व्यवसायाचे नीतिशास्त्र
श्रीनिवास हेमाडे
व्यवसाय आणि धंदा एकत्र आले की त्यांच्या मिसळणीतून नवेच प्रश्न निर्माण होतात. मालकाला धंदा हवा असतो आणि व्यावसायिक असलेल्या नोकराला अधिक वेतन हवे असते; कारण त्याला मालकाचा नफा दिसत असतो; पण नफ्याच्या प्रमाणात वेतन देण्याची मालकाची इच्छा नसते. इथे नैतिक संघर्ष आणि इतर व्यवस्थापनाचे संघर्ष निर्माण होतात.
औद्योगिक क्रांतीनंतर युरोपीय राष्ट्रात चार गोष्टी घडल्या. उद्योग-धंद्यामुळे अनेक व्यवसायांचा आणि त्याला आधारभूत असलेल्या अनेक ज्ञानक्षेत्रांचा उदय झाला. तसेच प्रत्येक ज्ञानक्षेत्राचे विशेषीकरण झाले आणि बहुतेक सारी ज्ञानक्षेत्रे परस्परावलंबी बनली. परिणामी त्यानुसार वागण्याचे नियमही बनवावे लागले. या विशेषीकरण आणि परस्परावलंबीत्वामुळे नीतीच्या संकल्पनांचेही विशेषीकरण झाले, त्या संकल्पना परस्परावलंबी होत गेल्या. हा वेग युरोपीय राष्ट्रात जोमदार होता. त्याचा ज्ञानक्षेत्रीय परिणाम म्हणून व्यावसायिक नीतिशास्त्र उदयास आले.
मराठीत व्यवसाय आणि धंदा हे दोन शब्द इंग्लिशमधील Business या शब्दाचे भाषांतर या अर्थाने वापरण्याची प्रथा आहे. पण नेमका अर्थ निश्चित करावयाचा झाल्यास व्यवसाय आणि धंदा यात फरक करणे आवश्यक ठरते. त्यासाठी दोन-तीन गोष्टी कराव्या लागतात. पहिली, ज्या औद्योगिक संस्कृतीतून या संकल्पना विकसित झाल्या आहेत त्यानुसार व्यवसाय आणि धंदा यात फरक करणे. दुसरे, हे दोन शब्द केवळ फरक करता येणारे आहेत, असे वेगळे शब्द नसून त्या एकमेकांपासून वेगळ्या करता येण्याजोग्या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत, हे लक्षात घेणे. तीन, आपण मराठीत विचार करीत असल्याने त्यांचे जास्तीत जास्त अचूक भाषांतर करता येईल, असे पाहणे. ही कामे झाल्यानंतर त्यांच्या नीतीशास्त्राची रचना कशी केली जाते, त्याचा आढावा घेणे.
या लेखात आपण 'व्यवसाय' हे Profession चे आणि 'धंदा' हे Business चे भाषांतर या अर्थाने उपयोगात आणू. तसेच Professional म्हणजे व्यावसायिक आणि म्हणजे Business करतो तो धंदेवाईक, असे वापरू. मराठीतील या संबंधीचे तज्ञांचे लेखन मात्र 'व्यवसायाचे नीतिशास्त्र' असे उपलब्ध असून ते Professional Ethics आणि Business Ethics या दोन्हीचे भाषांतर या अर्थाने आले आहे.
Business Ethics या नावाने जी काही इंग्लीशमधील संदर्भ पुस्तके, पाठ्यपुस्तके आणि इतर साहित्य पाहता आणि त्यांचे मराठीकरण करण्याचा प्रयत्न पाहता Profession आणि Business या दोन्ही शब्दांचे अर्थ Business अशा अर्थाचे निश्चित आणि मराठी भाषांतर 'व्यवसाय' असे केल्याचे आढळते. त्यानुसार Business Ethics अशी भाषिक रचना होते आणि तसे लेखन होते.
