Thursday, 31 July 2014

तत्त्वभान ३१ तत्त्वचिंतनाचे शत्रू ३१ जुलै २०१४



तत्त्वचिंतनाचे शत्रू

श्रीनिवास हेमाडे 
एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषत: मित्र असे करतात, तेव्हा सारेच भावविश्व उद्ध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा आणि तर्कशास्त्राचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते..
          सॉक्रेटिसच्या मते प्रज्ञानाला विरोध होतो तो केवळ बुद्धिमत्तेकडून. तर्कबुद्धीला नीतीचा आधार नसेल तर बुद्धिमान तर्कज्ञ हाच समाजाला धोका असतो. तर्कबुद्धी विघातक कामासाठी वापरली की ती आत्म्याचा नाश करतेच पण समस्त मानवजातीचाही नाश करते. 
         ग्रीकांनी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञान (Intellect आणि wisdom) यात फरक केला आणि प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान (Philosophy) अशी व्याख्या केली. आता एक प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. तो असा : Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती? भारतीय परिभाषेत बोलायचे तर 'दर्शन' या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती? 
    ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेतील Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणजे misology आणि misosophy. तर भारतीय परंपरेतील 'दर्शन'च्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणजे 'अदर्शन' (अदर्शनं लोप:) म्हणजे गुप्त, लुप्त होणे, न दिसणे; म्हणून त्याचे ज्ञान न होणे. पर्यायाने अज्ञान. 
      प्लेटोच्या फिडो (Phaedo) या संवादात philosophy च्या विरुद्ध misology आणि philosopher च्या विरुद्ध misologist या संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. misology म्हणजे तर्काचा तिरस्कार (the hatred of logic) आणि misosophy म्हणजे प्रज्ञानाचा तिरस्कार (the hatred of wisdom). misology ही संज्ञा नेहमीच्या वापरात नसते. आणि प्रज्ञानाचा तिरस्कार या अर्थाने misosophy ही संज्ञा डेव्हिड कॉनवे (१९४७. विद्यमान ) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने त्याच्या 'रिडिस्कव्हरी ऑफ विस्डम : फ्रॉम हिअर टू अ‍ॅन्टिक्विटी इन द क्वेस्ट ऑफ सोफिया, २०००) या ग्रंथात वापरली, असे थॉमस सोवेल (१९३० विद्यमान) हा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व राजकीय तत्त्ववेत्ता लक्षात आणून देतो. नंतर misosophy misosophist misosophos हे शब्द हचिनसन शब्दकोशाने (२००८) स्वीकारले. तर्काचा व प्रज्ञानाचा तिरस्कार या अर्थाने कान्ट या जर्मन तत्त्ववेत्त्याने (१७८०) sology शब्द उपयोगात आणला. इंग्लंडमधील एक्स्टर युनिव्हर्सटिीच्या सामाजिक विज्ञान विभागात प्रॅग्मटिझम अ‍ॅन्ड इट्स एनिमीज या नावाचा अभ्यास विषय आहे. विसाव्या शतकातील फलवादी चळवळीचा चिकित्सक अभ्यास यात केला जातो. 
       फिडो हा संवाद अत्यंत हृद्य आहे, कारण हा सॉक्रेटिसचा अंतिम दिवस आहे. आपल्या देहान्ताच्या दिवशी सॉक्रेटिस त्याच्या मित्रांना माणसाचा सर्वात धोकादायक शत्रू कोण, त्याच्यापासून का व कसे सावध राहावे, याचा उपदेश करतो. या संवादात ताíकक दुष्टावा हा अनतिक बौद्धिक दुष्टावा कसा बनतो, याची चर्चा आहे. 
ज्ञान हाच सद्गुण हा सिद्धांत सॉक्रेटिसच्या जीवनाचा प्रकल्प होता. तो त्याने मृत्यूच्या क्षणापर्यंत अमलात आणला. ज्ञानाला नीतीचा, समाजहिताचा आधार नसेल तर असे ज्ञान व अशी ज्ञानी पण अनतिक माणसेच समाजाला धोकादायक असतात, हे सॉक्रेटिस या संवादातही स्पष्ट करतो. 
      या संवादातील सॉक्रेटिस ही सारी चर्चा मानवता विरोधाशी जोडतो. त्याच्या मते एखाद्याचा लोकांवरील वर्तनातील चांगुलपणावर विश्वास असेल तर तो सर्वच लोक मुळातून सचोटीने वागणारे आणि प्रामाणिक आहेत, असे समजतो. पण एखाद्याने जरी फसवले तरी तो सर्वाचा तिरस्कार करू लागतो. म्हणजे वर्तनातील चांगुलपणाचे जसे सार्वकिीकरण होते, तसे दुष्टपणाचेही सार्वकिीकरण होते. अगदी असेच तर्काच्या व विचाराच्या बाबतीतही घडते. एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषत: मित्र असे करतात, तेव्हा सारेच भावविश्व उद्ध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा आणि तर्कशास्त्राचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते. तेच त्याचे 'ज्ञान' बनते. मग असा माणूस त्या एका दुरुपयोग करणाऱ्या माणसाचा शत्रू होता होता साऱ्या मानवजातीचाच शत्रू होतो! कालांतराने त्याचे स्वत:चे विपरीत तर्कशास्त्र तयार होते. तो त्यावरच श्रद्धा ठेवतो, मग तेच त्याच्यासोबतच्या इतरांना शिकवितो. हे तर्कशास्त्र बुद्धीच्या नव्हे तर भावनेच्या अंकित होते. तर्कविरोध आणि मानवविरोध अशा रीतीने एकत्रच जन्माला येतात. 
         प्लेटोच्या मते, अंध मत, विश्वास यांनाच सत्य मानणे आणि तर्क खरा न मानणे (युक्तिवाद अथवा चर्चा करण्यात सत्य नसते, अशी श्रद्धा बाळगणे) हा तर्काचा तिरस्कार आहे. अताíककता हा मानसिक आजार असून तो आत्म्याशी संबंधित आहे. हा अत्यंत निकडीचा, इमर्जन्सीचा रोग आहे. हा रोग झाला की लोकांना बोलण्यात, चर्चा करण्यात आत्मविश्वास वाटत नाही. काही काळाने त्यांना या रोगाची सवय होते, मग ते अज्ञानाच्या गुहेतील अंधारे आयुष्य जगू लागतात. शरीर आणि त्याच्या इच्छाच खऱ्या समजून ते जणू काही मद्यधुंद धूसर गोंधळलेल्या अवस्थेत जन्मभर राहतात. असा आत्मा रोगट बनतो. अशा रीतीने अताíककता हा आत्म्याचा रोग होतो. मग तो केवळ आत्मनाश करतो. 
       प्लेटोच्या या संकल्पनेतून दोन गोष्टी आढळतात, असे आज आपण म्हणू शकतो. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, हे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे मान्य केले तरी समाजात सर्वच माणसे बुद्धिमान नसतात; बरीच माणसे साधी, भाबडी असतात. पण काही माणसे तरी बुद्धिमान असतात. प्लेटोच्या म्हणण्यानुसार या बुद्धिमान माणसांवर नतिक वागण्याची विशेष सामाजिक जबाबदारी असते. कारण असा बुद्धिमान, ज्ञानी माणूस जेव्हा साध्या-भाबडय़ा माणसाला फसवितो तेव्हा त्या भाबडय़ा माणसाचा माणुसकीवरील विश्वास संपतोच, पण त्या दुष्ट अनुभवातून त्या भाबडय़ा माणसाचे स्वत:चे स्व-तंत्र तर्कदुष्ट तर्कशास्त्र बनते. ते दुष्ट मानसिकता निर्माण करते. ते निर्घृण होण्याचा धोका संभवतो. तो सत्ताधीश झाला की साऱ्या मानवजातीलाच धोक्यात आणू शकतो. लोकशाहीत असे घडू शकते. या तर्कदुष्ट तर्कशास्त्राच्या वरवंटय़ातून बुद्धिमान, ज्ञानी माणसेही वगळली जात नाहीत! 
     'ज्ञानाचे प्रेमिक'च्या विरुद्ध 'अज्ञानाचे प्रेमिक' असे कधी नसते, हे खरे. पण ज्यांना हुशार बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जाते त्यांनी बुद्धीचा गरउपयोग केला की ते 'अज्ञानाचे प्रेमिक' बनतात. त्यांच्या स्वार्थामुळे साध्या-सरळ माणसाचा आधी बुद्धीवरील, तर्कावरील विश्वास उडतो आणि नंतर बुद्धिमान माणसावरील विश्वास लयास जातो. मग सारी माणसे अशीच स्वार्थी असतात, असे त्याचे ज्ञान पक्के बनते. ती श्रद्धा होते. हा भाबडा माणूस मग कशावरही विश्वास ठेवू लागतो. तो हळूहळू मानवताविरोधी बनतो. हे घडू नये, यासाठी बुद्धिमान असण्याबरोबर ज्ञानी माणसाने सद्गुणी असणेही अनिवार्य असते. बुद्धिमान पण दुर्गुणी माणसे, सॉक्रेटिसच्या मते खरी ज्ञानी नसतातच, ती केवळ 'मिथ्या ज्ञानी' असतात. तत्त्वचिंतनाचे, समाजाचे हेच शत्रू असतात. 
     भारतात तर्काचे शत्रू असा काही प्रकार नव्हता, उलट तर्क हाच शत्रू मानला गेला. परिणामी तर्कशास्त्राचा प्रसार आणि प्रचार तर झाला नाहीच, पण लोक विचारशक्तीच हरवून बसले. इंग्रजी विद्य्ोच्या दबावामुळे विद्यापीठे व महाविद्यालयांत तर्कशास्त्र हा विषय सुरू झाला आणि आज अनेक ठिकाणी तो बंद पडला. खरे तर शालेय स्तरावर जिथे विचार कसा करावा, याचे शास्त्रशुद्ध शिक्षण द्यावयाचे असते तिथे हा विषय असावा तर तिथे तो बेपत्ता आहे.



Thursday, 24 July 2014

तत्त्वभान ३० मूल्यशास्त्रे आणि मूल्यसंघर्ष २४ जुलै २०१४

मूल्यशास्त्रे आणि मूल्यसंघर्ष
श्रीनिवास हेमाडे
 
axilology nad value conflicts 
'वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते' हे जॉन मॅकी यांचे प्रतिपादन  नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रात नवी रुजवात घालणारे ठरले..

