक्क आणि रुग्णाची कर्तव्ये या समस्यांचा समावेश या नीतिशास्त्रात होतो. 
        विसाव्या शतकाच्या अखेरीस गर्भपात (स्त्रीवादी चळवळीने आणलेला वैद्यकीय नतिक मुद्दा), दयामरण, स्वेच्छामरण, अवयवरोपण, आत्महत्या हे मुद्दे, विकसनशील देशांच्या संदर्भात आरोग्यविषयक उत्पादनांच्या पेटंटची समस्या, औषध उत्पादक कंपन्यांचे राजकारण, वैद्यकीय संशोधनातील पुढील टप्पे (उदा. जनुक संस्करणाची नतिक व वैज्ञानिक स्थिती), तसेच या व्यवसायास आलेले नफेखोरीच्या धंद्याचे स्वरूप, ग्राहक संरक्षण कायदा हे वैद्यकीय नीतीचे नवे उग्र प्रश्न आहेत. 
            भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. सृष्टी व जीवन यांच्यासंबंधी एका सुसंगत व समग्र विचारसरणी आयुर्वेदात मांडली आहे. आयुर्वेद हे एकमेव खरे भारतीय विज्ञान आहे. चरक (इ.पू. ३००) सुश्रुत (चरकाचे समकालीन) आणि वाग्भट (सातवे शतक) या तिघांना वृद्धत्रयी, बृहद्त्रयी या नावांनी ओळखले जाते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली. 
            भारतात इंडियन मेडिकल कौन्सिलने आचारसंहिता दिली आहे खरी, पण अतिमहागडे वैद्यक शिक्षण, औषध कंपन्यांची जीवघेणी स्पर्धा, विविध पातळ्यांवरील कट-पॅ्रक्टिस ते मृतदेहावर उपचार करण्यापर्यंत अधमपण अनुभवास येते. आरोग्य विमा (मेडिक्लेम)ने तर नवे हितसंबंधी राजकारण व अर्थकारण निर्माण केले आहे. भारतीय आरोग्य सेवा कुटुंबचलित आणि उद्योग समूहचलित ही खासगी आणि सरकारी सेवा ही सार्वजनिक असून दोन्हीकडे व्यापक प्रमाणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लूटमार आहे. ग्रामीण-आदिवासी भागात आणखी वेगळे प्रश्न आहेत. फोरम फॉर मेडिकल एथिक्स सोसायटीचे दि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स हे त्रमासिक १९९३ पासून सुरू झाले.
        प्राणी व्यावसायिक नीतिशास्त्र (व्हेटेरिनरी प्रोफेशनल एथिक्स) आणि प्राणी नीतिशास्त्र (अ‍ॅनिमल एथिक्स) यांनी मिळून प्राणिवैद्यक नीतिशास्त्र बनते. 'प्राण्यांचे आरोग्य' हा विषय अ‍ॅरिस्टॉटलपासून तत्त्ववेत्ते आणि वैद्यकजगतात चíचला जात आहे. माणसाने माणसाचे मानवी वैद्यक विज्ञान विकसित करणे, यात वेगळे वैशिष्टय़ नसून माणसाने प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे वैद्यक नीतिभान विकसित करणे यात आहे, असे म्हणता येईल.
          'वैद्यकाचे तत्त्वज्ञान' ही नवी ज्ञानशाखा एलिशा बार्टलेट (१८०४-१८५५) या डॉक्टर व कवी विचारवंतांच्या 'अ‍ॅसेज ऑन दि फिलॉसॉफी ऑफ मेडिकल सायन्स' या ग्रंथाने सुरू झाली. आधुनिक परिभाषेत लिहिले गेलेला हा जगातील अ‍ॅकेडेमिक स्वरूपाचा पहिला ग्रंथ मानला जातो. 'वैद्यकाचे तत्त्वज्ञान' हा विषय तत्त्वज्ञानात येतो की वैद्यकात, याबद्दल बराच खल होऊन ती आता आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा मानली जाते. 'डॉक्टर विचार कसा करतात?' (हाऊ डॉक्टर्स थिंक) या एकाच नावाचे दोन ग्रंथ गेल्या दशकात प्रकाशित झाले. वैद्यकीय मानव्यविद्या संशोधिका कॅथरिन मॉण्टगोमेरी (२००६) आणि डॉ. जेरोमी ग्रूपमन (२००७) यांनी ही पुस्तके लिहिली. 
       भारतात प्राणिनीतीचा विचार झाला आहे. पालकाप्य मुनीचा हस्त्यायुर्वेद आणि नारायण पंडिताचा मातंगलीला हे हत्तीसंबंधी मोठे वैद्यक ग्रंथ, बकरी, गाय इ. पशुचिकित्सेचा ग्रंथ म्हणजे १४ व्या शतकातील शारङ्गधर पद्धती. त्यातील 'उपवनविनोद' हा वृक्षवैद्यक विभाग आणि कुणी राघवभट्टाने लिहिलेल्या वृक्षायुर्वेद नामक ग्रंथाचा उल्लेख 'आयुर्वेद का इतिहास' या दुर्गादत्तशास्त्री लिखित पुस्तकात केला आहे, असे लक्ष्मणशास्त्री जोशी सांगतात.


Wednesday, 3 December 2014

तत्त्वभान ४७ भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे .. ०४ डिसेंबर २०१४


भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राकडे .... 

श्रीनिवास हेमाडे 
शेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले, कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले  उचलता येतील का?

इतर कोणत्याही गोष्टीची वाट पाहाता येते, पण शेतीविकासाची नाही.
         शेतीचे तत्त्वज्ञान, शेतीचे नीतिशास्त्र या दोन संकल्पना आणि शेती, शेतकरी, शेतीउत्पादने हा विषय पाश्चात्त्य-युरोपीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आज अग्रस्थानी आहे. 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' आणि 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' हा विषय भारतीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आणि शासकीय, प्रशासकीय निम्नसूचीतही कधीही आलेला नाही; पण आता तो अंमलबजावणीच्या पातळीवर अगदी ऐरणीवर अग्रस्थानी आणणे अत्यंत निकडीचे आहे. 
          या दोन्ही संकल्पनांचे देशी आणि समकालीन भारतीय प्रारूप बनविण्याकरिता काय करावे लागेल? उदाहरणार्थ, एक प्रारूप पाहू. ते असे : अमेरिकेतली नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सटिीच्या धर्म आणि तत्त्वज्ञान विभागाने नुकताच 'अन्नाचे तत्त्वज्ञान प्रकल्प' (द फिलॉसॉफी ऑफ फूड प्रोजेक्ट) सुरू केला आहे. तात्त्विक संशोधनाचा एक मूलभूत विषय म्हणून शेती आणि अन्न हा चर्चाविश्वात अग्रस्थानी आणणे, त्यातील नव्या तात्त्विक संशोधनाची माहिती राज्यकत्रे, धोरणकत्रे व सामान्य लोकांना देणे या विषयातील आंतरविद्याशाखीय संशोधकांना व इतर जिज्ञासू मंडळींना एकत्र आणणे हे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र अशा मुख्य शाखा विकसित करून शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी रचना ते निर्माण करीत आहेत. त्याचप्रमाणे अन्नाचे राज्यशास्त्र, अन्नतंत्रज्ञान आणि अन्नाशी जोडला गेलेला माणसाचा आत्मपरिचय व सामाजिक न्यायाचे वितरण (फूड आयडेंटिटी अँड जस्टिस) या विषयांचाही समावेश त्यांनी शेतीच्या तत्त्वज्ञानात केला आहे. त्यावर आधारित अभ्यासक्रम अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये, शाळा येथे शिकविले जातात. शेती, शेतीतील प्रत्येक कृती आणि शेतकऱ्यावर प्रेम (म्हणजे त्याचे अस्सल वास्तव कल्याण) हा शेतीच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा कायम ठेवून अनेक दृष्टिकोनांतून अभ्यास, संशोधन व लेखन यात होते आहे. या समग्र अभ्यासाची गंभीर दखल घेऊन सरकार, न्याय विभाग काटेकोर अंमलबजावणी करते.
