ब्लॅकमेलिंगचे
नीतिशास्त्र
श्रीनिवास हेमाडे
एखाद्याची अनैतिकता उघड करू शकणारी माहिती क्रयवस्तू मानून विकणे.. म्हणजे त्याआधारे पैसा मिळवत राहणे, हे प्रकार 'ब्लॅकमेलिंग'मध्ये मोडतात. माहिती असणे किंवा ती विकली जाणे यात गैर नाही. मग गैर काय? अनैतिक काय, याचा शोध घेणारे उपयोजित नीतिशास्त्रातील हे प्रकरण आहे..
'ब्लॅकमेलिंग' ही अर्थशास्त्रीय व नीतिशास्त्रीय अभ्यासातील एक संकल्पना आहे. उपयोजित नीतिशास्त्र ज्या अनेक नव्या वादग्रस्त व गुंतागुंतीच्या नैतिक संकल्पनांचा शोध घेते, त्यात ब्लॅकमेलिंग ही अतिशय नाजूक स्वरूपाची आहे. अनैतिक समजल्या जाणाऱ्या अतिखासगी कामसंबंधापासून काळा पसा, देशाचा सरंक्षण व्यवहार ते इतिहासाची रचना, धर्म आणि तत्त्वज्ञान या खुल्या व्यापक क्षेत्रापर्यंत; एखादी व्यक्ती ते समाजातील हितसंबंधी गट, संघटना, पक्ष इत्यादींकडून ब्लॅकमेलिंगचा आज यथेच्छ वापर होतो. त्यामुळे या संकल्पनेची चर्चा होणे आवश्यक आहे.
Blackmail या शब्दामधील Black चा मूळ अर्थ 'काळा' असा नसून सरंक्षण देणे असा आहे. आणि mail चा अर्थ पत्र, टपाल असा नसून 'खंडणी देणे' असा आहे. जुन्या लॅटिनमधून इंग्लिशमध्ये आलेल्या bla-ich चा अर्थ सरंक्षण देणे. mail चे मूळ फ्रेंच maille म्हणजे विशिष्ट प्रकारचे नाणे किंवा पैसा. mail चे मूळ male मध्ये आहे, पण male (पुरुष नव्हे तर) म्हणजे एखाद्याचे देणे देऊन टाकणे. mail चा अर्थ टपाल असा होतो खरा, विस्तारित अर्थ टपाल ठेवले जाते ती पिशवी, त्यात पैसेही असायचे (मनीऑर्डर). त्यामुळे mail म्हणजे पशाची पिशवी (Wallet). म्हणून mail चा अर्थ पसे देणे, खंडणी देणे. या अर्थानेच Blackmail हा नवा शब्द सोळाव्या शतकात रूढ झाला.
पंधराव्या-सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये काही स्कॉटिश पुढारी जमीनदार, ग्रामस्थ यांच्याकडून पेंढारी, दरोडेखोरांपासून 'संरक्षण शुल्क' या नावाखाली वसुली करीत. खरे तर हे पुढारी पेंढाऱ्यांचे हस्तक होते. ही वसुली अन्नधान्य, गुरेढोरे, मांस-मटन, कापडचोपड या स्वरूपात असे. त्याचवेळी राजे, उमराव इत्यादी पातळीवर चांदीची देवघेव किंवा चांदीच्या नाण्यांमध्ये व्यवहार होत असे. चांदी पांढरी तर वसुली आणि सर्वसामान्य लोकांची आपसातील देवघेव मात्र पांढरी नसलेली म्हणून काळा व्यवहार होता. तो राजमान्य म्हणजे शासनमान्य नव्हता. विशेषत: वसुलीचे वर्णन करण्यासाठी Blackmail हा शब्द बनविला गेला. दरोडेखोरांच्या 'संरक्षण शुल्क' या काळा व्यवहारामागे दमदाटी, अत्याचार, हत्या ही प्रमुख कारणे होती. नंतर अठराव्या शतकात Male अर्थ लेखी करार, कायदा, समिती, कौन्सिल असा मानला गेला. काही करार करावयाचे नाही, या अर्थाने न करण्यासारखे करार (black mayle - Blackmail) हे त्यांचे स्वरूप होते.