       'मूल्य' या तात्त्विक संकल्पनेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. तिचे विश्लेषण न करता, ती समजावून न घेता व्यवहारात सर्रास उपयोगात आणली जाते आणि मग एकच मूल्यसंघर्ष निर्माण होतो. व्यक्तिगत व सामूहिक जीवनकलह तीव्र बनतो. मूल्य संकल्पनेच्या रहस्याचे आकलन झाले तर अटळ जीवनकलहाची तीव्रता सहन करणे सोपे जाते.
       मूल्य (value) हा शब्द 'आर्थिक मूल्य' अशा अर्थाने अ‍ॅडम स्मिथने उपयोगात आणला. नंतर रुडॉल्फ हरमन लोत्झ (१८१७-१८८१), आल्ब्रेख्त रिचेल (१८२२-१८८९), नीत्शे (१९४४-१९००), अलेक्स मायनाँग (१८५३-१९२०), एडवर्ड हॉर्टमन (१९४२-१९०६), विल्बुर अर्बन (१८७३-१९५२), आर. बी. पेरी (१८७६-१९५७) या तत्त्वचिंतकांनी त्याला व्यापक अर्थ दिला. या व्यापक अर्थाने तो शब्द अर्थशास्त्रासह नीती, धर्म, कला, विज्ञान, कायदा, रूढी व राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रांत रुळला. आजकाल वाङ्मयीनमूल्ये, जीवनमूल्ये, लोकशाहीमूल्ये अशा तऱ्हेचे शब्दप्रयोग आपल्या बोलण्या-लिहिण्यात येतात ते याच अर्थाने. या ठिकाणी 'मूल्य' शब्दाने नेमके काय कळते, मूल्य हा काही वस्तुगत धर्म आहे की मनुष्यकृत आरोपण आहे, मूल्यांची प्रतवारी किंवा वर्गीकरणात्मक व्यवस्था लावता येईल काय, याचा विचार आवश्यक असतो. मूल्यांचे स्वरूप, त्यांचे प्रकार, त्यांचे परस्परसंबंध, त्यांच्या प्रामाण्याचा आधार यांचा काटेकोर तार्किक विश्लेषणात्मक विचार करणारी अशी तत्त्वज्ञानाची शाखा म्हणजे मूल्यशास्त्र अथवा मूल्यमीमांसा (अ‍ॅक्सिऑलॉजी).
           तत्त्वज्ञानात नीतिशास्त्र व सौंदर्यशास्त्र यांना मूल्यशास्त्रे मानले आहे. जगताना मूल्यसंघर्ष होतो, याचा अर्थ मुख्यत: या दोन क्षेत्रांत संघर्ष होतो.
         प्रथम हा टकराव नीतिशास्त्रात कसा उद्भवतो, ते पाहू. वर्णनात्मक नीतिशास्त्र आदर्शवादी नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र हे नीतिशास्त्राचे चार प्रकार लक्षात घेता मूल्यसंघर्ष पुढीलप्रमाणे निर्माण होतो.
             वर्णनात्मक नीतिशास्त्र लोकांच्या नतिकतेच्या रेडीमेड श्रद्धा, विश्वास व संकल्पना यांचे वर्णन करते. आदर्शवादी नीतिशास्त्र, कुणी तरी सांगितलेली नीती पाळणे कसे योग्य आहे, हे सांगते. अधिनीतिशास्त्र त्यांची काटेकोर तार्किक चिकित्सा करू पाहाते. उपयोजित नीतिशास्त्र व्यक्तीचे खासगी जीवन आणि तिचे सार्वजनिक जीवन यातील फरकानुसार नतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत मांडते.
          आता, संघर्ष निर्माण कुठे होतो? नीतिशास्त्रात तो दोन प्रकारे निर्माण होतो. वर्णनात्मक नीती व आदर्शवादी नीतीनुसार एखाद्या गोष्टीचे वर्णन करणे, हे एका अर्थाने आदेश देणेच असते. त्यामुळे या दोन्ही नीती सक्तीच्या पाळावयाच्या पारंपरिक नीती ठरतात, पण त्यांना प्रश्न विचारला म्हणजे परंपरेपलीकडे, अधिपातळीवर म्हणजे अधिनीतिशास्त्रीय पातळीवर आपण गेलो की परंपरा आणि नवता यात संघर्ष सुरू होतो. उदाहरणार्थ, काळा-गोरा हा वर्णभेद, जातिभेद, िलगभेद, 'परधर्मो भयावह:' या परंपरा असून त्या पाळणे चांगले असते, हे आदर्श आहेत. पण 'गोरेपण-उच्च जात किंवा पुरुष असणे चांगले कसे,' असा प्रश्न अधिपातळीवर जाऊन विचारला की संघर्ष, तणाव निर्माण होतो. एखादी गोष्ट आदर्शवादी मानली की तिला 'का?' म्हटले की ती परंपरेला आव्हान देते. मी कोणती नीती निवडणार? हा या संघर्षांचा पाया बनतो. हा पहिला प्रकार आहे.
         नीतिशास्त्रातील संघर्षांचा दुसरा प्रकार अगदी अलीकडे निर्माण झाला. उपयोजित नीतिशास्त्र व्यवसायाचे नीतिशास्त्र रचू पाहते. त्या क्षेत्रात हा संघर्ष ठळकपणे दिसून येतो. उपयोजित नीतिशास्त्र समाजसेवा (Social Service), पेशा (Vocation), व्यवसाय (Profession), धंदा (Business), नफेखोरीचा धंदा (trade) आणि उद्योगसमूह (Corporation / Company) यांत नेमका फरक करते. पण तो कागदावरच राहिला. प्रत्यक्षात रोजच्या जगण्यात यातील नेमके आपण काय निवडले आहे? हा अधिपातळीवरील प्रश्न विचारला की संघर्ष निर्माण झालाच! शिक्षण, शेती, परराष्ट्र धोरण किंवा वेश्याव्यवसाय यांत फरक कसा करणार? (वेश्याव्यवसाय, एस्कॉर्ट अव्हेलेबल हा व्यवसाय की सामाजिक दुरित? हा तर एक स्वतंत्र नतिक प्रश्न आहे.)
        भारतात तर कोणत्याही सामाजिक कृतीचे रूपांतर नफेखोरीच्या धंद्यात होऊ शकते. गप्पा मारणे या साध्या-सरळ गोष्टीचा व्यवसाय झाला की 'गप्पाष्टक' हा धंदा होतो. शिक्षण, सुशिक्षित नागरिक, शेती, बँकिंग, नागरी सेवा इत्यादी देशाची गरज आहे की चन आहे, याचा व्यापक विचार न झाल्याने त्याचे रूपांतर नफेखोरीच्या धंद्यात झाले आहे. विशेषत: राजकारण हा सेवा की धंदा? हा नतिक पेच आहे. तेच उद्योगसमूहाचे. उद्योगसमूहाची सामाजिक जबाबदारी (सी.एस.आर.) आणि प्रत्यक्ष त्या समूहाचे नतिक समजले जाणारे वर्तन यात फरक आहे.
           याचा अर्थ असा की, अधिनीतिशास्त्र आणि उपयोजित नीतिशास्त्र यांच्यात हा संघर्ष निर्माण झाला आहे. याचे अगदी अचूक वर्णन तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक शि. स. अंतरकर यांनी केले आहे. त्यांच्या मते, उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे 'सोयीस्करतेचे नीतिशास्त्र' बनले आहे. उपयोजित असणे, या मूलभूत नतिक विचारात व्यापक समाजहिताचा विचार गृहीत असतो, त्याचा बळी द्यावयाचा नसतो. व्यापक समाजहिताशी सुसंगत राहूनच प्रत्येक सामाजिक कृतीची- व्यवसाय, धंदा इत्यादीची नीती रचली पाहिजे. पण समाजहिताचा बळी देऊनच आपापल्या सोयीनुसार व्यवसाय केला गेला की यादवी छेडली जाते.
          आता, सौंदर्यशास्त्रात हा मूल्यसंघर्ष कसा निर्माण होतो, ते पाहू. सौंदर्यवाचक विधान निसर्गविषयक किंवा मानवनिर्मित कलाकृतीबाबत असते, तेव्हा काही बिघडत नाही. पण सौंदर्यवाचक विधान प्रत्यक्ष खुद्द माणसाला लागू केले की ते नतिक विधान बनते आणि संघर्ष सुरू होतो. जसे की 'मुलगी सुंदर आहे' आणि 'मुलगी सुंदर नाही' ही दोन विधाने वरपांगी सौंदर्यविधान दिसत असली, तरी ही व अशा प्रकारची इतर विधाने सौंदर्यवाचक विधान न राहता त्यांचे रूपांतर नतिक विधानात होते. 'मुलगी काळी आहे' हे विधान तर अनतिक विधान बनते. इथे सौंदर्यशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय संघर्ष सुरू होतो. ही मांडणी प्रो. सुरेंद्र बारिलगे यांनी 'मूल्य, मूल्ये आणि मूल्यव्यवस्था' या लेखात केली आहे. त्यांच्या मते, मूल्य ही निखळ मानवकेंद्रित संकल्पना आहे. तिचे आरोपण जग किंवा निसर्गनियम यांच्यावर करता येत नाही.
         खरे तर मूल्य संकल्पनेचे स्वरूप दुहेरी असते. व्यक्तीव समाजाच्या जगण्यात कोणती ना कोणती मूल्ये असतात. या अर्थाने मूल्ये चिरंतन असतात पण त्यांचा स्थलकाल परिस्थितीनुसार आशय बदलत राहतो. या अनिश्चिततेमुळे मूल्ये भ्रामक बनतात. 'वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते' असा 'मूल्याचा भ्रम सिद्धान्त' जॉन लेस्ली मॅकी (१९१७-१९८१) या ऑस्ट्रेलियन तत्त्ववेत्त्याने त्याच्या 'एथिक्स : इन्व्हेिन्टग राइट अ‍ॅण्ड राँग (१९७७) या पुस्तकात मांडला. त्याच्या मते, 'नीतिशास्त्र कुणी तरी (धर्म, प्रेषित, साधुसंत इ. ) आधीच आयते तयार ठेवले आहे आणि आपण ते केवळ शोधून (डिस्कव्हरी) अमलात आणावयाचे आहे, असे कधी नसते. नीतिशास्त्र प्रत्येक काळात नव्याने शोधावयाचे (इन्व्हेन्शन) असते.'
       मॅकीचा नियम सौंदर्यशास्त्रालाही लागू होतो. त्यामुळे 'दलित सौंदर्यशास्त्र' किंवा 'काळ्यांचे सौंदर्यशास्त्र' या संकल्पना आणि साहित्य निर्माण करणे शक्य होते. स्त्रीवादी दृष्टिकोनानुसार पाहता 'व्हॅल्यू'चा अर्थ पुरुषी उन्मत्तपणा किंवा 'पुरुष जे ठरवितो तेच' असा आहे. हे तर संघर्षांचे आणखी तीव्र क्षेत्र आहे.
 
 
 
दोन पत्रे
 
१) गैरसमज वाढविणारे लिखाण - डॉ. प्रशांत बागड भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर येथे तत्त्वज्ञानाचे साहाय्यक प्राध्यापक
 

Wednesday, 16 July 2014

तत्त्वभान २९ सौंदर्यशास्त्र.. केवळ गैरसमज ! १७ जुलै २०१४

Aesthetics, Only misconception!
मोनालिसा ! 

सौंदर्यशास्त्र.. केवळ गैरसमज!
श्रीनिवास हेमाडे

ज्या ज्ञानक्षेत्राच्या उगमापासून केवळ गरसमजच निर्माण झाले असे क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. नीती या संकल्पनेपेक्षा सुंदर ही संकल्पना अधिक दारुण आणि अतिशय क्रूरपणे हत्यार म्हणून वापरली गेली, सुंदरतेचा अस्सल चेहरा भीषण आहे, हा ठळक आक्षेप विसाव्या शतकात घेण्यात आला. तरीही सौंदर्यशास्त्र हा एक विचारविषय म्हणून सर्वप्रियच!

      सौंदर्यशास्त्र (Aesthetics) ही तत्त्वज्ञानाची शाखा आहे. याला सद्भिरुचिशास्त्र, ललितकलांविषयी तत्त्वज्ञान, कलेचे तत्त्वज्ञान (Philosophy of Art) अशी नावे आहेत. तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक विवेक गोखले यांनी 'आभिरौचिकी' अशी संज्ञा सुचविली आहे. 
        'सुंदर' या शब्दाने एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का? असल्यास त्याची व्याख्या करता येते का? त्याचे निकष देता येतात का? म्हणजे (१) कोणत्या गोष्टी सुंदर आहेत? कोणत्या गुणांमुळे त्या सुंदर ठरतात? सौंदर्याचे निकष कोणते? (२) सौंदर्य या संकल्पनेची ताíकक वैशिष्टय़े कोणती? सौंदर्यविधानाचे स्वरूप काय? हे सौंदर्यशास्त्राचे प्रश्न आहेत. 
      कला आणि ज्यात सौंदर्यानुभव आणि सौंदर्यमूल्ये यांचा संबंध येतो त्या परिस्थितीचा अभ्यास सौंदर्यशास्त्र करते. म्हणजे कलेची तात्त्विक चिकित्सा आणि सौंदर्यात्मक प्रतिक्रिया आणि सौंदर्य विधानांचे ताíकक विश्लेषण यांचा अभ्यास यात होतो. कला म्हणजे काय? कलाकृती किंवा निसर्गदृश्य पाहताना ज्या अभिवृत्तीने आपण प्रेरित होऊन पाहतो त्या अभिवृत्तीचे स्वरूप काय? सौंदर्यानुभव म्हणजे नेमका कोणता अनुभव? त्याचे निकष कोणते? कलावस्तूच्या स्वरूपाचे आणि कलास्वादाचे, रसग्रहणाचे स्वरूप व निकष कोणते? स्थलकालसापेक्ष असते की निरपेक्ष असते? कला व नीती, कला व धर्म यांचा संबंध असतो का? याचा अभ्यास सौंदर्यशास्त्रात होतो. 
         हे प्रश्न समीक्षात्मक विधानांच्या व त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांच्या ताíकक स्वरूपाविषयीचे प्रश्न आहेत, हे लक्षात घेतले तर सौंदर्यशास्त्राचे स्वरूप असे होईल : कलाकृती व इतर सुंदर वस्तू यांच्याबद्दल विधाने ही सौंदर्यविधाने असतात. त्यांची चिकित्सा करताना जी विधाने केली जातात, त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांचे ताíकक विश्लेषण करणे हे सौंदर्यशास्त्राचे एक प्रमुख कार्य आहे. 
     सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नाही, त्याचप्रमाणे ते तंत्रविद्याही नाही. म्हणून सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाने माणसाला कलाकृती निर्माण करण्याचे तंत्र कळेल, असे नाही. त्याचप्रमाणे अरसिक माणसाला रसिक बनविण्याचे कार्यही सौंदर्यशास्त्राचे नाही. सौंदर्यशास्त्र हे समीक्षाव्यापारात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांचे, संज्ञांचे, मूल्यविधानांचे, सौंदर्यादी संकल्पनांच्या निकषांचे शास्त्र आहे. ज्या संकल्पनाव्यूहामुळे आपले समीक्षाव्यापार सिद्ध होतात त्याचा संपूर्ण नकाशा आपल्यापुढे उभा करणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य आहे. सौंदर्यविषयक जाणिवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नव्हे, असे समीक्षक रा. भा. पाटणकर अचूकपणे स्पष्ट करतात.
        प्राचीन ग्रीक काळापासून सौंदर्यशास्त्र बरेच निसरडे व वादग्रस्त ठरले. त्यामुळे अनेकांनी कायमच कठोर आणि उपहासपूर्ण टीका केल्या. जे. ए. पसमोर या तत्त्वचिंतकाने Dreariness of Aesthetics सौंदर्यशास्त्रातील भयाणपणा, असा लेख लिहिला, तर सी. डी. ब्रॉडच्या मते हा 'अतिशय कंटाळवाणा.. भंपक विषय' आहे. आयर्विंग बॅबिट हा तत्त्ववेत्ता Nightmare Science - 'भयावह विज्ञान' म्हणतो. 
        विसाव्या शतकाच्या अखेरी भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, मूल्यशास्त्र तसे ललितकला, सिनेमा, फोटोग्राफी, व्हिडीओ आणि इलेक्ट्रॉनिक व संगणकीय कलांचा विकास झाला. परिणामी अनेक स्वयंघोषित सौंदर्यशास्त्रज्ञ जन्माला आले. याचा घातक सामाजिक परिणाम इंटरनेटवरही दिसतो. Aesthetics, Aesthetician , Beauty असे शब्द शोधयंत्राला दिले की ते सुगंधी पावडरी, तेले, फॅशनी, नेलपॉलिश इत्यादी सौंदर्य प्रसाधनांची 'स्थळे' दाखविते. एका अर्थाने ते सौंदर्यशास्त्राची जागा दाखविते. भरीस भर म्हणून ब्युटी पार्लर्सच्या संचालिका स्वत:ला सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणवून घेतात! 
       विशेषत: भाषासमीक्षा आणि सौंदर्यशास्त्र यांचा तोंडवळा सारखा असल्याने तत्त्वचिंतकापेक्षा साहित्यिक आणि भाषेचे अभ्यासक सौंदर्यशास्त्रावर (चिंताजनक) लेखन करू लागले. सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते शिकविण्यासाठी अभ्यासकाला साहित्याचे ज्ञान, समीक्षेचे ज्ञान असणे आवश्यक आहेच; पण वस्तुनिष्ठ संकल्पनात्मक चिकित्सेसाठी तत्त्वज्ञानाचे ज्ञान अनिवार्य असते, याचे भान विसरले गेले. 
     आधुनिकोत्तर काळात सौंदर्यशास्त्राबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला. सौंदर्यशास्त्राचा सुंदर चेहरा बिघडला! विशेषत: मिशेल फुको (१९२६-८४) या फ्रेंच विचारवंताने सौंदर्यशास्त्र हा राजकीय सत्तेचा खेळ आहे, हे सिद्ध केले. परिणामी देरीदा, रिचर्ड रॉर्टी, पॉल डीमॅन यांनी बरेच जोरदार आक्षेप घेतले. सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये दडलेली प्राणी हत्या आणि इतर कुरूपता हा तर भयानक विषय आहे. 
      स्त्रीवादानेही एकूण जागतिक सौंदर्यशास्त्रावर मोठा आक्षेप घेतला. त्यातून Womanism ही स्वतंत्र स्त्री चळवळ अस्तित्वात आली. Womanism म्हणजे काळा स्त्रीवाद. 'काळे तेच सुंदर' ही यांची घोषणा आहे.Feminism म्हणजे गोरा स्त्रीवाद. काळा स्त्रीवाद काळ्या स्त्रीचे दु:ख मांडतेच पण तो काळ्या पुरुषाचेही दु:ख चव्हाटय़ावर आणतो, असा दावा काळा स्त्रीवाद करतो. भारतीय विचारविश्वात हा आक्षेप १९८०च्या दशकात 'दलित सौंदर्यशास्त्रा'चे आव्हान या रूपात आला. ज्ञान, विचार, नीती आणि सौंदर्य या मुख्य तत्त्वांसंदर्भात सूक्ष्म हिंसेचे राजकारण करून ते नेहमी जिंकत राहतात, हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. 
      भारतात सौंदर्यशास्त्राला प्राचीन परंपरा आहे. पण ते संस्कृत साहित्यशास्त्र या नावाने विकसित झाले. सौंदर्यशास्त्र या नावाने नाही. त्यात कलामीमांसा आणि साहित्यमीमांसा दोन्हीचा समावेश होतो. शब्दार्थ विचार, अलंकार, रीती, ध्वनी, वक्रोक्ती, रस या यातील मुख्य संकल्पना असून, भरतमुनी (इ.स.पू. पहिले शतक) ते जगन्नाथ पंडित (१७ वे शतक) असा व्यापक पट या परंपरेचा आहे. पण भारतीय सौंदर्यशास्त्र मूलत: वैदिक आहे, त्यात जैन आणि बौद्ध दर्शने व धर्म यांच्यातील कलाविचारांचा समावेश केला जात नाही. प्राचीन भारतीय मीमांसेत अभिजात संस्कृतीमध्ये आणि केवळ संस्कृत ग्रंथामध्ये ग्रथित झालेलीच मीमांसा येते. त्यात अन्य सांस्कृतिक उपप्रवाहांची मीमांसा अभिप्रेत नाही, अर्थातच ही भूमिका योग्य नाही. आपली साहित्य जिज्ञासा संस्कृतच्या शिवेपाशी खुंटणे हे काही बरे नाही, असे मत प्रसिद्ध विचारवंत व भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांनी व्यक्त केले आहे. 
      मराठीत सौंदर्यशास्त्रावर उदंड लेखन झाले. तो वेगळ्या स्वतंत्र मोठय़ा लेखनाचा विषय आहे. ब्राह्मणी-अब्राह्मणी असा वादही त्यातून निर्माण झाला. पण मराठीतील लेखनामुळे सौंदर्यशास्त्राचे मूळ तत्त्वज्ञानात असताना ते मराठी समीक्षेची मिरासदारी बनली. तत्त्वज्ञानाचा पायाच नसल्याने बहुतेक लेखन ठिसूळ राहिले. मर्ढेकर, शरद पाटील, सुरेंद्र बारिलगे, मे. पुं. रेगे, प्रभाकर पाध्ये, रा. भा. पाटणकर यांच्यापर्यंत लेखनाच्या तात्त्विक पातळीची जाणीव होती, पण नंतर ती दुर्दैवाने राहिली नाही, असे खेदाने म्हणावे लागते. 
     सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या 'त्याचे सौंदर्यवाचक विधान' या विनोदी लेखात सौंदर्यशास्त्राची योग्य टिंगल (आणि टवाळी) केली आहे. त्यांच्या विवेचनात ते काही विधाने करतात आणि त्या प्रत्येकाला एकेक आद्याक्षर देतात. त्यातून अखेरीस एक वाक्य तयार होते. 'एक अक्षर कळलं तर शपथ!' अर्थात पुलंना टवाळीचा विषय तत्कालीन मराठी लेखकांनी अतिशय अवघड लेखन करून दिला, त्यात काही मान्यवरांचाही समावेश आहे.