          अर्थात हे प्रारूप आपणाला लागू पडेल किंवा तेच स्वीकारले पाहिजे, असे नाही. भारतीय शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र रचून आपण आपले देशी 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' विकसित करू शकू. काहीएक सुरुवात करणे आवश्यक आहे. 
            पाश्चात्त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात शेतीधोरण शोधले तसे आपणही आपल्या तत्त्वज्ञानात काही बीज सापडते का ते पाहावयाचे, त्यात समकालीन कालसुसंगत भर टाकावयाची आणि त्यातून 'भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान' विकसित करावयाचे. उदाहरणार्थ, कृषिसूक्त, भूमिसूक्त, अन्नसूक्त यांना आणि अन्नाचे रूप धारण करणारे देव आणि अन्नाची इच्छा व्यक्त करणाऱ्या शेकडो ऋचांना ज्येष्ठ विचारवंत स. रा. गाडगीळ अन्नब्रह्मवाद (फूड फिलॉसॉफी) म्हणतात. जमिनीचे व्यवस्थापन, निगराणी, महसूल आणि शेती व्यवसायाचा धोरणात्मक विचार बादशहा अकबर, त्याचे अधिकारी राजा तोडरमल आणि मुझफ्फर खान या अधिकाऱ्यांनी आणलेली मनसबदारी पद्धती, छत्रपती शिवरायांची 'आज्ञापत्रे', त्यानंतर म. जोतिराव फुल्यांच्या लेखनात आढळतो. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च या भारतातील तत्त्वज्ञानाच्या शिखर संस्थेने बाराव्या शतकापर्यंतचा भारतीय शेतीचा इतिहास खंड रूपाने (सं. लल्लनजी गोपाल, व्ही. सी. श्रीवास्तव) प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक आधार मिळू शकतात.
           शेतीकडे अर्थव्यवस्थेचा कणा व जीवनाचे इहवादी तत्त्वज्ञान म्हणूनच पाहणे हे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान या विषयाची तात्त्विक बाजू मानता येईल. नियती, नशीब, कर्मफळ, जातिव्यवस्था, स्त्रीशोषण यांचा पुरस्कार करणारे पारंपरिक जीवनविषयक तत्त्वज्ञान; त्यावर आधारित पुराणे, कथा, प्रवचने इत्यादी साहित्याचा त्याग करणे आणि नवे शेतीपूरक, शोषणरहित, समतापूर्ण सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे विचार परंपरेत शोधणे किंवा निर्माण करणे, जगातील ज्या तत्त्वज्ञानातून अशी तत्त्वे मिळतील तिथून ती आत्मसात करणे, त्यांचा समावेश करून या नव्या तत्त्वज्ञानाची रचना करणे ही भारतीय शेतीच्या तत्त्वज्ञानाची काही आधारभूत तत्त्वे मानता येतील.
            शेतीला प्राधान्य देणारे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान रचले गेले की भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचता येईल. त्यासाठी भारतीय शेती व्यवसायाचा इतिहास, विद्यमान स्थिती आणि आधुनिक जागतिक नीतिव्यवस्था यांची सांगड घालणे आवश्यक आहे. भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा मुख्य विषय भारतीय समाजजीवनास चपखल लागू असणारी सार्वजनिक धोरणे निश्चित करणे हा आहे. पण भारतीय शेतीक्षेत्राचा इतिहास पाहिल्याशिवाय भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे फार कठीण आहे. भारताला विस्तीर्ण भूगोल आणि जडशीळ ओझं बनलेला प्रदीर्घ इतिहास आहे. तो शेती इतिहासाबरोबर वर्णजाती-जमाती व िलगभेदग्रस्त शोषणव्यवस्थेचाही इतिहास आहे. कॉ. शरद पाटील, देबिप्रसाद भट्टाचार्य, आ. ह. साळुंखे, वंदना शिवा यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञांनी त्या इतिहासावर बोट ठेवले. भारतीय शेतीचे आधुनिक नीतितत्त्वज्ञ म्हणून म. जोतिराव फुले आणि कॉ. शरद पाटील आणि समकालीन शेतीनीतिशास्त्रज्ञ म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे नाव घेणे अनिवार्य आहे. 
        'आम्ही आपल्या स्थानिक गरजेवर आधारित शेतीनीतिशास्त्राची व्याख्या कशी करावी? ही आमची समस्या आहे', असा प्रश्न आधुनिक काळातील शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उपस्थित केला पाहिजे. आधुनिक विद्य्ोची जोड देऊन विद्यमान भारतीय समाजव्यवस्था आणि भारतीय मानसव्यवस्था लक्षात घेऊनच सार्वजनिक हिताची धोरणे शेतीनीतिशास्त्राच्या सूचीत निश्चित करता येतील. समाजसेवा (सोशल सव्‍‌र्हिस), व्यवसाय (प्रोफेशन), धंदा (बिझनेस), आवडीचा छंद (व्होकेशन), नफेखोरीचा धंदा (ट्रेड), उद्योगसमूह (कॉपरेरेशन/ कंपनी) यातील नेमके काय म्हणून शेतीकडे पाहावायचे हे धोरण ठरविणे हा भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा कळीचा प्रश्न मानता येईल.
             शेतीचे नीतिशास्त्र हा प्रकल्प राबविण्याकरिता पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी उपयोजनात आणलेली वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांचा पुरेपूर उपयोग 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' रचताना होऊ शकतो. त्यांना भारतीय तत्त्वज्ञानातील आणि इतर विचारविश्वातील वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांची जोड देता येईल. त्यास 'भारतीय शेतीचे तर्कशास्त्र' म्हणता येईल.
         या विद्याशाखा आकारल्यानंतरच त्यांचा समावेश शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर करता येईल.
            जगात सर्वत्र तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात शेती तत्त्वज्ञान व शेती नीतिशास्त्रविषयक व्यापक वैचारिक साहित्य निर्माण करण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेषत: अमेरिकन विद्यापीठात अनेक पदव्या, अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध भिख्खू बुद्धदास (१९०६-१९९३) यांची शेतीधम्म (अ‍ॅग्री धम्मा) ही संकल्पना लिंडसे फालयेव या विचारवंताने थाई भाषेतून इंग्रजीत आणली आहे. फूड पॉलिटिक्स (मेरीओन नेसले २०१३), फिलॉसॉफी ऑफ फूड (सं. डेविड काप्लान, २०१२), फूड अँड फिलॉसॉफी (फ्रित्झ ऑलहॉफ, डेव मनरो, २००७), कुकिंग, ईटिंग, िथकिंग : ट्रान्सफॉरमेटिव्ह फिलॉसॉफीज ऑफ फूड (डीएन कर्टीन, लिसा हेल्डेक, १९९२) ही पाश्चात्त्य ग्रंथांची वानगीदाखल काही नावे.
       भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग, शेतीतज्ज्ञ, शेतीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, क्षेत्रीय अभ्यासक, शेतकरी संघटना, माध्यमे, बिगरसरकारी संस्था, रसायन, भूगोल, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र, अभियांत्रिकी या विषयांतील तज्ज्ञ, सीए इन्स्टिटय़ूट, तत्त्ववेत्ते व व्यावसायिक तत्त्ववेत्ते आणि आणखीही गरजेनुसार इतर तज्ज्ञ आणि कार्यकत्रे यांनी एकत्र येणे तातडीचे आहे.