थोडक्यात, Blackmail म्हणजे दमदाटीची बेकायदा वसुली. या व्यवहारात वसुली 'घेतली' जात असे आणि सरंक्षण 'दिले' जात असे. घेणे-देणे या प्रक्रियेत वसुली करणाऱ्यांच्या बाजूने पाहता जे घेतले जाई ते भौतिक, मूर्त वस्तू असे, तर त्यांच्याकडून (वसुली करणाऱ्यांच्या बाजूने) जे दिले जाई ते 'अमूर्त' असे. ब्लॅकमेल किंवा ब्लॅकमेिलग ही अर्थशास्त्रीय घटना असल्याने ती प्रामुख्याने कायद्याच्या अभ्यासात अभ्यासली जाते. पण तिच्यात गुंतलेल्या बहुस्तरीय नतिक आयामामुळे ते बौद्धिक कोडे बनले आहे. नैतिक हत्या, आत्म्याचा खून, अधम अपराध अशा शब्दांत या कृत्याची िनदा केली जात असली तरी तिचे स्वरूप निश्चित करणे कठीण आहे. रोनाल्ड कोएसे या अर्थतज्ज्ञाच्या मते ''पोर्नोग्राफीची व्याख्या करता येणे जसे कठीण आहे, तशी ब्लॅकमेिलगची व्याख्या करता येणे कठीण आहे. पण तुम्ही ब्लॅकमेिलगची कृती पाहता तेव्हा तुम्हाला ती कृती ब्लॅकमेिलगची आहे, हे जाणवते.''
ब्लॅकमेलिंगची चिकित्सा हा गुन्हेतज्ज्ञ, कायदातज्ज्ञ, नैतिक तत्त्वज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि मुख्य म्हणजे अर्थतज्ज्ञ यांनी केला पाहिजे असा आंतरविद्याशाखीय अभ्यास बनतो. नैतिकदृष्टय़ा ब्लॅकमेलिंग हा गुन्हा आहे की नाही, हा मुद्दा नसून तो का आणि कशाच्या आधारे गुन्हा का होतो, हे महत्त्वाचे आहे. रसेल ख्रिस्तोफर या अभ्यासकाने Meta-Blackmail या त्याच्या निबंधात प्रदीर्घ चर्चा केली आहे. जेफ्री मर्फी, फाईनबर्ग, रॉबर्ट नोझिक, विनित हक्सर, वॉल्टर ब्लॉक, रॉबर्ट वूल्फ, पीटर वेस्टर्न, रिचर्ड पाँझर, रसेल हार्डिन, होम्होल्त्झ, लॉरेन्स फ्रीडमन, मायकेल गोर इत्यादी अनेकांनी यावर प्रचंड अभ्यास केला आहे.
ब्लॅकमेिलगची रचना आणि परिभाषा चमत्कारिक आहे. यात किमान दोन घटक असतात. ब्लॅकमेलर आणि ज्याला ब्लॅकमेल केले जाते ती व्यक्ती किंवा संस्था (आज 'पक्ष'). ब्लॅकमेलर काही मागणी करतो आणि काही देऊ इच्छितो. जे मागतो ते पसे आणि जे देतो ती असते गुप्त माहिती. पसे न दिल्यास माहिती उघड करण्याची धमकी हा तिसरा घटक, मागणी पूर्ण झाली तर स्वत: मौन बाळगणे, माहितीचे पुरावे देऊन टाकणे हे आश्वासन असते. आता, यातील मागणी, गुप्त माहिती, मौन बाळगणे, आश्वासन आणि धमकी या संदिग्ध संकल्पना आहेत.