Sunday, 13 July 2014

तत्त्वभान २८ नीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न ! १० जुलै २०१४



नीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न !
श्रीनिवास हेमाडे
The Good, the Bad and the Ugly
चांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा 'नीतिनिर्णय' करणे हे मोठेच काम ठरते.. आजच्या नीतिशास्त्रात व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजशरणता हे दुमत दिसतेच, परंतु हे झगडे न वाढवता नीतिशास्त्राने स्वतचा शाखाविस्तार कसा केला, हेही दिसते! 
         भारतात धर्म हीच नीती मानली गेली. ती जीवनाची स्वतंत्र क्षेत्रे आहेत, हा फरक केला गेला नाही. त्यामुळे स्वतंत्र नीतिशास्त्र अस्तित्वात आले नाही. धार्मिक व्यक्ती हीच नतिक मानली गेली. आज समाजसेवा व धंदा हे अद्वैत मानून धर्म, मंदिरे, समाजसेवा, जात, लग्न यांचाही व्यवसाय झाला! 
          नीती, नतिकता, नीतिमत्ता या आणि अशा काही संकल्पना माणसाच्या आयुष्यात अतिशय वादग्रस्त ठरत आल्या आहेत. कर्तव्य, जबाबदारी, बंधन, बांधीलकी, त्याग, न्याय, समता, निष्ठा, देशप्रेम, धर्म, धार्मिकता, प्रेम, मत्री, करुणा या काही नतिक संकल्पना आहेत. त्यांच्याविषयी सुसंगत, ताíकक विचार करणे म्हणजे नीतिशास्त्र रचणे असते. नीती हा केवळ आचरणाचा विषय नाही, तो ज्ञानाचाही विषय असतो, याचे भान जागे करणे, ते विकसित करणे, त्याबद्दल सातत्याने चिंतन करणे, नीतिशास्त्रावर संशोधन करणे, हा समाज आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांच्या विकासाचा पाया असतो. 
         नीतीला इंग्रजीत Ethics किंवा Moral Philosophy असा शब्द आहे. Ethics हा प्राचीन ग्रीक भाषेतीली ethos या शब्दापासून बनतो. Ethos म्हणजे सामाजिक चालीरीती, सर्वमान्य वर्तन. तोच Moras या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे माणसाच्या समान वागण्याच्या नियमांना moral म्हटले जाते. संस्कृत किंवा मराठीतील नीती म्हणजे नेणे, नेणारी. पर्यायाने, एका विशिष्ट मार्गाने घेऊन जाणारी नियमावली, असा होतो. 
नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे, असे मानले जाते. चांगले (शिव) म्हणजे काय? ही नीतिशास्त्राची खूप मोठी मूलभूत समस्या आहे. नीतिशास्त्राचे स्वरूप आणि प्रयोजन याविषयी तत्त्ववेत्त्यांमध्ये मूलभूत मतभेद असतात. 
        माणसाचे कल्याण आणि त्याची कर्तव्ये यांच्यातील परस्परसंबंधाचे ज्ञान करून देणे हा नीतिशास्त्राचा हेतू आहे, असे पाश्चात्त्य परंपरेतील प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, एपिक्यूरस, हॉब्ज, स्पिनोझा, बटलर, कांट, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी अभिजात तत्त्ववेत्ते मानतात. अर्थात याचा अर्थ असा नाही, की एखाद्या विशिष्ट माणसाने विशिष्ट प्रसंगी काय करावे याविषयीचा सल्ला देणे, उपदेश करणे हे नीतिशास्त्रज्ञाचे वा नतिक तत्त्ववेत्त्याचे काम असते, पण या प्रकारचे निर्णय ज्या मूलभूत सामान्य तत्त्वांना अनुसरून घेतले पाहिजेत ती विशिष्ट तत्त्वे स्पष्ट करणे आणि त्यांचे प्रामाण्य सिद्ध करणे, हे नीतिशास्त्राचे कार्य आहे. एखादा नीतिमान प्रेषित किंवा प्रतिभावंत कवी माणसाच्या नतिक समस्यांचे मर्म उघड करणारा दृष्टिकोन प्रभावी रीतीने मांडताना अनेकदा आढळतो. नीतिशास्त्रज्ञ तत्त्वांची व्यवस्था लावण्यासाठी पद्धतशीर ताíकक युक्तिवाद करतो, त्याचे समर्थन करतो. असे प्रेषित किंवा कवी करीत नाही. या फरकामुळे नीतिशास्त्रज्ञ प्रेषित किंवा कवी यांच्याहून वेगळा ठरतो. साहजिकच प्रेषिताचा संदेश किंवा कवीची नतिक शिकवण यापेक्षा तात्त्विक नीतिशास्त्राचे स्वरूप वेगळे ठरते. नतिक संकल्पनांचा इतिहास पाहता, नीतिशास्त्राचे चार प्रकार मानले गेले. वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) नीतिशास्त्र, आदर्शवादी (नॉम्रेटिव्ह किंवा प्रिस्क्रिप्टिव्ह) नीतिशास्त्र, अधिनीतिशास्त्र (मेटाएथिक्स), उपयोजित नीतिशास्त्र (अप्लाइड एथिक्स). 
       लोकांच्या नतिकतेच्या श्रद्धा, विश्वास व संकल्पना कोणत्या व कशा स्वरूपाच्या असतात, याचे वर्णन करणे ही वर्णनात्मक नीती. उदाहरणार्थ एखाद्या देशाची जीवनपद्धती पाहून त्यांची नतिकता स्पष्ट करणे. धर्मशास्त्र, धर्मग्रंथ अशा रेडिमेड श्रद्धा देतात. कोणती कृती केली असता लोक आपणास सज्जन म्हणतील, म्हणजेच चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते, हे नीतिशास्त्र स्पष्ट करते. ही परंपरा बनते. यात व्यक्तिस्वातंत्र्य नसते. 
      आता लोकांनी कसे वागले पाहिजे, जीवनात काय प्राप्त केले पाहिजे, याचे नियम बनविणे, त्यानुसार त्यांचे आचरण होते आहे हे पाहणे, ही आदर्शवादी नीती असते. हे नीतिशास्त्र, चांगल्या जीवनाचे स्वरूप कसे असते हे सांगताना, माणसाने कशा प्रकारे जगावे, त्याने काय साधावे, काय करावे हे सांगत असते. व्यवहाराचे मार्गदर्शन, नियमन करणे हे या नीतिशास्त्राचे उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ स्वर्ग, सुख अथवा मोक्ष, निर्वाण, मुक्ती हे जीवनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे माणसाने साधकाचे साधे जीवन अंगीकारावे, ते चांगले, आदर्श जीवन होय. आदर्श सांगणे, कुणी तरी सांगितलेली (प्रिस्क्रिप्शन) नीती पाळणे, हीच नीती. यातही व्यक्तिस्वातंत्र्य नसते. 
      पण आता, चांगले म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित केला तर त्याची चिकित्सा सुरू होते. तार्किक विश्लेषण करून नतिक संकल्पनांचे स्वरूप स्पष्ट करणे हे नीतिशास्त्राचे काम आहे, असे सांगते ते अधिनीतिशास्त्र. व्यवहारात नतिक निर्णय घेताना, स्वत:च्या व इतरांच्या वर्तनाचे मूल्यमापन करताना आपण ज्या संकल्पना वापरतो त्यांचे विश्लेषण व त्यांची व्याख्या करणे, त्यांचे परस्परांमधील संबंध स्पष्ट करणे, या संकल्पनांचे स्वरूप व प्रयोजन निश्चित करताना इतर क्षेत्रांतील (विज्ञान, कला) संकल्पनांहून त्या भिन्न कशा आहेत, याचा शोध घेणे, हे अधिनीतिशास्त्राचे कार्य असते. थोडक्यात, नतिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषेचे तर्कशास्त्र स्पष्ट करणे हे नीतिशास्त्राचे प्रयोजन असते, असे अधिनीतिशास्त्र सांगते. ते नीतीच्या पलीकडे ('मेटा' म्हणजे पलीकडे, 'अधि') जाते. ते केवळ नीती मानत नाही, तर ती नतिक तत्त्वे, नियम का मानावेत, याची त्यापलीकडे जाऊन चर्चा करते, म्हणून तिला अधिनीतिशास्त्र म्हणतात. यात व्यक्तिस्वातंत्र्य असते. जी. ई. मूर या तत्त्ववेत्त्याच्या प्रिन्सिपिया एथिका (१९०३) (Principia Ethica) या ग्रंथाने अधिनीतिशास्त्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. मूरच्या मते, 'चांगले' हे पद आदर्शवादी मानले तर 'चांगले' या पदाचा नेमका अर्थ काय आहे हे स्पष्ट केले पाहिजे. 
      या ग्रंथानंतर लगेचच अमेरिकेत आर्थर हॅडली (१८५६-१९३०) या अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याच्या, १९०७ सालच्या 'सार्वजनिक नीतीची पातळी'(The Standards of Public Morality) या ग्रंथाने उपयोजित नीतिशास्त्राचा पाया रचला. त्याने नतिक जीवनाचा विचार करताना व्यक्तीचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यात फरक केला पाहिजे, त्यानुसार नतिक निकष बनविले पाहिजेत, असा सिद्धांत त्याने मांडला. १९७०च्या दशकात या उपयोजित नीतिशास्त्राला निश्चित आकार आला तो पीटर सिंगर (१९४६-) या तत्त्ववेत्त्याच्या 'अप्लाइड एथिक्स' (१९८६) या ग्रंथाने.
      दुसऱ्या महायुद्धाने युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, नववसाहतवाद, रासायनिक-आण्विक प्रकल्प आदी प्रश्नांना वाचा फोडली. या नीतिशास्त्राने जैववैद्यकीय नीतिशास्त्र, व्यावसायिक नीतिशास्त्र आणि पर्यावरण नीतिशास्त्र या नव्या तीन ज्ञानशाखांना जन्म दिला. गर्भपात, दयामरण, फाशी, आत्महत्या, कामसंबंध, विवाह, युद्ध, माहिती तंत्रज्ञान, संगणक, राजकारण, समाजकारण, प्राणिमुक्ती आंदोलन, मोठय़ा धरणाचे महाप्रकल्प, कामगार संघटना, रासायनिक-आण्विक प्रकल्प, तसेच वकिली, डॉक्टरी, पोलीस-लष्करी, सनदी सेवा, शिक्षण, मुख्य म्हणजे राजकारण ही सारी क्षेत्रे ही राष्ट्रसेवा की धंदा? जागल्या (व्हिसल ब्लोअर) का हवा, हे प्रश्न जास्त उग्र झाले. हे प्रश्न शुद्ध चारित्र्य, सद्हेतू, सदसद्विवेकबुद्धी, परोपकार, आत्मबुद्धी इत्यादींनी सोडविता येत नाहीत, हे उघडच आहे. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व नीतीचे अभ्यासक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते, तत्त्ववेत्ते यांच्या एकत्रित सहकार्याने सोडवावे लागतील, अशी जाणीव या नीतिशाखेने दिली. नीतिशास्त्र अशा तऱ्हेने 'आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा' बनले. यातून माध्यमांचे, उद्योगसमूहाचे, व्यवस्थापनाचे नीतिशास्त्र निर्माण झाले. अशा सगळ्यांना मिळून उपयोजित नीतिशास्त्र म्हटले जाते. तेच आज मूलभूत चिंतनक्षेत्र ठरले आहे, कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे व्यावसायिकीकरण झाले आहे.