Live Paper Link                 E-Paper Link 

Thursday, 27 November 2014

तत्त्वभान ४६ पूर्वार्ध - शेतीचे नीतिशास्त्र - वेद व महाकाव्ये २७ नोव्हेंबर २०१४


Ethics in Agriculture
शेतीचे नीतिशास्त्र - 
वेद व महाकाव्ये

श्रीनिवास हेमाडे 
शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते. अर्थात, भारतात 'शेतीचे नीतिशास्त्र' असे वेगळे कोणी लिहिले नाही. आहे ते स्फुटलेखन, हेही खरे..
        'शेतीचे नीतिशास्त्र' ही पाश्चात्त्य आणि आंग्लेतर- उर्वरित युरोपीय (काँटिनेंटल) तत्त्वज्ञानातून विकसित होत असलेली संकल्पना आहे. भारतीय शेतकरीवर्ग, शेतकरी संघटना नेते, कार्यकर्ते, धोरणकर्ते, शेती मंत्रालय आणि शासन तसेच अभ्यासक, विचारवंत इत्यादींच्या विचारविश्वात ती नवी आहे, यात शंका नाही. राजकारणात 'शेतकरी राजा' या नामाभिधानाने मिरविणाऱ्यांनाही ती नवी असू शकते. भारतातील विद्यापीठीय-महाविद्यालयीन स्तरावरील अ‍ॅकेडेमिक विश्वातही ती नवीच आहे. 
         'शेतीचे तत्त्वज्ञान' आणि 'शेतीचे नीतिशास्त्र' या नावाची स्वतंत्र विद्याशाखा निर्माण होईल, इतके मुबलक साहित्य वैदिक आणि अवैदिक (तांत्रिक व लोकायतसह) विचारविश्वात उपलब्ध आहे की काय हे शोधावे लागेल. अर्थात भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याचा दावा करताना निश्चित शेतीविचार भारताकडे आहे, असे म्हणावयाचे असते आणि तसे विचार भारतीय वाङ्मयात आहेत. पण ते सारे स्फुटलेखन आहे. त्या लेखनाचे स्वरूप पाहू. 
        वेदविषयक साहित्यात भूमिसूक्त, कृषिसूक्त व अक्षसूक्त या तीन सूक्तांमध्ये पर्यावरणविचार व शेतीविचार आणि अन्यत्र काही तुरळक आनुषंगिक विचार मांडला आहे. अथर्ववेदातील भूमिसूक्त (अथर्ववेद १२.१) पृथ्वी ही सर्वाची आई असल्याचे सांगते ('माता भूमि: पुत्रो? हं पृथिव्या:'). ही भूमिमाता सर्व पाíथव पदार्थाची जननी व पोषण करते, प्रजेचे सर्व प्रकारचे क्लेश, दु:खे, अनर्थ यांपासून संरक्षण करते. 
         ऋग्वेदात दोन सूक्ते आहेत. पहिल्या, कृषिसूक्तात (ऋग्वेद ४.५७) शेतीचा उल्लेख 'मानवाचे सौभाग्य वाढविणारी' असा आहे. नांगरलेल्या जमिनीवर इंद्राने चांगला पाऊस पाडावा, तसेच सूर्याने आपल्या उत्कृष्ट किरणांनी तिचे रक्षण व संवर्धन करावे, अशी इच्छा या सूक्तकर्त्यांने केली आहे. बल नांगराला जोडणे, नांगरटीस सुरुवात करताना, नांगराची पूजा करताना हे सूक्त म्हटले पाहिजे. ऋग्वेदातील दुसऱ्या 'अक्षसूक्त' (१०.३४) मध्ये जुगाऱ्याला केलेला उपदेश या स्वरूपात शेतीचा उल्लेख आहे. कुणी कवष ऐलूषच्या नावावरील ते सूक्त १४ ऋचांचे असून जुगारी आणि अक्ष म्हणजे फासे यांचे दोष व दुष्परिणाम मार्मिक रीतीने दाखविताना उपदेश केला आहे, की 'शेती कर. फासे खेळू नकोस, संपत्ती असेल तिथेच गायी आणि बायको राहतात.' 
       'अन्नदानसूक्ता'त (ऋग्वेद १०.११७) किंवा धनान्नदान सूक्त या नऊ ऋचांच्या सूक्तात स्वार्थी, अप्पलपोटय़ा माणसाची िनदा केली आहे. स्वार्थीपणा करणे म्हणजे दुसऱ्याचा वध करणे होय, असे सांगून अन्नदानाची महती स्पष्ट केली आहे. या सूक्तास 'भिक्षुसूक्त' म्हणतात. हा श्रीमंतांना केलेला उपदेश आहे. पूर्वजन्माच्या पापामुळे दारिद्रय़ भोगावे लागते, या भयानक गरसमजुतीला जोरदार तडाखा देणारे हे सूक्त आहे. मृत्यू केवळ गरिबांनाच येतो, श्रीमंतांना येत नाही असे नाही. उलट लक्ष्मी चंचल असल्यामुळे श्रीमंत माणूसही क्षणात दरिद्री होऊ शकतो. म्हणून जवळ धन व अन्न असेपर्यंत धनवानाने गरिबांना धन, अन्न यांची दानरूपाने मदत करावी व गरिबांशी मत्री करावी, तेच मित्र आपल्या गरिबीत उपयोगी येतात, असे यात सांगितले आहे. नि:स्वार्थी समाजकर्तव्य सांगणारे हे सूक्त आधुनिक काळातही यथार्थ आहे. 
           सरस्वतीचा उल्लेख नदी आणि देवी असा येतो. सरस्वती म्हणजे सरोवराच्या काठी राहणारी देवता किंवा स्त्री-समूह, पर्यायाने नदीकिनारीची वस्ती. विश्वामित्रनदीसंवाद या सूक्तात महर्षी विश्वामित्र नदीला आई मानतात. अथर्ववेदातील काही मंत्रांना 'पौष्टिक मंत्र' म्हणतात. शेतकरी, धनगर, व्यापारी इत्यादी व्यावसायिकांना यश मिळावे, अशी भावना त्यातून व्यक्त होते. पाकयज्ञ, ग्रामनगरसंवर्धन, कृषिसंवर्धनाचे मंत्र यात आहेत. 
        ऋग्वेदाचा समग्र अर्थ लावणारे 'ऋग्वेदभाष्य'कार आणि शृंगेरीमठावरील आचार्य सायणाचार्य (मृत्यू १३८७) यांनी वेदांतील ब्रह्मणस्पती या देवतेला अन्नपती म्हटले आहे. ही शेतीदेवता आहे. त्यांच्या मते, ब्रह्म म्हणजे सतत वाढणारे! जे सतत वाढते ते अन्नच असते. सायणाचार्य 'ब्रह्म स्तोत्ररूपमन्नं हविर्लक्षणमन्नं वा' अशी व्याख्या करतात. स्तोत्ररूप अन्न हे ब्रह्म आहे आणि आहुती दिले जाणारे अन्न हेसुद्धा ब्रह्मच आहे. पुढे ते म्हणतात, 'अन्नस्य परिवृद्धस्य कर्मण: पति पालयिता' (अन्ननिर्मितीच्या कर्माचे पोषण करणारा म्हणजे शेतकरी.) 'बृह' धातू आणि 'बृंह्' धातू यांचा समान अर्थ वाढत जाणे. 'बृह' धातूपासून ब्रह्म, ब्राह्मण, ब्राह्मणस्पती, बृहस्पती असे शब्द बनतात. म्हणून सायणाचार्य अन्न पिकवितो तो ब्राह्मणस्पती असे म्हणतात. शेतकऱ्याचे ब्रह्म जीवनधारणेशी जोडलेले म्हणून ते अन्न हेच ब्रह्म हे समीकरण या होते. उपनिषदात एके ठिकाणी 'अन्नं ब्रह्म' असे म्हटलेले दिसते. शंकराचार्यानी अन्नपूर्णाष्टकम स्रोताची रचना केली. आर्य शब्दाचा मूळ अर्थ पेरणी करणारा कृषक असा होतो. कुणीतरी पृथुवैन्य नामक आर्य तत्कालीन कृषिक्रांतीचा जनक मानला जातो.
      सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांच्या मते बहुतेक ऋचांमध्ये, सूक्तांमध्ये अन्नाचीच इच्छा दर्शविली जाते. या ऋषींचे विचार आणि देवदेखील अन्नाचे रूप धारण करतात. युजर्वेदाच्या एका भागाला वाजसनेयी संहिता असे नाव आहे. वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय म्हणजे पाणी यासाठी केला जाणारा विधी. तंत्र या शब्दाचा मूळ अर्थही शेती करणे असाच असावा.
          रामायणातील कृषिसंस्कृतीसुद्धा सूचक आहे. सीता म्हणजे नांगरट न झालेली जमीन म्हणून व उपजाऊ सकस जमीन, सीताराम = नांगर वापरून कृषितंत्र जाणणारा, अहल्या = नांगर न फिरलेली, भरड जमीन, तारा = नदीच्या मध्यातील खुली जमीन, मंदोदरी (मंद + उदरी) = विलंबाने पिके देणारी जमीन, द्रौपदी ही जमिनीचेच प्रतीक होती. (जमीन भावांपकी कुणीही कसली तरी तिच्यावर केवळ थोरल्या भावाचाच हक्क असावा, या पुरुषी संस्कृतीला कुंतीने समान वाटणी करून जमिनीच्या तुकडीकरणाचा दावा हाणून पडला.) 
         महाभारतातील बलराम हा नांगरधारी शेतकरीच होता. क्षत्रिय हा शब्दसुद्धा क्षेत्र जो कसतो तो. बौद्ध वाङ्मयातील खेताचा अधिपती तो खत्तीय अशी व्याख्या आहे. कामधेनु = ही जंगले तोडून वस्ती करणारी शेतकऱ्यांची संस्कृती. क्षेत्र कसतो तोच क्षत्रिय, त्याला बौद्ध संज्ञा खत्तीय,हिंदीत शेताला खेत म्हणतात. ऋग्वेदातील मुख्य पशुदेव म्हणजे वृषभ - बल आणि गाय याच आहेत. कामधेनू ही संकल्पनासुद्धा जंगले तोडून मानवी वस्ती करणारी व शेती पिकविणाऱ्या कृषिकांची म्हणजे शेतकऱ्यांची संस्कृती होती. या साऱ्या संदर्भात 'कृषिकेंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती' हे प्र. म. ना. लोही यांचे पुस्तक उपयुक्त आहे. 
        आता, हे आणि असे अन्य काही वैचारिक साहित्य 'भारतीय शेतीचे नीतिशास्त्र' या नावाची नवीन वैचारिक घटना निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल का? असा प्रश्न उपस्थित करता येईल. या वैचारिक साहित्यातही अवैदिकांपकी केवळ चार्वाक दर्शनात सुस्पष्ट रूपात शेती, उद्योग, व्यवसायविषयक सामाजिक व नैतिक धोरण दिसते. तेव्हा भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे कसे शक्य होईल, ते या लेखाच्या उत्तरार्धात पाहू.
(उत्तरार्ध पुढील गुरुवारी)