ब्लॅकमेलिंगच्या या रचना आणि परिभाषा यांच्या स्वरूपामुळे ब्लॅकमेलिंगबाबतीत विरोधाभास निर्माण होतो. विशेषत: लोकशाही आणि भांडवलशाहीच्या उदयानंतर हा विरोधाभास निर्माण झाला. यात व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, मुक्त बाजारपेठ इत्यादीमुळे ब्लॅकमेिलगमध्ये गुन्हेगारी शोषण आणि खुली व्यापारी स्वरूपाची देवघेव, दोन्ही ठरली. म्हणजे असे : लोकांना सत्य माहिती देण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला (ब्लॅकमेलरला) आहे, सत्य जाणण्याचा लोकांचा हक्क आहे. ती दिली की ज्यांच्याविषयी (ब्लॅकमेल होणारी व्यक्ती) ती आहे त्यांचे चारित्र्यहनन होईल, प्रतिष्ठा जाईल, त्यांची अनैतिकता उघडकीस येईल. मग ही माहिती विकली तर पसा निर्माण होईल, नीतीचे रक्षण होईल, सन्मान राखला जाईल. शिवाय मौन, गुप्तताही बाळगली जाईल! माहितीला बाजारपेठ आहे, ती क्रयवस्तू आहे.
खुल्या बाजारपेठेच्या नियमानुसार ब्लॅकमेलिंग हा आर्थिक व्यवहार आहे. त्यात गुप्तता, शांतता व पैसा यांचा व्यवहार होतो. ब्लॅकमेलर पशाच्या बदल्यात सुरक्षितता, गुप्तता यांची ऑफर देतो, तसे वचन देतो. मागणी पूर्ण झाली तर वचनबद्ध राहतो आणि ती फेटाळली गेली तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क बजावतो, माहिती जाहीर करतो. बाजारगप्पा आणि ब्लॅकमेलिंग यात फरक हाच आहे की गप्पा थांबविता येत नाहीत, शिवाय त्या रोगासारख्या पसरतात. निदान ब्लॅकमेलर गप्प बसतो. आता निवड अनैतिक, बेकायदा वर्तन करणाऱ्याने करावयाची आहे.
याचे सुलभीकरण असे :
दारू पिणे कायद्याने गुन्हा नाही,
गाडी चालविणे हाही गुन्हा नाही.
उलट या दोन्हीसाठी शासकीय परवाना मिळतो.
पण दारू पिऊन गाडी चालविणे मात्र गुन्हा कसा ठरतो? दोन गोष्टी स्वतंत्रपणे केल्या की कायदेशीर, नैतिक व शुभ्र- पवित्र आणि त्याच एकत्र केल्या की बेकायदा, अनैतिक, काळ्या -अपवित्र? हे कसे ठरते? कोणाला अधिकार आहे?
याप्रमाणे फुकट माहिती देणे हे नैतिक आणि एक वस्तू म्हणून तीच माहिती विकली की अनैतिक? जर माहितीला बाजारमूल्य असेल तर विकली पाहिजे. न विकता नुकसान का करून घ्यावे? शिवाय विकली तर मौन बाळगण्याचे वचन आहेच. मग ती विकणे हा गुन्हा का? ते अनैतिक का ?
याबाबत स्वतंत्रतावादी विचारवंत, मार्क्सवादी विचारवंत, पारंपरिक नीतिवादी आणि भांडवलशाहीवादी असा संघर्ष घडतो. स्वातंत्र्य हे भांडवलशाहीचेच अपत्य असल्याने स्वतंत्रतावादी व भांडवलशाहीवादी यांची बाजू एक होते. नीतिवादी नीती महत्त्वाची मानतात तर मार्क्सवादी भांडवलशाहीलाच ब्लॅकमेलिंगचे एक रूप मानतात. लेनिनने तर Political Blackmail या नावाचा निबंधच लिहिला होता.