Wednesday, 2 July 2014

तत्त्वभान २७ तर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र ०३ जुलै २०१४

तर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र
श्रीनिवास हेमाडे 
आजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य परंपरा आज अंगी बाणवण्याची गरज पटू लागावी.. तर्कशास्त्राचे उचित महत्त्व जाणून ते भारतीय परंपरांना लावून पाहिले, तर काय दिसेल?
           माणूस हा विचार करणारा प्राणी आहे, (मॅन इज रॅशनल अ‍ॅनिमल) ही व्याख्या अ‍ॅरिस्टॉटलने दिली असा एक समज आहे. अ‍ॅरिस्टॉटलचे मूळ शब्द zoon logikon असे आहेत. zoon हा शब्द zoo पासून बनतो. Logikon चा अर्थ 'विचारशील' असा होतो की नाही, हे निश्चित नाही. कारण logikon या संकल्पनेत मन, आत्मा, विश्वातील सुव्यवस्था राखणारी नियंत्रक शक्ती, वैश्विक बुद्धी इत्यादी अर्थ सामावलेले आहेत. अ‍ॅरिस्टॉटलच्या मते माणसाकडे अशी एक बौद्धिक शक्ती किंवा तत्त्वे आहेत की ज्यांच्या साह्य़ाने माणूस जीवनात सुसंगत प्रकल्प राबवितो. या logikon ची सुव्यवस्थित रचना ते Logic.
          इंग्लिशमधील लॉजिक या शब्दाचे भाषांतर म्हणून भारतीय भाषांमध्ये तर्कशास्त्र हा शब्द वापरला जातो. लॉजिक या अर्थाचा प्रत्यय लागूनच बायॉलॉजी, अँथ्रपॉलॉजी, सोश्ॉलॉजी, सायकॉलॉजी, अ‍ॅस्ट्रॉलॉजी, फिलॉलॉजी, मॉर्फोलॉजी असे नवे शब्द किंवा विषयांची नावे बनतात. प्रत्येक ज्ञानशाखा आपले 'लॉजिक' विकसित करूनच आपला संसार करते. तर्कशास्त्र ही तत्त्वज्ञानाची मुख्य शाखा आहे.
         विचार करणे ही कृती म्हणजे जग आणि जगाचे विविध घटक, घटना, नियम, त्यांचा परस्परसंबंध समजावून घेणे असते. पण बेशिस्त विचार म्हणजे विचार नव्हे. विचार करणे, विचारांचे नियम पाळून सत्य व युक्त विचार करणे, योग्य निष्कर्षांला येणे; ही बाब निश्चित कृतीसाठी आवश्यक असते. त्या वेळी विचार कसा करावा, हाच एक विचार होतो आणि त्याचाही विचार करावा लागतो. अशा विचारांच्या नियमांचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र.
         तर्काचे साधे नाव अंदाज किंवा अनुमान. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय घडामोडी किंवा सूर्यग्रहण, हवामान, पाऊसपाणी, दुष्काळ या नसíगक घटनांचे अंदाज आणि महागाई, बाजार, गुन्हेगारी इत्यादी त्यास जोडले गेलेले इतर घटक याविषयी अंदाज व्यक्त केले जातात, पण प्रत्येक अंदाज हा योग्य तर्क असतो, असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्य घटनांचा आधार असतो. अंदाज व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित असतो. तर्क शास्त्रीय असतो; तर अंदाज भावनिक, अशास्त्रीय असतो.
         तर्कशास्त्र हे सत्य आणि युक्त अनुमानांची रचना करणारे शास्त्र असते. साधारणत: अनुमानात काही विधाने सत्य म्हणून स्वीकारलेली असतात किंवा तात्पुरती सत्य मानलेली असतात आणि त्यांच्यापासून इतर काही विधाने निष्पन्न केली जातात. सत्य म्हणून स्वीकारलेल्या विधानांना आधारविधाने म्हणतात आणि आधारविधानांपासून निष्पन्न केलेल्या विधानास निष्कर्ष म्हणतात. अनुमानाचे काही नियम असतात. त्या नियमांचा भंग झाला, तर त्याला 'तर्कदोष' म्हणतात. तर्कदोष करावयाचे नसतात आणि करू द्यावयाचे नसतात. तर्कशास्त्रात अनुमानांच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण करून त्यांच्या स्वरूपाचे विश्लेषण करण्यात येते आणि ही वेगवेगळ्या प्रकारची अनुमाने प्रमाण कधी असतात, प्रामाण्याच्या अटी कोणत्या याची चिकित्सा करण्यात येते.
       तर्कशास्त्राचे साधारणत: तीन प्रकार करता येतात. अ‍ॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र, मध्ययुगातील लॉर्ड फ्रान्सिस बेकनचे (१५६२-१६२६) नवे तर्कशास्त्र आणि एकोणिसाव्या शतकातील आधुनिक किंवा आकारिक तर्कशास्त्र. बेकनच्या तर्कशास्त्राने विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीला जन्म दिला. आधुनिक आकारिक तर्कशास्त्रात प्रामुख्याने गणितात वापरण्यात येणाऱ्या अनुमानांचे विश्लेषण केले जाते. चिन्हांचाही सढळ वापर करण्यात येतो. त्यास 'गणिती तर्कशास्त्र' किंवा 'चिन्हांकित तर्कशास्त्र' म्हटले जाते. या नव्या तर्कशास्त्राच्या तुलनेत अ‍ॅरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राला पारंपरिक तर्कशास्त्र असे नाव दिले गेले. हे सगळे पाश्चात्त्य तर्कशास्त्र आहे. इंग्रजी विद्य्ोचा एक भाग म्हणून पाश्चात्त्य तर्कशास्त्राचा प्रवेश भारतीय शिक्षणव्यवस्थेत विसाव्या शतकात झाला. 
      प्राचीन भारतातही असे अनुमानाचे तर्कशास्त्र विकसित झाले. त्यास अनुमानशास्त्र असे नाव आहे. ते मुख्यत: न्यायदर्शन या वैदिक प्रणालीने मांडले. यात अनुमानांचे स्वरूप, प्रकार व प्रामाण्य यांविषयी सूक्ष्म विचार झाला आहे. अक्षपाद गौतमाने (सु. दुसरे शतक) न्यायसूत्रे लिहिली, असे समजले जाते. इ. स. पू. पाचव्या शतकापासून तो इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंतच्या कालखंडात ती रचली गेली असावीत, असे मानले जाते. न्यायसूत्रांत सोळा विषयांचे म्हणजे पदार्थाचे विवेचन केले आहे. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती व निग्रहस्थान. या पदार्थाचे तत्त्वज्ञान झाल्याने नि:श्रेयस प्राप्त होते, असे म्हटले आहे. न्यायदर्शनाला युक्तिवादाचे शास्त्र म्हणजे न्यायविद्या, हेतुविद्या किंवा न्यायशास्त्र अशीही नावे आहेत. तथापि केवळ न्यायदर्शन म्हणजे भारतीय तर्कशास्त्र असे समजणे चूक आहे. भारतीय तर्कशास्त्रात अवैदिक बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनातील अनुमान विचाराचाही समावेश होतो. पण वैदिक विचारांचा प्रभाव व दबाव इतका जोमदार होता की केवळ वैदिक न्यायदर्शनाला भारतीय तर्कशास्त्र हा दर्जा प्राप्त झाला. प्राचीन भारतात व्याकरण आणि न्यायशास्त्राचे अध्ययन जवळपास सक्तीचे होते.
      भारतात स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला त्या वेळी भारतीय तर्कशास्त्राची जाणीव अभ्यासकांना झाली. आज जागतिक स्तरावर भारतीय तर्कशास्त्राचा जोमाने, अतिशय चिकित्सक, काटेकोर आणि सखोल अभ्यास चालू आहे.
       पण प्राचीन काळापासून भारतीय विचारविश्वाची शोकांतिका अशी की भारतात विचार करणे, ज्ञान निर्माण करणे हे 'साध्य' मानले गेले नाही. ते 'साधन' मानले गेले. अद्वैत वेदान्त आणि मोक्ष हेच भारतीय तात्त्विक विचारविश्वाच्या अग्रभागी राहिले. तर्क करणे, हा बुद्धिभेद समजला गेला. तर्काला प्रतिष्ठा दिली गेली नाही. महाभारतातील यक्षप्रश्न-नाटय़ात यक्ष धर्मराज युधिष्ठिराला प्रश्न विचारतो 'क: पन्था:?' कोणता मार्ग अनुसरावा? धर्मराज उत्तर देतो - 

तर्क: अप्रतिष्ठ: श्रुतय: विभिन्ना:।
न एक: मुनि: यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् ।
महाजन: येन गत: स: पन्था:?

         याचा अर्थ तर्काला प्रतिष्ठा नसते.. आदरणीय लोक ज्या मार्गाने जातात, त्याच मार्गाने जावे. या प्रश्नात ज्ञानाचे साधन असलेला तर्क बाजूलाच राहिला आणि धर्म गूढ बनला. रामायण, महाभारतातसुद्धा तर्काची िनदा आढळते. मनुस्मृतीनुसार जो तर्क करतो त्याला स्वर्गप्राप्ती होत नाही. म्हणून जो तर्काचा आश्रय करेल त्याला बहिष्कृत करावे. 'गंधर्वतंत्र' या ग्रंथानुसार तर न्यायशास्त्राचे अध्ययन करणाऱ्यास शृगालयोनी (कोल्हा) प्राप्त होते. 
      आज, न्यायदर्शनाचा अभ्यास करणे, हे आव्हान मानले पाहिजे. न्यायशास्त्र हे वादविद्य्ोचे कुंपण आहे, त्यात सहजासहजी प्रवेश मिळणार नाही, असे न्यायदर्शनाचे वर्णन केले जाते. काही प्रश्न उपस्थित करता येतील. पाश्चात्त्य तर्कशास्त्राने जसे विज्ञान व वैज्ञानिक पद्धती निर्माण केली तशी भारतीय तर्कशास्त्राने केली का? न्यायदर्शनातील 'जाती' ही संकल्पना आणि प्रत्यक्षातील जातिव्यवस्था यांचा काही संबंध आहे का? उदाहरणार्थ, न्यायदर्शनाच्या मते, जाती हा पदार्थ आहे. जाती संख्येने नेहमी एकच असते आणि नेहमी अक्षय्य असते. न्यायदर्शनाची 'जाती' ही संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेतील जातीस लागू करता येते का? न्यायदर्शनाच्या 'जाती' व्यवस्थेकडे एक प्रारूप म्हणून पाहिले आणि त्याचे उपयोजन प्रत्यक्ष जातिव्यवस्थेशी जोडून पाहिले तर कोणते चित्र मिळेल? कशी मांडणी करता येईल? जाती संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेच्या रचनेचे आणि तिच्या अविनाशीत्वामागील 'छुपे तर्कशास्त्र' मानता येईल काय? आज भारतीय प्रबोधनाचे नवे प्रश्न आणि आंबेडकरवादाचा विस्तार या अर्थाने विचारता येईल.

Friday, 27 June 2014

तत्त्वभान २६ सत्ताशास्त्र ... सत्य म्हणजे ? २६ जून २०१४

सत्ताशास्त्र ... सत्य म्हणजे ? 

श्रीनिवास हेमाडे

विस्मयचकित करणारे विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे 'नासदीय सूक्त' (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले; तिथे शिष्याच्या पात्रतेच्या गाळणीमुळे पुरुषसूक्तातील वर्णव्यवस्थेची अवैज्ञानिक उत्पत्ति स्पष्ट करणारे श्लोक हेच सामाजिक सत्य मानले गेले. आणि येथे वर्णजातलिंग हे उपमुद्दे महत्वाचे ठरले.