Thursday, 20 November 2014

तत्त्वभान ४५ शेतीचे नीतिशास्त्र २० नोव्हेंबर २०१४

शेतीचे नीतिशास्त्र

श्रीनिवास हेमाडे 

               शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि 'जगण्याचा समान हक्क' मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..

शेती व्यवसायाचा आणि तत्त्वज्ञानाचा संबंध काय? याची दोन उत्तरे शक्य आहेत. पहिले असे की शेती करणे ही मूलभूत नतिक कृती आहे. त्यामुळे शेतीचे नीतिशास्त्र रचणे, त्या शास्त्राची बौद्धिक मांडणे करणे यातून शेतीचा तत्त्वज्ञानाशी संबंध येतो. दुसरे म्हणजे शेती करण्यामागील मानवी बौद्धिक श्रम लक्षात घेऊनच शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी ज्ञानशाखा विकसित होते. ही मांडणी लिंडसे फालवेय् (१९५०) या ऑस्ट्रेलियन विचारवंताने केली. 
शेतीचे नीतिशास्त्र ही मुख्यत सार्वजनिक धोरणांशी निगडित असलेल्या नैतिक समस्यांवर शक्य असलेल्या उपाययोजनांची तात्त्विक आणि नैतिक दृष्टिकोनातून चर्चा करणारी उपयोजित नीतिशास्त्रातील नवी उगवती उपशाखा आहे. अन्नाचे उत्पादन आणि इतर औद्योगिक उत्पादनासाठी नसíगक, जैविक साधनसंपत्ती यांचा वापर केला जात असताना दूरदर्शीपणा, रास्तपणा आणि मानवी चेहरा टिकविणारे व्यवस्थापन कसे होईल, याच्याशी ते निगडित आहे. शेतीविषयक धोरणे ही नेहमीच सार्वजनिक धोरणे असतात,याचे भान शेतीचे नीतिशास्त्र विकसित करते.
बेन मेफम (विद्यमान) या शेतीतज्ज्ञ आणि तत्त्ववेत्त्याच्या मते, इतर कोणत्याही उद्योगधंद्यातील उत्पादनापेक्षा 'अन्न' हे शेती संस्कृतीचे उत्पादनाचे स्वरूप मूलत वैशिष्टय़पूर्ण आहे. इतर मानवी उत्पादनाच्या तुलनेत अन्न हे प्रत्येक मानवाला आणि मानवेतर जिवांना केवळ विधायक अर्थाने जगण्याचा मूलभूत हक्क देते. परिणामी अन्न हेच केवळ निखळ, नि:संशय, निसंदिग्ध, निरपेक्ष, सुस्पष्ट नैतिक दर्जा असणारे एकमेवाद्वितीय उत्पादन आहे.
शेतीच्या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट सामाजिक कराराच्या संदर्भात सार्वजनिक धोरण ठरविणे आणि त्या धोरणाचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यासाठी समर्पक ठरू शकेल अशी, सुसंगत आणि एकात्म नतिक चौकटीची योजना करणे, हे आहे. इथे सामाजिक करार याचा अर्थ सामाजिक सहकार्य, कायदेशीर रक्षण आणि उचित प्रशासन राबविण्याकरिता समाजातील सर्व सदस्यांनी एकमेकांत केलेला अलिखित करारनामा असा आहे. असा करार लोकशाहीतच कल्पनीय असल्याने, शेतीचे नीतिशास्त्र ही लोकशाही जीवनशैलीतच शक्य असणारी तात्त्विक विचारसरणी आहे. गरिबातील गरीब नागरिकालाही परवडणारे सुरक्षित, पोषक अन्न पुरविणे हे लोकशाहीचे काम असते. त्यामुळे करार करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि शासन यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी ते किमान मुद्दय़ावर एकत्र येणे, हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी नेहमीच हितावह असेल; अशा सामंजस्याचा सामाजिक करार राबविला गेला पाहिजे. मेफमच्या मते, या प्रक्रियेत नतिक भूमिका म्हणजे योग्य धोरणे ठरविणे हे नाही तर, प्रस्तावित विशिष्ट धोरणे नैतिकदृष्टय़ा स्वीकारणे समर्थनीय आहेत की नाहीत याचे मूल्यमापन करण्यासाठी मदत करणारे नैतिक सिद्धान्त रचणे असते. 
मेफमच्या निरीक्षणानुसार जमिनीची मालकी, जमिनीचे शोषण आणि या शोषणाचा तिच्या उपजक्षमतेवर होणारा परिणाम या तीन मुख्य घटकांमधून शेतीविषयक अनंत नतिक समस्या उद्भवतात. मेफमच्या मते, शेतीविषयक नैतिक समस्यांचे तीन गट आणि शेतीविषयक नैतिक सिद्धान्ताचे असे दोन गट अधोरेखित करता येतील. यापैकी 'नतिक समस्यां'चे उपगट असे: (१) आíथक-सामाजिक रचना [न्याय कुणाला? कसा?](२) जैवनीतिशास्त्रीय दृष्टिकोन [प्रामुख्याने जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनामुळे व इतर प्रगत विज्ञान-तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या समस्या.](३) शेती-पर्यावरणीय दृष्टिकोन [शेतीचा भौतिक तसेच सामाजिक पर्यावरणावर होणारा परिणाम ].
नैतिक सिद्धांताचे असे दोन गट असे : (२)प्रक्रियाकेन्द्री आणि (२) आशयकेन्द्री.  प्रक्रियाकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे घेतले जाणारे निर्णय गटबाजीचे व हितसंबंधी आहेत की सार्वजनिक हिताचे आहेत, यापेक्षा निर्णय कसे घेतले जातात याच्याशी संबंधित असणारे (वैधानिक बहुमत, शेतकऱ्यांच्या वा राजकीय संघटना, पक्ष तसेच एखाद्या उद्योगसमूहाचा विविध प्रकारचा दबाव वा छोटय़ा गटात 'दादा'गिरी, साहेबांचे 'एक'मत). आशयकेन्द्री नैतिक सिद्धान्त म्हणजे प्रस्तावित धोरणांचा तपशीलवार आशय विचारात घेऊन रचला जाणारा सिद्धान्त (उपयुक्ततावादी किंवा कर्तव्यतावादी). दुसऱ्या प्रकारचे पुन्हा आणखी काही उपप्रकार आहेत.
पॉल थॉमसन या अमेरिकन शेतीनीतिज्ञाच्या मते, शेतीच्या नीतिशास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या समस्यांचे तीन विभाग आहेत : (१) मानवी आरोग्य आणि सुरक्षा (२) पर्यावरण ऱ्हासाचा व्यापक प्रश्न (३) एक जीवनमार्ग म्हणून आणि कुटुंब, चालीरीती इ. विविध सामाजिक संस्थांशी असलेला शेतीचा संबंध पाहता शेतीची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक उचितता, हे आहेत. पहिला विभाग, साधे रोजचे जेवण, ठरविलेला आहार, पोषण व अन्न सुरक्षा याच्याशी निगडित आहे. दुसरा विभाग, शेतीविषयक पर्यावरणीय व्यवस्था आणि त्या बाबतचे माणसाचे उत्तरदायित्व (प्राण्यांचा जगण्याचा हक्क, शाकाहारवाद इ.), तिसरा विभाग, शेतीचे औद्योगिकीकरणाशी (कॉर्पोरेटीकरण) निगडित आहे.
थॉमसनच्या मते, शेतीविषयक नैतिक विचारांचा इतिहास झेनोफोन (इ.स.पू. ४४४-३७५) आणि अ‍ॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२) यांच्यापासून सुरू होतो. मग तमोयुगाचा काळ वगळता हा इतिहास लॉर्ड फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६) पासून पुन्हा सरू होतो. बेकनने विज्ञान आणि शेतीविकास या संबंधात पहिले सविस्तर यथार्थ लिखाण केले. लागवड-मशागतीचा पहिला वैज्ञानिक ग्रंथराज शेतीतज्ज्ञ जेथ्रो टूल (१६२७-१७४१) याने १७३३ साली लिहिला. जॉन लॉक (१६३२-१७०४), मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५), हेगेल (१७७०-१८३१), थॉमस माल्थस (१७६६-१८३४), बेंथम (१७४८-१८३२), जॉन स्टुअर्ट मिल (१८०६-१८७३) यांनी विविध अंगांनी शेतीविषयक मतप्रदर्शन केले. तथापि अनेक गतकालीन तत्त्ववेत्त्यांच्या शेतीविषयक लेखनाकडे समाजाचे आणि शासनाचे दुर्लक्ष झाले, अशी खंत थॉमसन व्यक्त करतो. विज्ञान-तंत्रज्ञानाशी लगटून असूनही शेतीच्या नीतिशास्त्राच्या तात्त्विक इतिहासात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. 
त्यानंतर थेट विसाव्या शतकात ग्लेन एल जॉन्सन (१९१८-२००३) या शेती अर्थशास्त्रज्ञाने शेतीविज्ञानावर अनेक चांगल्या, विधायक लेखमाला लिहिल्यानंतर या विषयाकडे लोकांचे लक्ष गेले. वेन्डेल बेरी या कवी-कादंबरीकाराने लिहिलेल्या 'द अन-सेटलिंग ऑफ अमेरिका' (१९७७) या ग्रंथात औद्योगिक शेती, विद्यापीठांना मोठय़ा जमिनी दान करणे आणि आधुनिक शेतीविज्ञान यावर तात्त्विक मर्मग्राही टीका केली. त्यामुळे तत्त्ववेत्त्यांचे शेतीतील नतिक नैतिक समस्यांकडे लक्ष वेधले गेले. लिबर्टी बेले (१८५८-१९५४) हा अमेरिकन शेतीशास्त्रज्ञ, सर अल्बर्ट हॉवर्ड (१८७३-१९४७) यांच्या 'अ‍ॅन अ‍ॅग्रिकल्चरल टेस्टामेंट' आणि 'सॉइल अँड हेल्थ' या ग्रंथांनी मोठी क्रांती केली. पीटर सिंगर, ओनोरा ओनील आणि अमर्त्य सेन (सर्व विद्यमान) यांनी भूकबळीची समस्या हाताळली. गॅरेट हार्डीन (१९७५-२००३) आणि नॉर्मन बोरलॉग यांनी लोकसंख्या वाढ आणि अन्न उत्पादन प्रक्रियेतील तणावाचे विश्लेषण केले. राशेल कारसन (१९०७-१९७६) या विदूषीने शेतीच्या विषारीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला. कॅरोलिन साख या विदूषीने आणि भारतात वंदना शिवा यांनी पहिल्यांदा शेतीचा स्त्रीवादी अभ्यास पुढे आणला. नंतर थॉमस रुहेर, अ‍ॅलन रोसेनफिल्ड यांनी प्रथम शेतीचे नीतिशास्त्र ही नवी विद्याशाखा १९८० मध्ये शिकविण्यास सुरुवात केली. १९९० मध्ये गॅरी कॉमस्टॉक यांनी शेती नीतिशास्त्रावर शेकडो कार्यशाळा घेतल्या. पॉल थॉमसन हा पहिला तत्त्वज्ञ अधिकृतरीत्या टेक्सास- मध्ये शेती नीतिशास्त्रज्ञ म्हणून नेमला गेला. बेन मेफम यांनी १९९० मध्ये जागतिक परिषद आयोजित केली. १९९८ मध्ये प्रथम 'द युरोपियन सोसायटीफॉर अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड एथिक्स' स्थापन झाली. २००० मध्ये ' द जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड एन्व्हायर्न्मेंटल एथिक्स'चा पहिला अंक दिमाखात प्रकाशित झाला. 'एन्सायक्लोपीडिया ऑफ फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर एथिक्स 'ची पहिली आवृत्ती १९९८ मध्येच आली होती, तर या वर्षी - २०१४ साली त्याची नवी आवृत्ती आली. 
    भारतात काय घडले ते पुढील लेखात !

Wednesday, 12 November 2014

तत्त्वभान ४४ पर्यावरण नीतिशास्त्र १३ नोव्हेंबर २०१४

डॉ. अल्बर्ट श्वायत्झर

पर्यावरण नीतिशास्त्र 
श्रीनिवास हेमाडे 
'पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे' अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे..हा झगडा मात्र नव्हे. तो दृष्टिकोनातील फरक आहे, हे समजून घ्यायला हवे..
               पर्यावरणाचा विचार पर्यावरणवाद आणि पर्यावरण अध्ययन यात होतो. पण पर्यावरण नीतिशास्त्र त्यापेक्षा भिन्न दृष्टिकोनातून मानव आणि परिसर यांच्या नात्याचा शोध घेते. पर्यावरणवाद (Environmentalism) हा पर्यावरणविषयक विविध सिद्धांत, पर्यावरण प्रणाली आणि सामाजिक चळवळी यांचा समावेश असलेले व्यापक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आहे. दबाव गट स्थापन करणे, चळवळी करणे आणि प्रशिक्षण देणे ही कामे पर्यावरणवाद करतो. पर्यावरण अध्ययन (Environmental studies) ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणाचा अभ्यास करणारी शाखा आहे. पर्यावरण नीतिशास्त्र हा तत्त्वज्ञानाचा हिस्सा आहे. नीतीविषयक विचारांची कक्षा केवळ मानवापुरती न ठेवता, मानवासह मानवेतर सजीवांनाही सामावून घेईल अशी व इतकी व्यापक करावी, असे मध्यवर्ती धोरण स्वीकारावे; असा धोरणात्मक नैतिकतेचा आग्रह धरणारी ही उपयोजित नीतिशास्त्राची शाखा आहे. पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरण समाजशास्त्र, पर्यावरण धर्मशास्त्र, पर्यावरण अर्थशास्त्र, पर्यावरण भूगोल व खुद्द पर्यावरण विज्ञान अशा अनेक सामाजिक व नसíगक विज्ञानांचा चिंतनविषय असणारे हे आंतरविद्याशाखीय नीतिशास्त्र आहे. जैवनीतिशास्त्र, व्यावसायिक नीतिशास्त्र, धंद्याचे नीतिशास्त्र व अभियांत्रिकी नीतिशास्त्र यांच्याशी त्याचा अतिशय गुंतागुंतीचा संबंध आहे. 
         सन १९१५ मध्ये डॉ. अल्बर्ट श्वायत्झर (१८७५-१९६५) या जर्मन डॉक्टर तत्त्ववेत्त्याने मांडलेला 'जीवनविषयक पूज्यभाव' (The Reverence for Life) हा विचार जगातील पहिला पर्यावरणनीतीचा विचार मानला जातो. जीवन या संकल्पनेत श्वायत्झर यांनी पृथ्वी आणि सर्व सजीव सृष्टीचा समावेश केला. त्यानंतर पॉल टेलर (१९२३.) या अमेरिकन विचारवंताचा 'निसर्गाविषयीचा आदर' सिद्धांत, आल्डो लिओपोल्ड (१८८७-१९४८) या विख्यात पर्यावरण तत्त्ववेत्त्याच्या दि सॅण्ड कौंटी अल्मॅनक (१९४९) या पुस्तकातील भूमी नीती (Land Ethics) सिद्धांत आणि राशेल कार्सन या सागर जीवशास्त्रज्ञ विदुषीच्या Silent Spring (१९६२) या पुस्तकांनी या विषयाला तोंड फुटले. नंतर Science या अमेरिकन नियतकालिकात 'दि हिस्टॉरिकल रूट्स ऑफ आवर इकोलॉजिक क्रायसिस' (१९६८) या लिन व्हाइट्स आणि गॅरट हार्डीन या प्राणिशास्त्रज्ञ पर्यावरणतज्ज्ञाच्या (१९१५-२००३) 'दि ट्रॅजेडी ऑफ दि कॉमन्स' (१९६८) या निबंधाने आणि 'एक्स्प्लोिरग न्यू एथिक्स फॉर सरव्हायवल : दि व्हायेज ऑफ दि स्पेसशिप बिगल' (१९७२) या पुस्तकाने या विद्याशाखेच्या अभ्यासाचा पाया रचला. विशेषत: राशेल कार्सनने डी.डी.टी. व इतर रासायनिक औषधांमुळे पिके विषारी बनणे, मानव व मानवेतर प्राणी नष्ट होण्याचा सिद्धांत मांडल्यानंतर पॉल एलरीचच्या The Population Bomb या पुस्तकाने भर घातली. आणि १९७० च्या पहिल्या जागतिक वसुंधरा दिन परिषदेनंतर पर्यावरणाचे नीतिशास्त्र या यथार्थ नावाने ही नवी विद्याशाखा अस्तित्वात आली. स्कॉटिश भूगर्भशास्त्रज्ञ जेम्स हटन (१७२६-१७९७), रशियन भूरसायनशास्त्रज्ञ व्लादिमिर वेर्नाद्स्की (१८४५-१९६३), ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स लव्हलॉक (१९१९) व त्याच देशातील पत्रकार, छायाचित्रकार गाय मूरची (१९०७-१९९७), तत्त्ववेत्ते स्टीफन क्लार्क (१९४५) तसेच अमेरिकी जीवशास्त्रज्ञ लिन मार्गुलीस (१९३८-२०११) यांच्या पर्यावरणविषयक मांडणीतून विसाव्या शतकात गय्या नीतिशास्त्र विकसित झाले. गैय्या (Gaia) म्हणजे ग्रीक भाषेत पृथ्वी किंवा भूदेवी. १९७० साली अमेरिकेत Environmental Ethics हे नियतकालिक सुरू झाले. 
          पर्यावरण नीतिशास्त्र मुख्यत: पाच समस्यांचा अभ्यास करते. (१) विविध प्रकारचे प्रदूषण (२) नसíगक साधनसंपत्तीचा दुरुपयोग (३) वाढती लोकसंख्या (४) प्राण्यांविषयी माणसाची अभिवृत्ती आणि माणूस त्यांना देत असलेली वागणूक (५) विविध प्रकारच्या पर्यावरण प्रणालींचे स्वयंसिद्ध मूल्य. पर्यावरण नीतिशास्त्र या विद्याशाखेत ईश्वरकेंद्रवाद, मानवकेंद्रवाद, जैवकेंद्रवाद आणि पर्यावरणकेंद्रवाद हे निव्वळ अ‍ॅकेडेमिक सिद्धांत आणि प्राण्यांचे हक्क, शाकाहारवाद, प्राण्यांवरील प्रयोगांबाबत नतिक धोरणे तसेच शाश्वत विकास ही संकल्पना, उथळ पर्यावरणवाद विरुद्ध सखोल पर्यावरणवाद हे चळवळीतून निष्पन्न होणारे मुद्दे अभ्यासले जातात. अर्थात विविध देशांतील विद्यापीठांच्या व सरकारच्या धोरणांनुसार काही बदल होतात, पण साधारणत: हे समान मुद्दे असतात. 
       'स्त्रीवादी पर्यावरणवाद' हा या नीतिशास्त्राचा विकसनातील महत्त्वाचा टप्पा आहे. फ्रान्को डी युबोनी (१९१२-२००५) या फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेने ज्याचा साधारण अर्थ स्त्रीवाद किंवा मृत्यू असा होतो, अशा शीर्षकाच्या पुस्तकात उपयोगात आणलेल्या फ्रेंच संज्ञेचे ecofeminism हे इंग्लिश भाषांतर. स्त्रीचे अवमूल्यन व पृथ्वीचे अवमूल्यन यांतील साम्य अधोरेखित करून त्या साम्यावर व पुरुषप्रधानतेवर युबोनीने प्रहार केला.
       विसाव्या शतकात या सर्व मांडणींना लोउक फोन वेनस्वीन या नेदरलँड्स येथील संशोधिका आणि पर्यावरण नीतिशास्त्रज्ञ विदुषीने अत्यंत वेगळी कलाटणी दिली आहे. तिने पर्यावरण सद्गुण नीतिशास्त्र (Environmental virtue ethics) ही नवी मांडणी पुढे आणली. ती अमेरिकेतील काही विद्यापीठे व शिक्षण संस्थांप्रमाणेच उद्योग समूहांत शिकविली जात आहे. परिणामी पर्यावरण नीतिशास्त्राकडे, चळवळींकडे पाहण्याचा अभ्यासकांचा व पाश्चात्त्य राष्ट्रांतील सरकार वा धोरणकत्रे यांचा दृष्टिकोन बदलला, तो अधिक पूरक आणि जास्तीत जास्त वास्तव बनला. 
        वेनस्वीनच्या मते, आजपर्यंतच्या पर्यावरण-विषयक सद्धान्तिक मांडणीमध्ये तत्त्ववेत्ते, विचारवंत, कार्यकत्रे, बिगरसरकारी संस्था इत्यादी संबंधित मंडळींनी जी भाषा वापरली त्या भाषेचे आज नव्याने विश्लेषण करणे आवश्यक आहे. तिच्या मांडणीनुसार पर्यावरण नीतिशास्त्रज्ञ, कार्यकत्रे, बिगरसरकारी संस्था इत्यादी संबंधित मंडळी पारंपरिक सद्गुणांची मूल्यजड भाषा वापरण्याची सवय असते आणि हजारो वष्रे तीच ती भाषा वापरली गेल्याने लोकांवर तिचा काहीही परिणाम होत नाही, ती भाषा अतिशय उथळ, गुळमट, निष्प्रभावी बनते. उलट ते नैतिक संकल्पनांची चेष्टा करतात, म्हणजे नैतिकतेची चेष्टा करतात. गांभीर्याने घेत नाहीत. त्यासाठी ही नीतीची परिभाषेची पुनर्रचना करता येईल आणि ही नतिकता प्रत्यक्ष सार्वजनिक धोरणप्रक्रियेत आणि दैनंदिन जीवनात कशी अमलात येईल, हा प्रकल्प राबवला पाहिजे. याबाबतचे वेनस्वीनने लिहिलेले क्रांतिकारक पुस्तक म्हणजे 'डर्टी व्हर्च्यूज : द इमर्जन्स ऑफ इकॉलॉजिकल व्हर्च्यू एथिक्स' (१९९७). यातील 'डर्टी व्हर्च्यूज' म्हणजे 'अस्वच्छ/ घाणेरडे सद्गुण' असे नसून 'डर्ट' म्हणजे माती, पर्यायाने पृथ्वी. म्हणून 'डर्टी व्हर्च्यूज' म्हणजे पृथ्वीविषयक सद्गुणशास्त्र. 
      पर्यावरणविषयक साहित्याचे व्यापक सर्वेक्षण करून वेनस्वीनने विद्यमान पर्यावरण सद्गुणवादी सिद्धांताला जुळणाऱ्या मूळतत्त्वांचा समावेश करणारी नवी 'हरित सद्गुण भाषा' रचण्याचा आधुनिक प्रस्ताव दिला आहे. या पुस्तकात तिने अशा १८९ सद्गुणांचा आणि १७४ दुर्गुणांची यादीच जोडली आहे. आजपर्यंत मांडलेल्या हजारो सद्गुणवादी संकल्पनांच्या जंजाळामधून नेमकी परिभाषा आजच्या पर्यावरण युगात वापरणे, याचा अर्थ आपली भूमिका नेमकी, नेटकी करणे, असे ती मांडते. 
        भारतात 'वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी वनचरें' अशा अंगाने जाणारे आदरणीय नैतिक विचार प्राचीन काळापासून मांडण्यात येतात, हे खरे आहे. पण एखादा विचार गोड काव्यात मांडणे आणि तोच सार्वजनिक धोरण, जीवनरीत म्हणून सरकार आणि लोकांनी स्वीकारणे या दोन कृतींमध्ये फरक केला पाहिजे. वैदिक यज्ञ संस्कृतीतील हिंसेला उत्तर म्हणून अहिंसा व प्रेम हे जीवनधोरण म्हणून नीतिशास्त्र मांडले ते केवळ जैन आणि बौद्ध धर्माने. झेन बुद्धिझम व पर्यावरण नीती यावर पाश्चात्त्य चर्चाविश्वात प्रचंड संशोधन झाले आहे, चालू आहे.