       "मग सांग तर, सत्य म्हणजे काय ?" पायलेटने प्रश्न विचारला आणि उत्तरासाठी तो प्रभूपुत्र येशूकडे पाहू लागला. येशू नि:शब्द.हा प्रसंग आहे येशूच्या शिक्षेचा. न्यायनिवाडा करतो तो तत्कालीन रोमन सम्राट टीबेरियस याचा सुभेदार पाँटीअस पायलेट. येशूने दिलेल्या उत्तरावर त्याने केवळ खांदे उडवून येशूचा आणि त्याच्या उत्तराचा उपहास केला. पायलेटचा प्रश्न तात्त्विक असून त्याचे वैशिष्ट्य हे की एका धुरंधर शासकाने तो उपस्थित केला. कुठलाही राजकारणी अशा तऱ्हेचा तात्त्विक प्रश्न; तोही थेट सत्याविषयी कधी उपस्थित करीत नसतो. 
         सत्य म्हणजे जे आहे, असतेच, "जे नाही, असे म्हणता येत नाही" असे. सत्याचे असणे म्हणजे सत्तावत्, सत्तावान असणे. 'सत्' पासून 'सत्ता' शब्द होतो. म्हणून सत्य हीच सत्ता. अस्तित्व हा सत्य या शब्दाचा समांतर शब्द मानला गेला. या सत्तेच्या ज्ञानाची सुव्यस्थित रचना करणे, याचा अर्थ सत्ताशास्त्र रचणे.पाश्चात्य परंपरेत सत्ताशास्त्राला Metaphysics (मेटॅफिजिक्स) अशी संज्ञा आहे. ती ऱ्होडचा अँड्रोनिकस (इ.स.पू.६०) या पंडित ग्रंथपालाने प्रचारात आणली. स्वतः ॲरिस्टॉटल मेटॅफिजिक्सचा उल्लेख 'आदितत्त्वज्ञान' (The First Philosophy), 'प्रज्ञान' (Wisdom), ईश्वरविद्या असा करतो. 
       Metaphysics या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून संस्कृत, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये अतिभौतिकी, अस्तित्वशास्त्र, तत्त्वमीमांसा, अध्यात्मशास्त्र, सत्ताशास्त्र, सद्वस्तूशास्त्र या संज्ञा मराठीत उपयोगात आणल्या जातात. यातील अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्र या विषयी भारतीय मनाचे बरेच स्वतंत्र समज-गैरसमज आहेत. 
        सत्ताशास्त्र ज्यांना सत्य मानते ते दोन प्रकारचे आहे. पहिला प्रकार हा निसर्ग नियम आणि सामाजिक नियमरुपी तत्त्वांचा आहे. दुसरा प्रकार जग, माणूस आणि त्यांचा परस्पर संबंध यांचा आणि त्या संबंधातून व्यक्त होणाऱ्या, पण निसर्गाचा व समाजाचा घटक नसणाऱ्या तत्त्वांचा आहे. त्यांना परतत्त्वे म्हणता येईल. ही सारी तत्त्वे म्हणजे अमूर्त संकल्पना असतात. या सर्वांचा अभ्यास, चिकित्सा हा सत्ताशास्त्राचा विषय आहे. सत्ताशास्त्र तीन सत्ता स्वीकारते: (१) अनुभवास येणारे जग आणि माणसासह सर्व प्राणिजात (२) अमूर्त संकल्पना आणि (३) परतत्त्वे. या तत्त्वांना मान्यता दिली, त्यांचे अस्तित्व स्वीकारले किंवा नाकारले तर काय होईल ? या संकल्पनांना, परतत्त्वांना खरेच अस्तित्व आहे काय? त्यांच्या असण्या-नसण्याचा समाजावर परिणाम काय होईल ? यांचा अभ्यास सत्ताशास्त्र करू पाहते आणि निष्कर्ष मांडते. 
       अनुभवास येणारे जग निसर्ग नियमाने चालते. ते नियम म्हणजे काही मुलभूत भौतिकतत्त्वे असतात. त्यांना गृहीत धरले तरच निसर्ग अभ्यासता येतो, विज्ञान शक्य होते. उदाहरणार्थ, निसर्गात कार्यकारणसंबंध असतो; असे पदार्थ विज्ञान गृहीत धरते. प्रत्येक विज्ञानाची अशी गृहीतकृत्ये असतात आणि त्याप्रमाणे आपल्या विषयाचे वर्णन करण्यासाठी त्यांचा उपयोग ते करीत असते. किंबहुना त्यांचा उपयोग केल्याशिवाय कशाचेही वर्णन करणे, त्याच्याविषयी विधाने करणे अशक्य असते. अशा मूलभूत संकल्पना म्हणजे 'वस्तु' किंवा 'सत्', 'वस्तूप्रकार', 'द्रव्य-गुण', 'कार्यकारणभाव, 'संबंध', 'अवकाश' किंवा 'दिशा', 'काल', 'संख्या' इत्यादी. व्यवहारातील विधाने व वैज्ञानिक विधाने यांना आधारभूत असलेल्या या संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचे आशय, परस्परसंबंध स्पष्ट करणे हे काम कोणतेही विशिष्ट विज्ञान करीत नाही. जसे की 'कार्यकारणसंबंध सत्य आहे काय?' किंवा 'कार्यकारणसंबंध सत्य आहे असे मानायला काय आधार आहे?' असे प्रश्न विज्ञान उपस्थित करीत नाही. हे प्रश्न त्या विज्ञानातील प्रश्न नसतात, तर त्या विज्ञानाविषयीचे प्रश्न असतात. पण स्वतः ते विज्ञान हे प्रश्न सोडवीत नाही. पण ते सोडविले, त्यांची चर्चा, चिकित्सा केली तरच विज्ञान शक्य होते. तेंव्हा अशा सर्व विशिष्ट विज्ञानांना आणि ज्ञानशाखांना आधारभूत असलेल्या गृहीतकृत्यांची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजे तत्त्वमीमांसा. 
       आता, समाज जीवन जगताना माणूस समाज, राज्य, कुटुंब, प्रेम, ज्ञान, आदर्श इत्यादी आणि स्व/ आत्म, (Self), मन, आत्मा (Soul), चैतन्य (Spirit) या संकल्पना वापरतो. विश्वाबद्दल विचार करताना अस्तित्व म्हणजे काय ? त्याचे मुलभूत घटक कोणते आणि त्याचे गुणधर्म कोणते ? हे प्रश्न विचारतो. माणसाचे विश्वाशी काय नाते आहे, हे शोधताना आणि भौतिक जगात कार्यकारण संबंध आढळल्याने या विश्वाचे कारण म्हणून तो धर्म, ईश्वर, परमात्मा, अंतिम सत्य (Ultimate Reality)अशा संकल्पना निर्माण करतो. या साऱ्या संकल्पनांना तो 'सत्य (Real) समजतो. 
      ही तत्त्वे स्वीकारली की चिद्वाद, नाकारली की जडवाद आणि तटस्थ राहिले की अज्ञेयवाद या विचारसरणी निर्माण होतात. ईश्वरवाद, निरीश्वरवाद यातूनच येतात. ईश्वर मानला की मग तो पुरुष की स्त्री की निर्लिंग की उभयलिंग किं बहुलिंगीय ? हे प्रश्न आलेच. सत्ताशास्त्र केवळ अस्तिकांचेच असते असे नव्हे, तर तुम्ही नास्तिक असला तरी तुम्हाला तुमचे नास्तिक सत्ताशास्त्र निर्माण करावे लागते. जसे की, लोकायतांनी इहलोकाचे सत्ताशास्त्र मांडले, हे लक्षात घेतले पाहिजे. 
     सत्य म्हणजे काय ? हा प्रश्न आणि सामाजिक न्याय-अन्याय, शोषण, विषमता यांचा संबंध काय ? असा प्रश्न विचारू. त्याचे इतिहास देतो ते उत्तर असे : परत्त्वांचे ज्ञान ही सर्व समाजाचा हक्क नाही, तो केवळ पात्र शिष्यांना लाभणारा दुर्मिळ हक्क आहे. हे सर्व संस्कृती मान्य करतात आणि येथून विषमतेची बीजे पेरली जातात. भारतात हे अधिक ठळकपणे, जोमदारपणे आणि निर्दयतेने मांडले गेले. वैदिक सत्य म्हणजे केवल ब्रह्म. या ब्रह्मसत्याचे मुख सुवर्णपात्राने झाकलेले आहे, (हिरण्यमये पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् – ईशोपनिषद १५.) ही संकल्पना शिष्याच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित करते. 
      उपनिषद या संज्ञेचा अर्थ "गुरूच्या सान्निध्यात खासगी बैठकीत केलेला गुप्त उपदेश' असा आहे. उपनिषद ग्रंथांमधील उपदेश गुप्त मानल्यामुळे अनधिकारी व्यक्तींकडून त्याचा विपरीत अर्थ लावला जाईल किंवा त्याचा दुरुपयोग होईल म्हणून त्यांच्यापर्यंत तो जाऊ नये, याबाबत विशेष दक्षत घेतली गेली. कठोपनिषदात नचिकेतसच्या बुद्धीची शुद्धता आणि सामर्थ्य यांची कसोटी घेतल्यानंतरच यम त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. साहजिकच तिथे पात्रतेचा मुद्दा, निकष लागू झाला. पात्रापात्रतेचा विचार न करता सर्वांना अंतिम सत्याचे ध्यान देण्याची अनिच्छा केवळ भारतातच होती, असे नाही तर ती सर्वच प्राचीन मानवांमध्ये होती. उदाहरणार्थ "ज्यांना सोने हवे असेल त्यांनी त्यासाठी खणण्याचे श्रम केले पाहिजेत, नाहीपेक्षा त्यांनी तृणांवरच समाधान मानले पाहिजे" असे प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता हेराक्लीटस म्हणतो, असे असे एम. हिरीयण्णा हे तत्त्ववेत्ते नमूद करतात. 
     चार्वाकांचा वगळता सर्व दर्शनांच्या अध्यात्मशास्त्रांनी शोषणाचा पाया रचला. ब्रह्म सत्य असो वा नसो पण भौतिक जगाचे ज्ञान सुद्धा मक्तेदारी बनली. परिणामी आजच्या राजकारणाला 'केवल धर्म-वर्णजातीयवादाचे स्वरूप' लाभले, हेच सत्य समोर उभे ठाकलेले आहे. "सत्य मेव जयते नानृतम / सत्येन पन्था विततो देवयानः" या वचनातील 'सत्य', क्रूसस्थ येशुप्रमाणे केवळ अशोक स्तंभाचे मानकरी ठरले आहे ! 


