Wednesday, 5 November 2014

तत्त्वभान ४३ राजकीय नीतिशास्त्र ०६ नोव्हेंबर २०१४

राजकीय नीतिशास्त्र
श्रीनिवास हेमाडे
राजकीय नीतिशास्त्र ही केवळ एक अभ्यासशाखा नव्हे. राजकीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी कॅनडासारख्या देशाने धोरणातच राजकीय नीतिशास्त्राचा अंतर्भाव केला. त्या देशात 'नतिक सल्लागार कार्यालया'ला वैधानिक दर्जा आहे. अर्थात, अभ्यासक मंडळी राजकीय नीतिशास्त्रात महत्त्वाची भर घालण्याचे काम करीत आहेतच..
         विसाव्या शतकात उपयोजित नीतिशास्त्रातील एक कळीचा विषय म्हणून स्वतंत्रपणे राजकीय नीतिशास्त्र ही नवी संकल्पना चर्चाविश्वात पुढे आली. ती अद्यापि बाल्यावस्थेत असली तरी तिने पाश्चात्त्य चर्चाविश्वात अतिशय सशक्त बाळसे धरले आहे. 
           या संकल्पनेची रुजवात गिब्सन विंटर या अभ्यासकाने 'ए प्रपोजल फॉर ए पोलिटिकल एथिक्स' या निबंधाने केली. त्याने 'राजकीय नीतिशास्त्राचे विज्ञान' असा शब्दप्रयोग केला. त्याची मांडणी पॉल रिकर या तत्त्ववेत्त्याच्या सिद्धान्तावर आधारित आहे. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे प्रमुख व राज्यशास्त्रज्ञ डेनिसन फ्रांक थॉमसन (१९४०--) यांनी सुव्यस्थित मांडणी केली. जॉन रॉल्स या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्यापेक्षा अधिक जोमदार राजकीय विचार मांडणारे म्हणून ते जगभर ओळखले जातात. त्यांच्या 'पोलिटिकल एथिक्स' या प्रदीर्घ निबंधात त्यांनी ही मांडणी केली आहे. 
         राजकीय कृतींबद्दल नैतिक निर्णय घेण्याचे; या कृतींबद्दल नतिक सिद्धान्त मांडण्याचे बौद्धिक कौशल्य मिळविणे आणि त्या कौशल्याचा, विविध तात्त्विक दृष्टिकोनातून अभ्यास करणे म्हणजे राजकीय नीतिशास्त्र रचणे होय. या नीतिशास्त्रास राजकीय नैतिकता किंवा लोकनीतिशास्त्र असेही नाव आहे. तथापि 'राजकीय नीतिशास्त्र' हे नाव नुकतेच मिळू पाहत आहे. या विद्याशाखेचा उदय हा उपयोजित नीतिशास्त्राच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही ज्ञानशाखा अगदी ताजी, नवजात असल्याने त्यावर खूप लेखन झाले आहे, असे नाही. पण जे काही लिहिले गेले आहे ते चिंतन-लेखन आजच्या घडीला अत्यंत उचित, संयुक्त, उपयुक्त आणि तसे पाहता उदंड मानता येईल, इतके आहे. हे लेखन विविध दृष्टिकोनांतून समस्यांची चर्चा करते. समस्यांच्या स्वरूपानुसार वेगवेगळे लेखन झाले आहे. ते परस्परांना छेद देते आणि त्याचवेळेस परस्परपूरकही ठरते. परिणामी या संपूर्ण वेगळ्या, वैशिष्टय़पूर्ण विविध समस्या आणि वेगवेगळे आनुषंगिक छेदक व पूरक साहित्य लक्षात घेता या नीतिशास्त्राचे दोन ठळक विभाग करण्यात येतात. 
          पहिले आहे प्रक्रियेचे नीतिशास्त्र आणि दुसरे आहे धोरणाचे नीतिशास्त्र. पहिले शासनाची विविध काय्रे, कर्तव्ये यासंबंधी आहे. ते लोकसेवक, नोकरवर्ग आणि त्यांची कार्यपद्धती, त्या कार्यपद्धतींची उपयुक्तता यावर लक्ष केंद्रित करते. दुसरे सार्वजनिक धोरणे आणि नीती यांचा अभ्यास करते. ते धोरणे आणि कायदे यावर लक्ष केंद्रित करते. या दोन्ही विभागांचे मूळ (१) नतिक आणि राजकीय तत्त्वज्ञान, (२)लोकशाही सिद्धान्त आणि (३) राज्यशास्त्र यावर बेतलेले आहे. पण राजकीय नीतिशास्त्र या तिन्हीपेक्षा वेगळी स्वतंत्र भूमिका मांडते. 
            राज्यकारभार चालविताना आणि सत्तेचे राजकारण करताना राजकीय नेते व प्रतिनिधी काही संकल्पना आणि तत्त्वे विचारात घेत असतात. त्यावर विसंबून ते आपला निर्णय घेतात आणि मग धोरणे निश्चित करतात. या संकल्पना कोणत्या आणि तत्त्वे कोणती आहेत, त्यांचे स्वरूप काय, त्यांचा प्रभाव कसा, कुठे परिणामकारक ठरतो किंवा ठरू शकतो, यांचा विचार करणे, ही राजकीय नीतिशास्त्राची भूमिका आहे. हे काम करताना म्हणजे या विषयाची मांडणी करताना संबंधित तत्त्वचिंतक पारंपरिक आदर्शवादी नतिक सिद्धान्ताचे उपयोजन करीत नाहीत तर वास्तवात राजकारणी, राजकीय नेते आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणारे लोक (किचन कॅबिनेट, अपना आदमी, विविध प्रकारच्या लॉबी, सल्लागार, सरकारी सचिव, खासगी सचिव आणि काही वेळेस चमचे मंडळी) कोणत्या तत्त्वांचा आधार घेतात, त्यांचा अभ्यास करतात. 
        'प्रक्रियेचे नीतिशास्त्र' कशाचा अभ्यास करते? तर इतर वेळेस चूक व अनैतिक ठरू शकणारे निर्णय घेण्याची परवानगी राजकारण्यांना कोणत्या मर्यादेपर्यंत दिली पाहिजे? दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करणे, युद्ध घोषणा करणे इत्यादी. या प्रक्रियेत निष्पाप नागरिकांचा बळी जातो, हे माहीत असूनही राजकारणी या कृती करतात, तेव्हा त्यांची नैतिकता कशी मोजावी? व्यापक देशहितासाठी नागरिकांशी खोटे बोलणे, त्यांच्यावरच नजर ठेवणे, चुकीची माहिती पसरविणे, बळाचा गरजेपेक्षा जास्त वापर करणे, गुप्तता पाळणे, प्रसंगी आणीबाणी आणणे, कधी कधी देशाच्या विरोधात प्रचार करणे (इंदिरा काळातील 'परकीय हात' प्रचार आठवा). या सामान्य जीवनात अनतिक मानल्या जाणाऱ्या कृती राजकीय जीवनात नतिक कशा ठरतात? या प्रकारचे प्रश्न प्रक्रियेचे नीतिशास्त्र उपस्थित करते. 
       धोरणाचे राजकीय नीतिशास्त्र कोणते निर्णय नैतिकदृष्टय़ा योग्य आहेत, हे विचारण्यापेक्षा कोणते निष्कर्ष स्वीकारणे धोरणात्मकदृष्टय़ा आवश्यक आहे आणि नागरिकांची इच्छा नसली तरी त्यांच्या विरोधात जाऊन, प्रसंगी बलपूर्वक त्यांची अंमलबजावणी कायद्याने करणे गरजेचे आहे असे विचारते. सामाजिक न्यायासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. साधन-साध्य शुचिता असा संघर्ष येथे नसतो तर साध्यांची मूल्यात्मकता कशी निश्चित करता येते हा प्रश्न असतो. 
       राजकीय नीतिशास्त्र पाश्चात्त्य जगतात इतके महत्त्वाचे मानले आहे की अनेक देशांनी त्याचा खास अभ्यास अगदी सरकारी धोरण म्हणून सुरू केला आहे. उदाहरणार्थ, कॅनडात गेल्या ५० वर्षांत राजकीय स्पर्धा गळेकापू झाली. परिणामी शासकीय पातळीवरच नैतिक सुधारणांची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी अनेक कायदे सर्वपक्षीयांनी अमलात आणले. नवे राजकीय नीतिशास्त्र अभ्यासक्रम सरकारी पातळीवर सक्तीचे करण्यात आले. राजकारणाची नतिक पातळी उंचावण्यासाठी पंतप्रधान पियरसन यांनी पुढाकार घेतला. नंतर १९९३ मध्ये पंतप्रधान ख्रिशन यांनी नैतिक  वर्तणुकीचा जमाखर्च ठेवण्यासाठी अधिकृतरीत्या 'नैतिक सल्लागार कार्यालय' (the Office of the Ethics Counsellor) स्थापन केले. तिच्या कक्षेत मंत्रिमंडळ, खासदार आणि सगळी नोकरशाही यांचा समावेश केला. २००४ मध्ये रीतसर नवे नीतिशास्त्र विधेयक अमलात आणले गेले. हा धडा घेऊन ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी अशी कार्यालये व अभ्यास विभाग खास निधी उभारून स्थापन केले आणि या प्रयत्नांना यश येत आहे, अशी नोंद मायकेल अ‍ॅटकिन्सन आणि गेराल्ड बिएरिलग यांनी 'पॉलिटिक्स, द पब्लिक अँड पोलिटिकल एथिक्स : अ वर्ल्ड्स अपार्ट' या त्यांच्या शोधनिबंधात केली आहे. 
         राजकीय नीतीच्या संकल्पनेच्या विकासाला एक वेगळे वळण पीटर ब्रैनर या अमेरिकन अभ्यासकाने 'नैतिक भाग्य' ही संकल्पना मांडून दिले. 'डेमोक्रेटिक अ‍ॅटॉनॉमी : पोलिटिकल एथिक्स अँड मॉरल लक' या निबंधात त्याने ही संकल्पना मांडली. त्याच्या मते, जास्तीत जास्त लोकांनी मतदानात भाग घेणे योग्य असते, हे खरे आहे. पण चांगला उमेदवार निवडून येणे हे नेहमी अनिश्चित असते. पण चांगले उमेदवार निवडून आणणे ही दैववादी बाब बनू द्यावयाची नसेल तर मतदाते म्हणून आपण स्वायत्त, विचारशील माणूस आहोत याचे भान ठेवणे आणि जबाबदार प्रतिनिधी निवडणे हे काम आपण केले पाहिजे; तरच नागरिकांचे भाग्य नियतीवादी, दैववादी न बनता त्यांना निश्चित 'नैतिक भाग्य' बनेल, हे भाग्य आपण खेचून आणले आहे, असे त्यांना वाटेल. नैतिक भाग्य व्यक्तीला आपला स्वायत्त 'आत्म' ओळखण्यास शिकविते, योग्य प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी शिकविते आणि आपले भाग्य, जीवन आपल्याच हाती असते, याची जाणीव करून देते. जबाबदारीने केलेले, कोणत्याही मोहाला बळी न पडणारे मतदान हे व्यक्ती व समाज यांचे 'नैतिक भाग्योदया'चे द्वार आहे, हे शिकविते. 
       जाता जाता : राजकीय नीतिशास्त्रास असलेला इस्लामी आयाम स्पष्ट करणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'इस्लामिक पोलिटिकल एथिक्स : सिव्हिल सोसायटी, प्लुरलिझम अँड कॉन्फ्लिक्ट' (संपादक सोहेल हाश्मी, प्रिन्सेटन युनिव्हर्सटिी प्रेस, २००२). जागतिक शांततेत इस्लाम लोकशाहीच्या मार्गाने आपले योगदान देऊ शकतो, असे संपादक हाश्मी लक्षात आणून देतात.


Thursday, 30 October 2014

तत्त्वभान ४२ ब्लॅकमेलिंगचे नीतिशास्त्र ३० ऑक्टोबर २०१४


philosophy of blackmailing

 ब्लॅकमेलिंगचे नीतिशास्त्र  
श्रीनिवास हेमाडे 
एखाद्याची अनैतिकता उघड करू शकणारी माहिती क्रयवस्तू मानून विकणे.. म्हणजे त्याआधारे पैसा मिळवत राहणे, हे प्रकार 'ब्लॅकमेलिंग'मध्ये मोडतात. माहिती असणे किंवा ती विकली जाणे यात गैर नाही. मग गैर काय? अनैतिक काय, याचा शोध घेणारे उपयोजित नीतिशास्त्रातील हे प्रकरण आहे..
          'ब्लॅकमेलिंग' ही अर्थशास्त्रीय व नीतिशास्त्रीय अभ्यासातील एक संकल्पना आहे. उपयोजित नीतिशास्त्र ज्या अनेक नव्या वादग्रस्त व गुंतागुंतीच्या नैतिक संकल्पनांचा शोध घेते, त्यात ब्लॅकमेलिंग ही अतिशय नाजूक स्वरूपाची आहे. अनैतिक समजल्या जाणाऱ्या अतिखासगी कामसंबंधापासून काळा पसा, देशाचा सरंक्षण व्यवहार ते इतिहासाची रचना, धर्म आणि तत्त्वज्ञान या खुल्या व्यापक क्षेत्रापर्यंत; एखादी व्यक्ती ते समाजातील हितसंबंधी गट, संघटना, पक्ष इत्यादींकडून ब्लॅकमेलिंगचा आज यथेच्छ वापर होतो. त्यामुळे या संकल्पनेची चर्चा होणे आवश्यक आहे. 
            Blackmail या शब्दामधील Black चा मूळ अर्थ 'काळा' असा नसून सरंक्षण देणे असा आहे. आणि mail चा अर्थ पत्र, टपाल असा नसून 'खंडणी देणे' असा आहे. जुन्या लॅटिनमधून इंग्लिशमध्ये आलेल्या bla-ich चा अर्थ सरंक्षण देणे. mail चे मूळ फ्रेंच maille म्हणजे विशिष्ट प्रकारचे नाणे किंवा पैसा. mail चे मूळ male मध्ये आहे, पण male (पुरुष नव्हे तर) म्हणजे एखाद्याचे देणे देऊन टाकणे. mail चा अर्थ टपाल असा होतो खरा, विस्तारित अर्थ टपाल ठेवले जाते ती पिशवी, त्यात पैसेही असायचे (मनीऑर्डर). त्यामुळे mail म्हणजे पशाची पिशवी (Wallet). म्हणून mail चा अर्थ पसे देणे, खंडणी देणे. या अर्थानेच Blackmail हा नवा शब्द सोळाव्या शतकात रूढ झाला. 
        पंधराव्या-सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये काही स्कॉटिश पुढारी जमीनदार, ग्रामस्थ यांच्याकडून पेंढारी, दरोडेखोरांपासून 'संरक्षण शुल्क' या नावाखाली वसुली करीत. खरे तर हे पुढारी पेंढाऱ्यांचे हस्तक होते. ही वसुली अन्नधान्य, गुरेढोरे, मांस-मटन, कापडचोपड या स्वरूपात असे. त्याचवेळी राजे, उमराव इत्यादी पातळीवर चांदीची देवघेव किंवा चांदीच्या नाण्यांमध्ये व्यवहार होत असे. चांदी पांढरी तर वसुली आणि सर्वसामान्य लोकांची आपसातील देवघेव मात्र पांढरी नसलेली म्हणून काळा व्यवहार होता. तो राजमान्य म्हणजे शासनमान्य नव्हता. विशेषत: वसुलीचे वर्णन करण्यासाठी Blackmail हा शब्द बनविला गेला. दरोडेखोरांच्या 'संरक्षण शुल्क' या काळा व्यवहारामागे दमदाटी, अत्याचार, हत्या ही प्रमुख कारणे होती. नंतर अठराव्या शतकात Male अर्थ लेखी करार, कायदा, समिती, कौन्सिल असा मानला गेला. काही करार करावयाचे नाही, या अर्थाने न करण्यासारखे करार (black mayle - Blackmail) हे त्यांचे स्वरूप होते. 
       थोडक्यात, Blackmail म्हणजे दमदाटीची बेकायदा वसुली. या व्यवहारात वसुली 'घेतली' जात असे आणि सरंक्षण 'दिले' जात असे. घेणे-देणे या प्रक्रियेत वसुली करणाऱ्यांच्या बाजूने पाहता जे घेतले जाई ते भौतिक, मूर्त वस्तू असे, तर त्यांच्याकडून (वसुली करणाऱ्यांच्या बाजूने) जे दिले जाई ते 'अमूर्त' असे. ब्लॅकमेल किंवा ब्लॅकमेिलग ही अर्थशास्त्रीय घटना असल्याने ती प्रामुख्याने कायद्याच्या अभ्यासात अभ्यासली जाते. पण तिच्यात गुंतलेल्या बहुस्तरीय नतिक आयामामुळे ते बौद्धिक कोडे बनले आहे. नैतिक हत्या, आत्म्याचा खून, अधम अपराध अशा शब्दांत या कृत्याची िनदा केली जात असली तरी तिचे स्वरूप निश्चित करणे कठीण आहे. रोनाल्ड कोएसे या अर्थतज्ज्ञाच्या मते ''पोर्नोग्राफीची व्याख्या करता येणे जसे कठीण आहे, तशी ब्लॅकमेिलगची व्याख्या करता येणे कठीण आहे. पण तुम्ही ब्लॅकमेिलगची कृती पाहता तेव्हा तुम्हाला ती कृती ब्लॅकमेिलगची आहे, हे जाणवते.'' 
       ब्लॅकमेलिंगची चिकित्सा हा गुन्हेतज्ज्ञ, कायदातज्ज्ञ, नैतिक तत्त्वज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि मुख्य म्हणजे अर्थतज्ज्ञ यांनी केला पाहिजे असा आंतरविद्याशाखीय अभ्यास बनतो. नैतिकदृष्टय़ा ब्लॅकमेलिंग हा गुन्हा आहे की नाही, हा मुद्दा नसून तो का आणि कशाच्या आधारे गुन्हा का होतो, हे महत्त्वाचे आहे. रसेल ख्रिस्तोफर या अभ्यासकाने Meta-Blackmail या त्याच्या निबंधात प्रदीर्घ चर्चा केली आहे. जेफ्री मर्फी, फाईनबर्ग, रॉबर्ट नोझिक, विनित हक्सर, वॉल्टर ब्लॉक, रॉबर्ट वूल्फ, पीटर वेस्टर्न, रिचर्ड पाँझर, रसेल हार्डिन, होम्होल्त्झ, लॉरेन्स फ्रीडमन, मायकेल गोर इत्यादी अनेकांनी यावर प्रचंड अभ्यास केला आहे. 
      ब्लॅकमेिलगची रचना आणि परिभाषा चमत्कारिक आहे. यात किमान दोन घटक असतात. ब्लॅकमेलर आणि ज्याला ब्लॅकमेल केले जाते ती व्यक्ती किंवा संस्था (आज 'पक्ष'). ब्लॅकमेलर काही मागणी करतो आणि काही देऊ इच्छितो. जे मागतो ते पसे आणि जे देतो ती असते गुप्त माहिती. पसे न दिल्यास माहिती उघड करण्याची धमकी हा तिसरा घटक, मागणी पूर्ण झाली तर स्वत: मौन बाळगणे, माहितीचे पुरावे देऊन टाकणे हे आश्वासन असते. आता, यातील मागणी, गुप्त माहिती, मौन बाळगणे, आश्वासन आणि धमकी या संदिग्ध संकल्पना आहेत. 
       ब्लॅकमेलिंगच्या या रचना आणि परिभाषा यांच्या स्वरूपामुळे ब्लॅकमेलिंगबाबतीत विरोधाभास निर्माण होतो. विशेषत: लोकशाही आणि भांडवलशाहीच्या उदयानंतर हा विरोधाभास निर्माण झाला. यात व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, मुक्त बाजारपेठ इत्यादीमुळे ब्लॅकमेिलगमध्ये गुन्हेगारी शोषण आणि खुली व्यापारी स्वरूपाची देवघेव, दोन्ही ठरली. म्हणजे असे : लोकांना सत्य माहिती देण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला (ब्लॅकमेलरला) आहे, सत्य जाणण्याचा लोकांचा हक्क आहे. ती दिली की ज्यांच्याविषयी (ब्लॅकमेल होणारी व्यक्ती) ती आहे त्यांचे चारित्र्यहनन होईल, प्रतिष्ठा जाईल, त्यांची अनैतिकता उघडकीस येईल. मग ही माहिती विकली तर पसा निर्माण होईल, नीतीचे रक्षण होईल, सन्मान राखला जाईल. शिवाय मौन, गुप्तताही बाळगली जाईल! माहितीला बाजारपेठ आहे, ती क्रयवस्तू आहे. 
      खुल्या बाजारपेठेच्या नियमानुसार ब्लॅकमेलिंग हा आर्थिक  व्यवहार आहे. त्यात गुप्तता, शांतता व पैसा यांचा व्यवहार होतो. ब्लॅकमेलर पशाच्या बदल्यात सुरक्षितता, गुप्तता यांची ऑफर देतो, तसे वचन देतो. मागणी पूर्ण झाली तर वचनबद्ध राहतो आणि ती फेटाळली गेली तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क बजावतो, माहिती जाहीर करतो. बाजारगप्पा आणि ब्लॅकमेलिंग यात फरक हाच आहे की गप्पा थांबविता येत नाहीत, शिवाय त्या रोगासारख्या पसरतात. निदान ब्लॅकमेलर गप्प बसतो. आता निवड अनैतिक, बेकायदा वर्तन करणाऱ्याने करावयाची आहे. 
याचे सुलभीकरण असे : 

दारू पिणे कायद्याने गुन्हा नाही, 
गाडी चालविणे हाही गुन्हा नाही. 
उलट या दोन्हीसाठी शासकीय परवाना मिळतो.

       पण दारू पिऊन गाडी चालविणे मात्र गुन्हा कसा ठरतो? दोन गोष्टी स्वतंत्रपणे केल्या की कायदेशीर, नैतिक व शुभ्र- पवित्र आणि त्याच एकत्र केल्या की बेकायदा, अनैतिक, काळ्या -अपवित्र? हे कसे ठरते? कोणाला अधिकार आहे? 
       याप्रमाणे फुकट माहिती देणे हे नैतिक आणि एक वस्तू म्हणून तीच माहिती विकली की अनैतिक? जर माहितीला बाजारमूल्य असेल तर विकली पाहिजे. न विकता नुकसान का करून घ्यावे? शिवाय विकली तर मौन बाळगण्याचे वचन आहेच. मग ती विकणे हा गुन्हा का? ते अनैतिक का ? 
      याबाबत स्वतंत्रतावादी विचारवंत, मार्क्‍सवादी विचारवंत, पारंपरिक नीतिवादी आणि भांडवलशाहीवादी असा संघर्ष घडतो. स्वातंत्र्य हे भांडवलशाहीचेच अपत्य असल्याने स्वतंत्रतावादी व भांडवलशाहीवादी यांची बाजू एक होते. नीतिवादी नीती महत्त्वाची मानतात तर मार्क्‍सवादी भांडवलशाहीलाच ब्लॅकमेलिंगचे एक रूप मानतात. लेनिनने तर Political Blackmail या नावाचा निबंधच लिहिला होता.

Wednesday, 22 October 2014

तत्त्वभान ४१ जागल्यांचे नीतिशास्त्र २३ ऑक्टोबर २०१४

जागल्यांचे नीतिशास्त्र
श्रीनिवास हेमाडे 
प्रोफेसर नॉर्मन बोवी 


    उद्योगसमूह, कंपनी, सरकारी उपक्रम वा सरकार यांतील अंतस्थानेच या यंत्रणा/व्यवस्थांचे दोषपूर्ण वर्तन जगापुढे आणणारी माहिती उघड करणे, हे 'नैतिक' कसे? हा प्रश्न उपयोजित तत्त्वज्ञानात येतो. त्याची ही चर्चा..