Wednesday, 18 June 2014

तत्त्वभान २५ ज्ञानशास्त्र ... नवे आव्हान १९ जून २०१४



ज्ञानशास्त्र ... नवे आव्हान

श्रीनिवास हेमाडे
अर्नेस्ट सोसा १९४० 
ज्ञान कशासाठी? याचे उत्तर 'र्सवकष प्रबोधनासाठी!' असे असले पाहिजे. भारतात अद्यापि प्रबोधनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रबोधनाकडे नेणारे नवे ज्ञानशास्त्र रचले गेले पाहिजे. ज्ञान व माहिती यात नेमका विवेक करून ज्ञानाचे प्रेम विकसित करणाऱ्या शिक्षण क्षेत्राची रचना करणे गरजेचे आहे.
        ज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी उपस्थित केला आणि विविध सिद्धांत मांडले. त्यांचा स्वतंत्र अभ्यास सखोलपणे करता येतो. मानवी ज्ञानाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याला असलेल्या मर्यादा, प्रामाण्याचे निकष, ज्ञानाचा आणि समग्र अस्तित्वाचा संबंध या प्रश्नांचा विचार तत्त्वज्ञानाच्या ज्ञानशास्त्र या शाखेत केला जातो. ज्ञानाची साधने कोणती, ज्ञानाचे स्वरूप काय? ज्ञानाचा निकष कोणता? यथार्थ आणि अयथार्थ ज्ञानातील नेमका फरक काय? पुढे जाऊन 'आपण जाणतो हे कसे जाणतो? म्हणजे एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते, याचे ज्ञान कसे होते?' याचा विचार ज्ञानशास्त्रात होतो. ज्ञान ही मानवी संकल्पना असली तरी ती ईश्वरालाही लागू केली जाते. ईश्वर परम प्रज्ञानी मानला जातो. अर्थात हीसुद्धा मानवी धारणा असते.
         ज्ञानशास्त्र ही ज्ञानविषयक समस्यांचा अभ्यास करणारी तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. इंग्लिशमधील एपिस्टेमॉलॉजी (Epistemology) या संज्ञेचे भाषांतर म्हणून ज्ञानशास्त्र ही संज्ञा उपयोगात आणली जाते. एपिस्टेमॉलॉजी ही संज्ञा जेम्स फेरिएर (१८०८-१८६४) या स्कॉटिश तत्त्ववेत्त्याने प्रथम सुव्यवस्थितपणे प्रचारात आणली. ग्रीक भाषेतीली episteme म्हणजे ज्ञान आणि 'logos म्हणजे शास्त्र. म्हणून Epistemology चा अर्थ ज्ञानशास्त्र. 
        प्राथमिक पातळीवर ज्ञानशास्त्र, मानवी ज्ञानाचे वर्णन आणि मूल्यमापन करताना ज्ञान, भ्रम, प्रत्यक्ष ज्ञान, अनुमान, प्रतीती, विधान, सत्य इत्यादी संकल्पनांचे विश्लेषण करते. त्याचप्रमाणे या संकल्पनांचा आशय स्पष्ट करणे, त्यांचा परस्परसंबंध निश्चित करणे हे कार्य करते. दुसऱ्या पातळीवर विविध विज्ञानांचे स्वरूप, त्यांची ज्ञानविषयक उद्दिष्टे आणि विषय यांनुसार त्या त्या विज्ञानाची पद्धती आणि एकूण विज्ञान या ज्ञानरचनेची सामान्य पद्धती, तिचे प्रामाण्याचे निकष निश्चित करणे, हे काम करते. तिसरे म्हणजे, एखाद्या प्रस्थापित विज्ञानाच्या पद्धती व उद्दिष्टात गरजेनुसार बदल करणे, आणि वेगवेगळ्या विज्ञानांची गृहीतकृत्ये, त्यांच्या पद्धतीचा आधार असलेल्या मूलभूत संकल्पनांचा परस्परसंबंध स्पष्ट करून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे, हेही काम ज्ञानशास्त्र करते. त्यामुळे विविध विज्ञानांची एक सुसंगत व्यवस्था लागते. साहजिकच विज्ञान म्हणजे सुव्यवस्थित ज्ञान, अशी व्याख्या शक्य होते. 
          'ज्ञान' या संकल्पनेचा अभ्यास का करावयाचा? नाही केला तर काय बिघडते? आता पाहा, 'जाणणे' आणि मत, विश्वास, श्रद्धा, समज होणे आणि अंदाज, ठोकताळे यांतील नेमका फरक स्पष्ट करण्याची क्षमता माणसात निर्माण होणे हा कळीचा मुद्दा असतो. वैज्ञानिकांचे निष्कर्ष, वैद्यांचे उपचार, न्यायालयीन कामकाज व अंतिम निर्णय या आणि यांसारख्या सर्व गोष्टी वस्तुस्थितीच्या 'ज्ञानावर' अवलंबून असतात, ठोकताळ्यांवर नाही. त्यासाठी 'ज्ञान' या संकल्पनेची तपासणी करणे गरजेचे ठरते.
          सामाजिक अर्थाने पाहता, आपण जे काही करीत असतो, त्याचे समर्थन कशाच्या आधारे करतो आणि मानवी अनुभव व दृश्य जग याबाबतची सत्ये शोधताना आपण कोणते निकष पुरावे म्हणून स्वीकारले पाहिजेत, यांचा शोध घेणे आवश्यक असते, तो ज्ञानशास्त्रात घेतला जातो. सामाजिकदृष्टय़ा 'ज्ञान होणे' याचेच ज्ञान होणे, हे सुसह्य़ जगण्यासाठी गरजेचे असते. 
ज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न उपस्थित केला गेला तो प्रथम ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने. त्याला सामाजिक व राजकीय आशय लाभला तो आधुनिक प्रबोधन काळात. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे माणसाच्या विवेकशक्तीच्या स्वातंत्र्याची घोषणा आणि त्या शक्तीस दिलेले साक्षात उत्तेजन. 
      आता, विवेकशक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? इमान्युएल कांट (१७२४-१८०४) हा गेल्या सहस्रकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ त्याच्या 'व्हॉट इज एनलायटन्मेंट' (प्रबोधन म्हणजे काय?) या निबंधात म्हणतो की, माणूस विविध दबावांमुळे आपल्या आकलन-सामर्थ्यांचा उपयोग करण्याची पात्रता आणि धर्य गमावून बसतो. पण प्रबोधन हा माणसाच्या विवेकशक्तीचा उद्भव आहे. म्हणूनच कान्टच्या मते, 'स्वत:ची विवेकबुद्धी वापरण्याचे धर्य निर्माण करा!' हीच प्रबोधनाची घोषणा बनते. ही भूमिका मूलत: सॉक्रेटिसने, त्यानंतर होरास (इ.स.पू. ६५-०८) या रोमन कवी तत्त्ववेत्त्याने 'ज्ञान मिळविण्याचे धर्य निर्माण करा' अशा घोषणेतून मांडली. तिचा पुनरुच्चार करून कान्टने तिला प्रबोधनाचे सूत्र हा दर्जा दिला. 
          विसाव्या शतकात पारंपरिक ज्ञानशास्त्राच्या रचनेवर स्त्रीवाद्यांनी आक्षेप घेतला आणि नव्या स्त्रीवादी ज्ञानशास्त्राची संकल्पना पुढे आली. नंतर अन्रेस्ट सोसा (१९४०) या विद्यमान अमेरिकन तत्त्ववेत्ता आणि आघाडीच्या ज्ञानशास्त्रज्ञाने 'सद्गुण दृष्टिकोनवादी ज्ञानशास्त्र' मांडले. यानुसार बौद्धिक सद्गुणांचे ज्ञान हेच खरे ज्ञान. उदाहरणार्थ, कुतूहल, नम्रता, सेवाभाव, मनाचा खुलेपणा, रास्त असण्याचा मनाचा कल, बौद्धिक खंबीरता आणि धर्य. या मांडणीचा पुढे विकास केला तो लिंडा झागजेबस्की (१९४६-) आणि लॉरेन कोड (१९३७-) या अमेरिकन स्त्रीवादी ज्ञानशास्त्रज्ञ विदुषींनी. 
      भारतीय ज्ञानशास्त्र विस्मयकारकरीत्या अत्यंत समृद्ध आहे; पण ते वर्ण-जाती-लिंगभेदात अडकले. भारतात ज्ञानासाठी ज्ञान ही मांडणी कधीही झाली नाही. अपरा-परा विद्या हा भेद स्पष्ट होता. मोक्ष हाच ज्ञानाचा एकमेव उद्देश बनला. ज्ञान आणि मोक्ष दोन्ही खासगी बनले. ज्ञान हा सामाजिक व्यवहार बनला नाही. ज्ञानबंदी हाच मुख्य व्यवहार होता. साहजिकच समाजाला शहाणे करण्याचे कारण उरत नाही. 
परिणामी - 
(१) आज भारतात ज्ञानाला महत्त्वच नसल्याने प्रत्यक्ष जगण्यात ज्ञानी माणसाचे महत्त्व शून्य आहे. 
(२) भारतीय शिक्षणव्यवस्था आणि शिक्षण संस्था ज्ञान देण्याऐवजी माहिती देणारी 'पोपटनिर्माण मॉल्स' बनली. 
(३) शुद्ध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्या व्यक्ती किंवा विचारधारा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात त्यांना येनकेनप्रकारेण शरणागती पत्करायला लावून त्यांच्या मानगुटीवर परतत्त्वाचे भूत बसविले जाते. न्याय-सांख्य, योग-वैशेषिक यांच्याबाबतीत असे दिसते.
(४) माहिती आणि ज्ञान यांतील फरकाचेच ज्ञान नसल्याने समाजात ज्ञानाबद्दलची आसक्ती वाढू शकत नाही. 
(५) ज्ञान व ज्ञानी माणसाला मूल्यच नसल्याने भारतीय प्रबोधन अपुरे राहिले आहे..
..आणखी बरेच काही..! 
          दुसरीकडे समाज शहाणा व्हावा, ही संत ज्ञानेश्वर ते गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची परंपरा ही सामाजिक व राजकीय ज्ञानातून लाभणाऱ्या शहाणपणाची गोष्ट आहे. पण संतांचेही लोक ऐकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. अन्यथा 'वारकऱ्यांची यादवी' लिहिण्याची वेळ आली नसती. आणि संतांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्यांकडून संतटीकेवर बंदी घालण्याची अवैज्ञानिक मागणी झाली नसती. ज्यांनी वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय भारतात कसा होईल, हे पाहिले पाहिजे; त्यांनी विज्ञान, वैज्ञानिक दृष्टी कशी मरेल, संतांचे सामाजिक प्रबोधन कसे रसातळाला जाईल, याकडे लक्ष द्यावे, हे भारतीय जनतेचे केवळ दुर्दैव आहे. नव्हे, हा तर कलियुगीन महिमा म्हणावा, असा वैदिक नियतीवादी सटवाईचा लेख म्हणावा लागेल. 
      म्हणूनच ज्ञानाला मूल्य देणारे नवे इहवादी ज्ञानशास्त्र रचणे आणि त्यावर आधारित शिक्षणव्यवस्था अमलात आणणे हा नवप्रबोधनाचा अजेंडा असला पाहिजे.

      तुकोबांचा 'बुडती हे जन न देखावे डोळा' हा अनंत कारुण्यभाव हे त्याचे अधिष्ठान असावे.


Friday, 13 June 2014

तत्त्वभान १५ मतदात्यांचा मोक्ष




श्रीनिवास हेमाडे 

salvation of voters
आत्मदर्शनाची तळमळ आणि त्यासाठी गीतेतील कर्तव्यकठोरता आचरणात आणण्याची तयारी हे गुण मतदारांमध्ये असतील, तर नागरिकांकडे आधी स्पष्ट मते असतील आणि निवडणुकांचा अर्थ अशा मतांचे दान एवढाच असेल..

        तत्त्वज्ञान किंवा दर्शन कोणतेही असले, कोणत्याही देशात, कोणत्याही काळात विकसित झालेले असले तरी 'जग आणि माणूस समजावून घेणे' ही सर्वसमावेशक व्यापक भूमिका प्रत्येक तत्त्वज्ञानामागे असते. माणूस जिवंत असताना त्या त्या काळातील विद्यमान जगाची रचना, त्याचे स्वरूप आणि पुढील अपेक्षित विकासाची दिशा समजावून घेणे, हा त्या त्या काळातील राजकीय व सामाजिक कार्यक्रम असतो. 
       'मत' म्हणजे केवळ शिक्का मारणे किंवा बटन दाबणे (व्होट) नसते. 'मतदान' ही कृती राज्यकर्ता निवडण्याचे नागरिकाचे आकलन कसे आहे, उमेदवाराचे व्यक्तिगत व सार्वजनिक जीवन नागरिक कसे समजावून घेतो आणि भावी राज्यकर्त्यांविषयी त्याच्या अपेक्षा काय आहेत, तसेच 'लोकशाही' या संकल्पनेचे त्याचे भान असते. ते 'चांगले राज्य', 'चांगले राज्यकत्रे' या संकल्पना स्पष्ट करणारे त्याचे ज्ञान (नॉलेज) असते. विकता येईल, असे ते 'होयबा-मत' नसते. (लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पाकीट-भेट संस्कृतीचे पाईक पत्रकारांनाही हा नियम लागू आहे.) 
लोकशाही जीवनपद्धतीत मतदात्या नागरिकाला हे आकलन नेमके कसे झाले किंवा होत असते; याची जाण तो नागरिक 'मतदान करणे' या कृतीतून व्यक्त करीत असतो. मतदान ही भौतिक जीवनातील दु:खाचा अनुभव कमी करणे आणि सुरक्षित, शांत, प्रगत, समृद्ध जीवनाची खात्री, या ऐहिक उद्दिष्टांसाठी केली जाणारी शुद्ध भौतिक कृती असते. 
       लोकशाहीतील मत म्हणजे असे अनेक घटकांनी बनलेले नागरिकाचे ज्ञान (नॉलेज) अशी संकल्पना मान्य केली तर 'भारतातील बेकारालाच काय पण भिकाऱ्यालाही अशा ज्ञानपूर्ण मतदानाचा अधिकार आहे' हा दावा अभिमानास्पद आहे, हे खरे. पण बेकार असणे, भिकारी असणे, गुन्हेगार असणे, भ्रष्ट असणे, बेवारस वृद्धत्व हे विद्यमान बहुपक्षीय राज्यकारभाराचे फळ आहे आणि त्या कारभाऱ्यांचे आपणा नागरिकांना भोगावे लागणारे कर्मफल आहे, तेच राजकारण आहे, अज्ञान आहे, हे कळत नाही. 'राजकारणाचे यथार्थ भान हे 'दर्शन' किंवा 'तत्त्वज्ञान' म्हणून विकसित होण्यापेक्षा तो निवडक राज्यकर्त्यांचा खेळ मात्र बनतो. 
       विद्यमान लोकशाही जीवनरीत भारतीय दर्शनांमधून निष्पन्न झालेली नाही तर ती ग्रीक-पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञानातून निर्माण झालेली आहे. तिला तत्त्वज्ञानात्मक इतिहास आहे. भारतात तो आयात झालेला आहे, हे भान निर्माण करणे, त्या भानाचे रक्षण करणे किंवा त्यात आपण आपला सहभाग देऊन ते भान अधिक समृद्ध करणे हे 'तत्त्वभान' या संकल्पनेचे स्वरूप म्हणता येऊ शकेल. म्हणजे नेमके काय करावयाचे? तर हे आयात (इम्पोर्टेड) तत्त्वज्ञान समजावून घेणे, त्याचे यथार्थ 'दर्शन' घेणे आणि त्या विचारविश्वाचा 'दार्शनिक' म्हणून आपण स्वत:ला नवे ट्रेिनग देणे आणि ज्ञानयुक्त मतदान करणे. 
      उदाहरणार्थ कर्तव्य ही संकल्पना भारतीय आणि पाश्चात्त्य परंपरेत आहे. 'कर्तव्य म्हणजे काय? ते कसे करावे?' हा प्रश्न श्रीमद्भगवद्गीता उपस्थित करते आणि आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात इमान्युएल कांट (१७२४-१८०४) हा तत्त्ववेत्ताही उपस्थित करतो. ''कर्तव्यपालनात नातेवाईकशाही, घराणेशाहीसारख्या भावनिक घटकांना हद्दपार करावे आणि निखळ धर्मरक्षण करावे, जनहित हाच धर्म मानावा'' हा उपदेश भगवद्गीता करते आणि कांट 'वस्तुनिष्ठ-व्यक्तिनिरपेक्ष केवळ कर्तव्यासाठी कर्तव्य' असा सिद्धांत मांडतो. सद्हेतू हाच कर्तव्याचा हेतू असावा, असे तो सांगतो. 
        वस्तुत: गीतेची कर्तव्यकठोरता कांटच्या 'कर्तव्यासाठी कर्तव्य' या संकल्पनेपेक्षा अधिक सकस मानता येईल. पण भारतीय जनतेच्या विचारविश्वात गीतेतील कर्तव्यकठोरतेऐवजी आत्म्याचे अमरत्व ठाण मांडून बसले. परिणामी इंग्रजी विद्या भारतात आली तेव्हा गीतेवर आधारित कठोर कर्तव्याची संकल्पना भारतीय लोकशाहीत विकसित झाली नाही. उलट पाश्चात्त्य परंपरेतील कांट, रुसो, हॉब्ज, मिल्ल, स्पेन्सर, मार्क्‍स, रॉल्ससारख्या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या विचारांमधून ही संकल्पना आली. हक्क, समता, समृद्धी या सामाजिक व राजकीय मूल्यांचा उदयसुद्धा याच पाश्चात्त्य परंपरेत आहे. त्याचाच प्रतिध्वनी लोकहितवादी, फुले, रानडे, राजा राममोहन राय, आगरकर, शाहू, आंबेडकर, महर्षी िशदे, गांधी ते संत तुकडोजी ते अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्या विचारात ऐकू येतो. 
         श्रीमद्भगवद्गीतेतील 'आत्मा अमर आहे' या तत्त्वज्ञानापेक्षा 'अधर्म करणाऱ्या कुणालाही; मग तो कितीही प्रिय नातेवाईक असला तरी केवळ जनहितार्थ, कसलाही स्वार्थ न बाळगता संपूर्ण अनासक्ती योग साधून, स्थितप्रज्ञ होऊन कर्तव्यकठोरतेने शिक्षा केली पाहिजे,' हे 'दर्शन' घडणे, घडविणे हे लोकशाहीसाठी उपयोजित आहे. हे अनेक तत्त्वभानांपकी एक तत्त्वभान, एखादे 'नवदर्शन' असेल. 
परंपरेत जे चांगले, योग्य व यथार्थ आहे, ते टिकवून ठेवण्याचा आग्रह योग्य आहेच, पण ते योग्य म्हणजे धर्म-जात-िलगभेद नाही किंवा मनुस्मृतीची भलावण नाही; तर उदाहरणार्थ गीतेचा नवा अर्थ शोधणे. भंजाळलेल्या आधुनिक अर्जुनांनी भाऊ धर्माधिकारी यांची 'गीता चिकित्सा' किंवा राजीव साने यांचे 'नवपार्थ हृद्गत' समजावून घेणे, ही तत्त्वभानाची आणखी एक दिशा मानली पाहिजे किंवा कर्तव्य कसे करावे यासाठी सुब्रतो रायसारख्या बेमुर्वत दु:शासन व दुर्योधनांना धडा शिकविणाऱ्या के. एम. अब्राहम, सी. बी. भावे यांसारख्या सनदी अधिकाऱ्यांकडे पाहता येईल. 
         अद्वैत वेदान्तच स्वीकारायचा असेल तर गांधीजींचा मोक्ष स्वीकारणे ही आधुनिकता आहे. 'आत्मकथा'च्या प्रस्तावनेत ते म्हणतात, 'ज्याच्यासाठी तीस वष्रे माझी धडपड चालली आहे ते आहे आत्मदर्शन, माझा मोक्ष! माझी सर्व हालचाल याच दृष्टिकोनातून चालते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मनोभावे पडतो ते मोक्षासाठी!' गांधीजी गीतेकडे याच कर्तव्यभावनेने पाहतात. 
        शेकडो संप्रदायांमध्ये मिसळून गेलेल्या देशभरातील करोडो मतदात्यांचा मोक्ष कोणता? 'हे पाहा, आत्मा अमर आहे, असे मानणारे कोर्टात का जातात, हे मला कळत नाही,' असे सॉक्रेटीस म्हणतो. आत्मा अमर असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाईट वाटण्याचे कारण नाही. अन्नसुरक्षेचा आग्रह धरण्याचे कारण नाही. त्यामुळे अमर आत्म्यापेक्षा जिवंत शेतकऱ्यांची, मतदारांची, नागरिकांची काळजी घेणारे राजकारण करणे, हा साऱ्यांचा मोक्ष असेल. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं' हे शेतीचे तत्त्वज्ञान असेल. 
        या आयात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची मिसळण आपल्या संस्कृतीत कशी झाली, ती आणखी उपयुक्त कशी ठरेल असे पाहता येईल. पारंपरिक भारतीय आचारविचार आणि अनुभवविश्वात 'भारतीय ख्रिस्ती दर्शन' अथवा 'भारतीय इस्लाम दर्शन' असा नवा विचार प्रस्थापित झाला तरच भारतीय संस्कृती 'जल्प-वितंड-वाद' ही परंपरा जपणारी, नवा 'संवाद' साधणारी 'विश्लेषक' उदारमतवादी, सहिष्णु लोकशाही आहे; असे यथार्थ रीतीने म्हणता येईल.
       धर्माच्या रक्षणाचे कंत्राट घेणाऱ्या, कंत्राट हाच धर्म समजणाऱ्या लोकप्रतिनिधीपेक्षा अस्सल लोकशाहीचे रक्षण-संवर्धन हाच धर्म मानणारे आधुनिक धार्मिक नेते निवडण्याचे 'दार्शनिक शहाणपण' वास्तवात आणणे, हेही नवे तत्त्वभान आहे. हे तत्त्वभान ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेत आहे; ते तत्त्वज्ञान ही आपली आजच्या काळात जगण्याची चौकट आहे, म्हणून त्याचा परिचय आवश्यक आहे.
      अर्थात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाच काय, पण कोणत्याही तत्त्वज्ञानाचा अथवा कशाचाही अभ्यास न करता अत्यंत सुखाने जगता येईल. पण ती निवड (तत्त्ववेत्ता जॉन स्टुअर्ट मिलचे शब्द वापरायचे तर..) 'सुखी डुक्कर की असमाधानी सॉक्रेटीस?' अशापैकी ठरेल.


तत्त्वभान १४ प्रज्ञानाचे प्रेम ०४ एप्रिल २०१४



प्रज्ञानाचे प्रेम

श्रीनिवास हेमाडे 
love of Philosophy
ज्ञान-अज्ञानाच्या सीमांचा अभ्यास करणाऱ्या, नैतिक बंधनांचा आग्रह का महत्त्वाचा आहे हे बदलत्या परिस्थितीत पुन्हापुन्हा स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि विचार व कृती यांचा संबंध बुद्धी, आकलन, सामान्य धारणा व अंतर्दृष्टी यांच्याशी कसा आहे हे पडताळणाऱ्या शास्त्राचा 'प्रेमा'शी काय संबंध, हे कळले की 'फिलॉसॉफी'हा शब्द परका वाटत नाही..
       'तत्त्वज्ञान' असे ज्याचे भाषांतर केले जाते, त्या इंग्लिशमधील Philosophy या संज्ञेचा उगम प्राचीन ग्रीक विचारात आहे. Philosophy हा शब्द Philo + Sophia असा समासातून बनतो. Philo म्हणजे Love आणि Sophia म्हणजे शहाणपण. म्हणून Love of Wisdom = Philosophy. मराठीत 'शहाणपणाचे प्रेम' म्हणू. आणि Philosopher = Lover of Wisdom - 'शहाणपणाचा प्रेमिक.' 'शहाणपण' या शब्दासाठी 'प्रज्ञान' हा शब्द उपयोगात आणू. 
       काही जणांच्या मते मूळ ग्रीक शब्द Philosophie असा असून तो इंग्लिशमध्ये Philosophy असा बनला आणि फ्रेंच भाषेत Philosophie असाच राहिला. प्रबोधनकालीन फ्रेंच विचारवंतांसाठी philosophe असा वापरला गेला. बाराव्या शतकात filosofie असाही शब्द प्रचलित होता. नवव्या शतकानंतर अरबी जगतात ग्रीक तत्त्वज्ञानाचा; अ‍ॅरिस्टॉटलचा प्रवेश झाला. तेव्हा अरबी भाषेत philosophie चा उच्चारों'Falsafa असा झाला. falasifa हे त्याचे भाषांतर. अरबी भाषेत The Philosopher म्हणजे फक्त अ‍ॅरिस्टॉटल, हे मत आजही कायम आहे. 
       Philosopher आणि Philosophy हे शब्द पायथागोरसने (इ.स.पू. ५७० ते ४९५ अंदाजे) शोधले. त्याचे शिष्य हेरॉक्लीडस, पाँटिकस, डायोजिनीस लॉरेटियस यांच्या लेखनात हे उल्लेख आहेत, असे सिसिरो हा (इ.स.पू. १०६-४३) हा इतिहासकार, तत्त्ववेत्ता म्हणतो. पण प्रज्ञानाचे प्रेम या अर्थाने Philosophein हा शब्द पायथागोरसच्या आधी सर्वप्रथम अथेन्सचा राजकारणी धुरंधर नेता पेरिक्लीस (इ.स.पू. ४९३ ते ४२९) याने वापरल्याचे युसिडीसिस (इ.स.पू. ४४३..) या ग्रीक इतिहासकाराचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने Philosophia हाही शब्द उपयोगात आणला गेला, असे अभिजात प्राचीनकालाचे इतिहासकार व प्राचीन ग्रीसचे अभ्यासक विद्यमान अमेरिकन तत्त्ववेत्ता रॉबिन ओस्बर्न (१९५७--) यांचे मत आहे. 
      पायथागोरसने Philosophy = Love of Wisdom असे समीकरण करण्यामागे एक कारण होते. त्या काळातील ऑलिम्पियाड स्पध्रेत भाग घेण्यासाठी येणाऱ्यांचे तीन प्रकार पायथागोरसने केले. नफाप्रेमी व्यापारी लोक (निम्न दर्जाचे), सन्मानप्रेमी स्पर्धक लोक (मध्यम दर्जाचे) आणि प्रज्ञानप्रेमी प्रेक्षक, साक्षीलोक (उच्च दर्जाचे). पशासाठी जगणाऱ्या आणि त्यासाठी जीवघेणी स्पर्धा करणाऱ्या माणसांच्या जगाकडे व बदलत्या विश्वाच्या पसाऱ्याकडे तटस्थतेने पाहणाऱ्या साक्षी प्रेक्षकाला पायथागोरस Philosopher म्हणतो. त्यांना जाणवणारे प्रज्ञान दैवी असते. 
       व्युत्पत्ती पाहता, 'प्रेम' या कृतीबाबत फार शंका उरत नाही, कारण ती एक भावनिक बाब आहे. प्रश्न उपस्थित होतो तो kwisdoml (Sophia) ची व्याख्या कशी आणि कुणी करायची याबाबत. (कोणत्याही संस्कृतीत खरे तर इथूनच सत्तेचे राजकारण सुरू होते.) 
        ग्रीकांच्या मते 'प्रज्ञान'चे दोन अर्थ. दैवी प्रज्ञान आणि मानवी प्रज्ञान. दैवी प्रज्ञान याचा अर्थ ईश्वराचे प्रज्ञान. हे विश्व प्रचंड, अवाढव्य असून त्यातील नियम, ही ईश्वरी निर्मिती आहे. विश्वात एक अंतर्गत सुसंगती, सुमेळ आहे. विश्वाचे स्वरूप गणिती आहे. विश्वाची रचना, निर्मिती पाहता त्यासाठी आवश्यक असणारे गुण व क्षमता केवळ ईश्वरातच असू शकते. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सम्राट, निर्मिक, चतन्यमय, उदात्त स्वरूप हेच ईश्वराचे प्रज्ञान आहे.
         'प्रज्ञान' मिळविण्याची क्षमता माणसात नसते. प्रज्ञान हा दैवी गुण असल्याने माणूस प्रज्ञानी असत नाही आणि ईश्वरासह विश्वाची अंतिम सत्ये भव्य असून त्याची ज्ञानप्राप्ती करून घेणे माणसाला शक्य नाही. मग माणूस काय मूर्ख आहे काय? ग्रीकांच्या मते माणूसही प्रज्ञानी आहे, पण त्याचे स्वरूप वेगळे आहे. 
        मानवी प्रज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करताना ग्रीकांनी प्रज्ञान आणि बुद्धिमत्ता (Wisdom & Intelligence) यात फरक केला. बुद्धिमान माणूस चालता बोलता विश्वकोश असेल पण तो प्रज्ञानी असेल असे नाही. प्रज्ञानी असणे म्हणजे नीतिमान असणे. बुद्धिमान असूनही एखादा माणूस दुष्ट असू शकतो. उलट तो अत्यंत पद्धतशीरपणे दुष्टपणा करतो. प्रज्ञानी माणूस बुद्धिमान असतोच, पण तो नीतिमानही असतो. नीती ही प्रज्ञानाची अट असते. परिणामी एखादा निरक्षरही प्रज्ञानी असू शकतो. सॉक्रेटिस, रामकृष्ण परमहंस, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बहिणाबाई. 
       मानवी प्रज्ञानाचे स्वरूप काय? मानवी प्रज्ञान दोन रीतींचे आहे. पहिली रीत : स्वत:च्या ज्ञानाची मर्यादा जाणणे. माणसाच्या क्षमतांच्या तुलनेत ईश्वर, विश्व व विश्वातील नियम, घटना याबाबतचे त्याचे ज्ञान मर्यादित आहे. त्यात जन्ममृत्यूच्या अज्ञानाची भर आहे. तेव्हा अज्ञानाचे ज्ञान ही मर्यादा कबूल करण्याची विनम्रता हेच माणसाच्या प्रज्ञानी असण्याचे प्रसादचिन्ह आहे. हे भान असणारे ते खरे प्रज्ञानाचे प्रेमिक असतात. या अर्थाने ग्रीक परंपरेतील पहिला प्रज्ञान प्रेमिक म्हणजे थेल्स (इ.स.पू. ६२४ ते ५४६).
       ही भूमिका नंतर सॉक्रेटिसने अधिकृत बनविली. तो म्हणतो 'मी असा विचार करीत नाही, की जे मला माहीत नाही, ते मला माहीत आहे' (do not think, that I know ; what I do not know ) वेगळ्या भाषेत ग्रीकांच्या मते प्रज्ञानाचा पहिला विषय 'अज्ञान' हाच असला पाहिजे. 
      दुसरी रीत : प्राचीन ग्रीकांसाठी प्रज्ञान म्हणजे सद्गुण. प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे सद्गुणांचे प्रेम हा अर्थ सॉक्रेटिस आणि प्लेटो यांनी उपयोगात आणला. न्याय, शहाणपण, धर्य आणि संयम हे चार प्रमुख पायाभूत (काíडनल व्हच्र्यु) पारंपरिक ग्रीक सद्गुण सत्ताधिकाऱ्यांत असले पाहिजेत, असे नतिक बंधन प्लेटो घालून देतो. अ‍ॅरिस्टॉटल मात्र घटनेचे कारण जाणणे या वैज्ञानिक अर्थाने प्रज्ञान हा शब्द वापरतो. 
       सोळाव्या शतकापासून वैज्ञानिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीनंतर तत्त्वज्ञानाच्या संकल्पना बदलत राहिल्या. अनेक तत्त्ववेत्त्यांनी आणि तात्त्विक विचारप्रणालींनी आपआपल्या काळाशी सुसंगत अर्थ देण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत ग्रीक अर्थानुसार ईश्वरास अस्तित्व आहे, पण अनेक निरीश्वरवाद्यांनीही आपापल्या व्याख्या केल्या. ज्ञान, अनुभव, आकलन, सामान्य धारणा आणि अंतर्दृष्टी यांचा उपयोग करून विचार करण्याची आणि कृती करण्याची क्षमता, ज्ञानाची चिकित्सा, तर्कशुद्ध मांडणी, समर्थन आणि विचारातील खुलेपणा हा विसाव्या शतकातील 'प्रज्ञान'चा अर्थ आहे.
       प्रज्ञान म्हणजे 'ज्ञानाची र्सवकष ताíकक चिकित्सा' या अर्थाशी आणि प्लेटोच्या सद्गुण संकल्पनेशी जुळणारी प्राचीन भारतीय संकल्पना म्हणजे 'आन्वीक्षिकी विद्या.' आचार्य कौटिल्याने (इ.स.पू. ३७५ - २२५ अंदाजे) 'अर्थशास्त्र' या प्राचीन ग्रंथात हिचे (अध्याय २.१ : विद्यासमुद्देश) स्वरूप स्पष्ट केले आहे. आन्वीक्षिकी, त्रयी (तीन वेदांचे ज्ञान), वार्ता (शेती, व्यापार) आणि दंडनीती (प्रशासन) अशा चार विद्यांचा उल्लेख करतो. आन्वीक्षिकी म्हणजे सांख्य, योग आणि लोकायत ही तीन दर्शने. सर्व विद्यांना मार्गदर्शक असणारी ही विद्या आहे, असे आचार्य स्पष्ट करतात! 
      विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'प्रज्ञान'चे अर्थ कोणते? या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. तरीही उत्तर-आधुनिकतेची (postmodernity) जाणीव असे एक उत्तर देता येईल. अर्थात कोणती उत्तर-आधुनिकता, हे निश्चित करावे लागेल. चित्रकलेच्या प्रांतात शमन आर्ट्स (shamanarts) या कलापंथाची उद्गाती ज्युडी गार्डनर (Judy Gardner) 'उत्तर-उत्तर-उत्तर- आधुनिकतेचा जाहीरनामा' मांडू पाहते. एम. एफ. हुसेन भारताबाहेर मरण पावतो आणि त्याचा मृतदेह मायभूमीत त्याच्या जन्मगावी पंढरपुरी आणता येत नाही, ही आधुनिक मुक्त विचारांची भारतीय उत्तर-आधुनिक शोकांतिका ठरते. अर्थात, भारतीय विचारविश्वाने आधुनिकताही अद्यापि धडपणे व्यक्तिगत आणि सामाजिक-राजकीय जीवनात आणलेली नाही. त्यामुळे शोकांतिका असण्यातही आपणास बरीच प्रगती करावयाची आहे.