    गेल्या दोन दशकांत उद्योगसमूहांतील अनेक नैतिक समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाय शोधण्यात आले. त्यातून Whistle Blowing (व्हिसल ब्लोइंग) या परिणामकारक संकल्पनेचा उदय झाला. त्याचा अर्थ शिट्टी मारणे. यथार्थ भाषांतर दवंडी पिटणे, शंखध्वनी करणे. Whistle Blower या इंग्रजी शब्दाला रूढ मराठी प्रतिशब्द 'जागल्या.'
    व्यवसाय, धंदा व उद्योगसमूह या तीन सेवाक्षेत्रांचे विभाजन खासगी, निमसरकारी, सरकारी अशा तीन प्रकारांत करता येते. या तिन्ही क्षेत्रांत मालक-नोकर यांच्या परस्परसंबंधात गुंतलेली, पण सार्वजनिक हित हेच उद्दिष्ट ठेवणारी जागलेगिरी (व्हिसल ब्लोइंग) ही कळीची नतिक संघर्षांची संकल्पना आहे. 
        कोणत्याही सेवाक्षेत्रातील 'मालक' या संकल्पनेत खुद्द मालक नसलेला पण मालकाने नेमलेला वरिष्ठ अधिकारीसुद्धा समाविष्ट करता येईल. कारण मालकाने अधिकाऱ्याला जवळपास स्वत:चे अधिकार दिलेले असतात. छोटय़ा खासगी ठिकाणी मालक ही निश्चित व्यक्ती असते. मोठय़ा धंद्यात, उद्योगसमूहात आणि निमसरकारी, सरकारी क्षेत्रांतील नोकरशाहीत वरिष्ठ अधिकारी हाच मालक असतो. खुद्द नोकर किंवा सेवक हाच मालक होण्याची घटना मात्र केवळ राजकीय क्षेत्रात घडते. 
        खेळताना एखाद्या खेळाडूने चुकीची, नियमबाह्य खेळी केली की पंचाने ती चूक संबंधित खेळाडूला आणि प्रेक्षकांना लक्षात आणून देण्यासाठी शिट्टी वाजविणे या कृतीपासून 'व्हिसल ब्लोइंग' हा शब्द आला. त्याचेही मूळ पोलिसाने एखाद्याचे बेकायदा वर्तन लक्षात आणून देण्यासाठी शिट्टी वाजविणे या कृतीत असावे. १९६३ला इंग्लिशमध्ये 'व्हिसल ब्लोइंग' सर्रास लोकबोलीत रुळला. प्रोफेसर राल्फ नादेर (१९२७) या अमेरिकन लेखकाने १९७०च्या दरम्यान आजचा अ‍ॅकेडेमिक अर्थ प्रचलित केला. 
        एखाद्या संस्थेतील मालकाचे अथवा सहकाऱ्यांचे बेकायदा व अनतिक वर्तन त्या संस्थेतील कर्मचाऱ्याने लोकांपुढे-चव्हाटय़ावर आणणे म्हणजे जागलेगिरी करणे. याचे दोन अर्थ आहेत. पहिला, मर्यादित अर्थ कामाच्या ठिकाणी जागलेगिरी करणे आणि दुसरा, व्यापक अर्थ समाजहित, लोकहितासाठी जागलेगिरी करणे. ज्या संस्थेत आपण काम करतो त्यातील अनतिकता संस्थाप्रमुखाकडे उघडकीस आणणे ही अंतर्गत जागलेगिरी, तर समाजाला मारक असणारी कोणाचीही कृती- मग ती आपली असो वा इतरांची असो, ती सरकार, एखादी नियंत्रक संस्था किंवा पत्रकार-माध्यमे यांच्याकडे नेणे, ही बाह्य जागलेगिरी. 
       अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील 'तत्त्वज्ञान आणि व्यवस्थापकीय ध्येयधोरणे' या विषयाचे प्रोफेसर नॉर्मन बोवी यांनी 'जागल्या' संकल्पनेची दिलेली व्याख्या अशी : खासगी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या नफा अथवा ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या कोणत्याही संस्थेतील एखाद्या कर्मचारी किंवा अधिकारी कंपनीकडून अथवा मालकाकडून त्याच्यावर अनतिक अथवा बेकायदा कृती करण्याची जबरदस्ती होत असल्याची माहिती जनतेला जाहीरपणे देतो, तेव्हा तो 'जागल्या' असतो. 
       बोवीच्या मते, एखादी कृती व्हिसल ब्लोइंग या पात्रतेची होण्यासाठी तिला तीन तत्त्वांचा आधार असला पाहिजे. (१) संस्थेच्या कर्मचाऱ्यावर जबरदस्तीने होणारी कृती इतरांना अनावश्यकरीत्या त्रासदायक आहे. (२) ती मानवी हक्कांचा भंग करणारी आहे. (३) ती अनतिक अथवा बेकायदा कृती खुद्द संस्थेच्या हिताची नाही. संस्थेच्या आचारसंहितेच्या विरुद्ध आहे. म्हणून ती संस्थेने किंवा हितसंबंधित व्यक्तीने दडवून ठेवली आहे. 
जागलेगिरी ही मालकाच्या वा कंपनीच्या, संस्थेच्या विरोधात जाऊ शकेल अशी कृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटल्यामुळे ती अनैतिक वाटते. मग अशी कृती नैतिक कशी ठरू शकते? तर बोवीच्या मते, त्याचे निकष असे : (१) संबंधित कर्मचाऱ्याच्या या कृतीमागे कसलाही स्वार्थ नसावा. (२) ती तक्रार त्याने आधी मालक, संचालक अथवा तक्रारनिवारण समितीकडे नेलेली असावी आणि त्यांनी त्याची दखलच घेतलेली नाही, असे असावे. (३) जबरदस्ती झाल्याचा पुरेसा पुरावा असावा. व्हिसल ब्लोइंग करण्यात स्वत:ला धोका कसा आहे, याचे विश्लेषण कर्मचाऱ्याने करावे. त्याचबरोबर संबंधित बेकायदा वर्तनात नीतिनियम कसे पायदळी तुडविले जात आहेत, तसेच संस्था, कंपनी व सार्वजनिक हिताला संबंधित बेकायदा वर्तन कसे धोकादायक आहे, ते स्पष्ट करावे. (४) कर्मचाऱ्यास किमान यशाची खात्री असावी.
        थोडक्यात, मालक वा कंपनी करीत असलेल्या अनैतिक व बेकायदा समाजविरोधी कृत्याबद्दल कंपनीतील कर्मचाऱ्याने जनतेकडे जाहीरपणे माहिती नेणे म्हणजे व्हिसल ब्लोइंग. हा शंखध्वनी करण्यात त्याचा हेतू कंपनीला, मालकाला आणि पर्यायाने समाजाला अनतिकतेपासून व कायदेबाह्यपणापासून वाचविणे, निव्वळ लोकहित हेच उद्दिष्ट साधणे हाच असावा, कोणताही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वार्थ नसावा. तरच ही कृती नतिक ठरते अन्यथा नाही. जागल्या मालकात, व्यवस्थेत सुधारणा घडवितो, त्यांची नैतिक पातळी उंचावीत असतो. तो नीतीचा रक्षक असतो. त्यासाठी जिवाची बाजी लावतो. 
           जागल्याची भूमिका लक्षात घेतली तर जागल्या म्हणजे जो कर्तव्याच्या पलीकडे जातो, स्वत:ची नोकरी आणि कामधंदा म्हणजे रोजीरोटी गमावण्याचा धोका पत्करतो तसेच प्रसंगी स्वत:च्या कुटुंबीयांचे जीव पणाला लावतो अशी कोणतीही व्यक्ती. जागलेगिरीला पाश्चात्त्य राष्ट्रांत अठराव्या शतकापासून परंपरा आहे. पहिला जागल्या म्हणून सम्युएल शॉ (१७७७) या अमेरिकन नौदल अधिकाऱ्याचे नाव घेतले जाते. अनेक जगल्यांनी जगाचा इतिहास बदलला. त्यात अनेक स्त्रियाही आहेत. आजचा जागतिक जागल्या म्हणजे एडवर्ड स्नोडेन. 
       भारतात ही संकल्पना लोकांमध्ये फारशी रुळलेली नाही. पण लोकशाही जीवनरीतीत ती एका अर्थाने अंतर्भूत असते. लोकपाल, जनलोकपाल, माहिती अधिकार आणि 'जागले संरक्षण विधेयक' (व्हिसलब्लोअर्स प्रोटेक्शन बिल- २०११) व्यापक जागलेगिरीकडे प्रवास करीत आहेत. पण जागलेगिरी ही लोकचळवळ होणे, व्यक्ती आणि समाज यांची ती मूलभूत नतिक प्रेरणा बनविणे हे महत्त्वाचे आहे. केवळ सत्येंद्र दुबे, षण्मुगम मंजुनाथ अथवा मेधा पाटकर, अण्णा हजारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, सतीश शेट्टी अथवा के. एम. अब्राहम, दिनेश ठाकूर यांच्यापुरती मर्यादित होणे अपुरे आहे. 
       पत्रकारिता, माध्यमे, सामाजिक माध्यमे ही जागलेगिरी करतात. ते त्यांचे कामच आहे. त्याशिवाय विचारवंत, तत्त्ववेत्ते, लेखक हे आधुनिक माध्यम संकल्पनेनुसार पाचवे-सहावे स्तंभ आहेत, ते नवजागले असतात. या साऱ्यांची जागलेगिरी 'या निशा भूतानाम् तस्यां जागíत संयमी' या आध्यात्मिक हेतूनुसार चालू असते. 
        तथापि जागलेगिरी राजकीय क्षेत्रात खूपच वेदनादायी बनते. लोकप्रतिनिधी हे लोकशाहीतील एक आदर्श म्हणून लोकसेवक असतात, पण वास्तवात ते जनतेचे मालक बनतात! अशा वेळी 'आपले कर्तव्य करताना मालकाचे हित सांभाळावे की लोकहिताला प्राधान्य द्यावे?' यावरून सरकारी नोकरांचा आणि राज्यकर्त्यांच्या खासगी नोकरवर्गाचा नतिक गोंधळ होत असतो. सेवकपणा व मालकी, या द्वैतात अडकलेली राजकारण्यांची नतिकता तर खूपच बिकट व करुण असते. 
       मालक, मालकवर्ग कोणीही वा कोणताही असो, नोकरांच्या बाजूने जागलेगिरी आणि चमचेगिरी असा  एक नवाच नैतिक संघर्ष जन्माला येतो, हे वास्तव समजावून घेणे आवश्यक आहे. चमचेगिरीचा उदय दोन रीतींनी होतो. (१)- नोकरांच्या बाजूने पाहता, बहुधा स्वत:चे काम येत नसल्याच्या अपराध भावनेतून चमचेगिरी येते. त्याची नुकसानभरपाई म्हणून नोकर माणूस मालकाची स्वयंघोषित चमचेगिरी स्वीकारतो. (२) व्यवस्था या अर्थाने पाहता, चमचेगिरीचा उदय पारदर्शकता, लोकशाही नसते तेथे होतो. भारतात आज कुटुंब ते राजकीय पक्ष, संघटना या प्रत्येक पातळीवर केवळ पुरुषप्रधानता आणि हुकूमशाही आहे. चमचे आणि कार्यकत्रे, मित्र, सल्लागार, मार्गदर्शक यांत नेमका फरक करता येणे आवश्यक आहे. कारण चमचेगिरी नेहमीच मालकाला धोक्यात आणते. ती मालकाची नैतिक पातळी नेहमी खाली आणते.

Live Paper Link                         E-Paper Link