तत्त्वभान १३ तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान आणि दर्शन २७ मार्च २०१४


श्रीनिवास हेमाडे 
आदि शंकराचार्य आठवे शतक 

'तत्त्वज्ञान', 'फिलॉसॉफी' आणि 'दर्शन' हे शब्द अनुक्रमे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांत जणू एकाच अर्थाने आज वापरले जातात.. व्यवहारात ते ठीकही असेल; पण 'फिलॉसॉफी'ची आणि 'दर्शनां'ची जडणघडण पाहता त्यांना या एकाच (त्रिभाषा) सूत्रात सहजगत्या ओवता येत नाही, हे समजेल. दर्शन आणि तत्त्वज्ञान हेही एकमेकांचे प्रतिशब्द नाहीत, हे शक्यतोवर सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा या लेखाचा उद्देश!

       इंग्लिशमधील Philosophy या शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आणि आधुनिक काळात Philosophy चा सर्वमान्य पर्यायी शब्द म्हणून 'तत्त्वज्ञान' हा शब्द सर्व वैचारिक क्षेत्रात स्वीकारला गेला आहे. ग्रीक तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वज्ञान, सामाजिक तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, पर्यावरणाचे तत्त्वज्ञान इत्यादी शब्द या अर्थाने येतात. 
          संस्कृत भाषेतून मराठीत अथवा अन्य भारतीय भाषांमध्ये 'तत्त्वज्ञान' या संज्ञेला दर्शन, ब्रह्मज्ञान आणि दर्शनशास्त्र हे आणखी काही पर्याय मानले गेले आहेत. त्यांनाही बऱ्याच वेळेस Philosophy या शब्दाचे मराठी भाषांतर मानले जाते. कल्ल् Philosophy, ही Western Philosophy यांचे भाषांतर ग्रीक दर्शन, पाश्चात्त्य दर्शन असे केले जाते. उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्टय़ात 'दर्शन विभाग' म्हणजे department of philosophy असे वापरले जाते. हे सारे शब्दव्यवहार वरकरणी चुकीचे वाटत नाहीत. 
          मात्र philosophy आणि 'तत्त्वज्ञान' या समानार्थक संज्ञा नाहीत. त्या संकल्पना तात्त्विक आहेत. पण त्यांचे अर्थ वेगळे आहेत. त्यांच्यात समान धागा गृहीत धरून त्यांना समान अर्थ दिला गेला आहे. philosophyहा शब्द मराठीत 'फिलॉसॉफी' असे लिहिणे हा भाषिक दृष्टीने इंग्रजी शब्दाचा उच्चार लिहिणे असा होईल. हे 'लिप्यंतर' ठीक आहे, पण 'फिलॉसॉफी' या मराठी उच्चाराचे भाषांतर म्हणून 'तत्त्वज्ञान' असे होत नाही. हा बारीक भेद लक्षात घेणे आवश्यक असते. 
          आता केवळ 'तत्त्वज्ञान' हा वेगळा सुटा शब्द घेतला तर त्याला खास विशिष्ट भारतीय पारिभाषिक अर्थ आहे. 'तत्त्वज्ञान' या शब्दाला भारतीय संदर्भात दर्शन, ब्रह्मज्ञान आणि दर्शनशास्त्र हे पर्यायी संस्कृत शब्द आहेत. ते खास देशी शब्द असून त्यांनाही विशिष्ट अर्थ आहेत. त्यांचे अर्थ समान नाहीत, पण परस्परपूरक आणि परस्परात गुंतलेले आहेत. 
        तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचे ज्ञान. तत्त्व हा शब्द 'तत्' म्हणजे 'ते' धातूपासून बनतो. या 'तत्'चे 'असणे' हे 'तत्त्व' आणि त्या 'तत्त्वा'चे ज्ञान ते तत्त्वज्ञान. हा समान अर्थ वैदिक िहदू विचारसरणीत आहे. त्यानुसार तत्त्व म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप, त्याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. पदार्थ म्हणजे समग्र अस्तित्व- जग व माणसे. जगाचे व माणसाचे साररूप जाणणे म्हणजे तत्त्व जाणणे; ते तत्त्वज्ञान. न्यायदर्शनात (वात्स्यायन १.१.१) तत्त्वज्ञान पदाची व्याख्या केली आहे : 'तत्' म्हणजे 'सत्' व 'असत्.' या दोन्हींचे यथार्थ व अविपरीत स्वरूपातील ज्ञान होणे, हे 'तत्त्व' होय. या अर्थाने कोणत्याही वस्तुस्थितीचे अथवा पदार्थाचे यथार्थ ज्ञान- ती जशी आहे तशीच समजणे म्हणजे तत्त्वज्ञान होय. वस्तुस्थिती म्हणजे असणे वा नसणे, याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. अशा सोळा तत्त्वांचे किंवा पदार्थाचे ज्ञान झाले की मुक्तिमार्ग खुला होतो. (तत्त्वज्ञानाद् दु:खान्त्योछेदलक्षणं..) 
         आदी शंकराचार्याच्या मते, 'तदति सर्वनाम सर्व च ब्रह्म तस्यनाम / तद् भावस्तत्वं ब्रह्मणो याथात्म्यम' म्हणजे 'तत्त्व हे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे विश्वातील सर्व पदार्थाना लागू पडणारे तत्त्व. ब्रह्म व्यापक असल्याने सर्व पदार्थाना व्यापून आहे. म्हणून त्याचे 'तत्' हे नाव. थोडक्यात 'तस्य भाव: तत्त्वं.' त्याचे ज्ञान तेच ब्रह्मज्ञान. (पण पुढे मी म्हणजे ब्रह्म किंवा 'मी नाहीच, ब्रह्मच' असे रूपांतर होते. ते आत्मज्ञान हेच तत्त्वज्ञान बनते.) 
      'दर्शन' ही 'तत्त्वज्ञान' या शब्दाप्रमाणेच विशिष्ट रचना आहे. 'दर्शन'चा साधारण अर्थ भेटणे, कधी तरी भेटणे म्हणजे 'दर्शन अलभ्यम्.' दर्शनचा मूलार्थ दृष्टी. संस्कृत 'दृश' धातूपासून 'दर्शन' संज्ञा बनते. 'दृश'पासून 'दृश्य' शब्द तयार होतो. जे दिसते तो पाहण्याचा विषय = 'दृश्य', ते पाहणारी व्यक्ती = द्रष्टा आणि या द्रष्टय़ाला जे दिसते ते 'दर्शन.' तेव्हा हे दर्शन 'घेतो' तो दार्शनिक. 
       'दर्शन'चा हा अर्थ लक्षात घेऊन 'योग्य अधिकारी साधकापुढे तात्त्विक विचार स्वत:हून प्रगट होऊन त्यास दर्शन देतात, अशी श्रद्धा बनली. प्राचीन ऋषींची अशी धारणा होती की मंत्र त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात - 'ऋषिर्दशनात्.' (सर्वदर्शन संग्रह - पं. र. प. कंगले). येथे 'दर्शन'चा अर्थ विचार सुचणे, स्फुरणे असा घेतला पाहिजे. हे दर्शन दोन प्रकारे आले असावे. भारतीय दर्शनांची रचना अनेक शतके होत होती. त्यामुळे आधीच्या काळात काव्यात्म रूपात स्फुरलेले प्राथमिक विचार आणि नंतरच्या काळात त्यांना जाणीवपूर्वक दिलेले सुव्यवस्थित काटेकोर रूप, असे दोन अर्थ 'दर्शन'चे करता येतील. दर्शनांची सुव्यवस्थित मांडणी केली की त्यांना 'शास्त्र' म्हणतात. ते जाणतो तो शास्त्री, दार्शनिक. अशी मांडणी पूर्ण झाली की 'दर्शन' किंवा 'तत्त्वज्ञान' या संकल्पनेची परिपूर्ण व्याख्या तयार होते. ती म्हणजे 'जग आणि मानवी जीवनाकडे विचारपूर्वक पहिले असता चिंतकाला जाणवणारे त्यांचे स्वरूप म्हणजे दर्शन किंवा तत्त्वज्ञान.' 
         माणसाला पाच ज्ञानेंद्रिये असली तरी कोणत्याही ज्ञानेंद्रियापेक्षा डोळा हे सर्वात विश्वसनीय म्हणून सत्याच्या जवळ जाणारे इंद्रिय असल्याने 'दर्शन' महत्त्वाचे मानले गेले. यासाठीच 'चक्षुर्वैसत्यम' किंवा 'चक्षुर्वै प्रतिष्ठा' म्हणतात. वरील अर्थ पाहता 'तत्त्वज्ञानसाधनशास्त्रदर्शनम्' म्हणजे 'तत्त्वाचे ज्ञान होण्याला साधन असे शास्त्र म्हणजे दर्शन' असे म्हटले आहे. दर्शनालाच बौध दर्शनात 'दिठ्ठी' म्हटले आहे. 
         असे दर्शन प्रत्येकाला वेगवेगळे झाले. अशा विविध दृष्टिकोनांची चर्चा करते ते दर्शनशास्त्र होय. त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करता येत नाही. त्यामुळे चार्वाक दर्शन नीच आणि अद्वैत वेदान्त (नुसतेच श्रेष्ठ असे नाही तर) सर्वश्रेष्ठ असे म्हणणे चूक आणि दिशाभूल करणारे आहे. पण भेदनीती केली गेली. आणि भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा वेदान्त; म्हणजे 'अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान' असे एक लाडके समीकरण बनविले गेले. पण 'भारतीय तत्त्वज्ञान' ही एक पुन्हा व्यापक संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ 'अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान' हे कितीही लाडके समीकरण असले तरीही हे समीकरण हे 'तत्त्वज्ञान' या संकल्पनेच्या अनेक अर्थापकी एक अर्थ आहे. 
         'भारतीय तत्त्वज्ञान' या संकल्पनेत िहदू वैदिक तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान व जैन तत्त्वज्ञान या तीन मोठय़ा विचारविश्वांचा समावेश होतो. आणि खुद्द 'िहदू वैदिक तत्त्वज्ञान' या संकल्पनेत न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा अशा आणखी पाच विचारसरणी येतात. अद्वैत वेदान्त हे सहावे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ 'अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान' हे कितीही लाडके समीकरण असले तरीही ते चुकीचे ठरते. केवळ एकाच्याच नावाने आपले थोर तत्त्वज्ञान जगात ओळखले जावे, हा आपणच पसरवत असलेला गरसमज आहे. उलट प्रस्तुत लोकशाही जीवनपद्धतीनुसार आज 'भारतीय तत्त्वज्ञान' ही संकल्पना आणखी व्यापक करणे गरजेचे आहे. 
      पाश्चात्त्यांना Philosophy या शब्दातून काय म्हणावयाचे आहे आणि भारतीय चिंतन विश्वात त्या अर्थाशी समान असणारा विचार कोणता आहे, ते पुढील लेखात पाहू.