वस्तुतः एका भाषेतून दुसऱ्या भाषेत संकल्पनांचा प्रवास होताना संदर्भ बदलतो आणि साहजिकच अर्थही बदलतो. तो सर्वमान्य असतोच नाही. शिवाय भाषांतरीत भाषेत अनेक पर्यायी शब्द असतात, त्यांचे आकलन सुद्धा अनेक तऱ्हेने होत असते. ही सापेक्षता लक्षात घेतली तर अशा वादग्रस्त संकल्पनांचे भाषांतर ही 'इंद्रधनुष्यी कसरत' (rainbow exercise) ठरते. आपण केले आहे ते बरोबर आहे, असे वाटते पण स्पष्ट करता येईल, अर्थांची, त्यांच्या विविध छटांची निश्चित विभागणी दाखविता येईल, याची खात्री नसते. पण त्याचवेळी ते मोहक दिसते. नेमके हेच हा विषय मराठीत शिकविताना घडतो. विशेषतः प्रश्नपत्रिका रचताना हमखास गोंधळ होतो.
Profession आणि Business यात फरक काय? तो असा : ज्यात या ना त्या स्वरुपात एक अथवा अनेक व्यक्तिकडून केवळ सार्वजनिकहिताची सेवा दिली जाते किंवा अपेक्षित आहे ते Profession आणि ज्यात मालक किंवा भागधारकांना आर्थिक लाभ मिळावा, हाच एकमेव उद्देश आहे तो Business.
व्यावसायिक माणूस (Professional) ज्या क्षेत्रात काम करतो त्या व्यवसायानुसार त्याने कोणते नीतीनियम पाळावेत याचे निकष ठरविते ते व्यावसायिक नीतीशास्त्र. ज्याने काही कौशल्ये प्राप्त केली आहेत, त्यांचा वापर कसा करावा याचे ज्ञान त्यास आहे आणि या कौशल्ये व ज्ञानाचा वापर केवळ 'सार्वजनिक हित' या उद्दिष्टासाठी करतो; त्यांच्या आधारे करीत असलेल्या कामात तो एका निश्चित निष्कर्षाप्रत येऊ शकतो, त्यास व्यावसायिक म्हंटले जाते. हे काम सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. कारण ही कौशल्ये आणि ज्ञान त्याच्याकडे नसतात. व्यावसायिकास याचा मोबदला मिळतो पण तो निश्चित नसतो. व्यावसायिकाकडे प्रामाणिकपणा, सचोटी, पारदर्शकता, विश्वासार्हता, आत्मविश्वास, कायदापालनाची प्रवृत्ती, निष्ठा, आदर हे गुण असावेत अशी अपेक्षा असते. डॉक्टर, शिक्षक, सुतार, पत्रकार, वकील किंवा लोकप्रतिनिधी-मंत्री ही काही उदाहरणे.
या उलट धंद्यात कौशल्यापेक्षा निव्वळ नफा हेच उद्धिष्ट असते, नफा मिळत नसेल तर धंदा बंद करता येतो, दुसरा सुरु करता येतो. धंदेवाईक माणूस केवळ भांडवलाच्या आधारे धंदा करतो. तो तज्ञ व्यावसायिकाला नोकरीला ठेऊ शकतो, त्याच्या कौशल्याचा व ज्ञानाचा उपयोग करून तो नफा मिळवितो. नफेखोरीच्या धंद्यात नीतिनियमांचा प्रश्न येत नाही. पण व्यवसाय आणि धंदा एकत्र आले की त्यांच्या मिसळणीतून नवेच प्रश्न निर्माण होतात. मालकाला धंदा हवा असतो आणि व्यावसायिक असलेल्या नोकराला अधिक वेतन हवे असते; कारण त्याला मालकाचा नफा दिसत असतो; पण नफ्याच्या प्रमाणात वेतन देण्याची मालकाची इच्छा नसते. इथे नैतिक संघर्ष आणि इतर व्यवस्थापनाचे संघर्ष निर्माण होतात.
वस्तुतः Business Ethics हे Professional Ethics चा उपविभाग म्हणून निर्माण झाले आहे. पण या दोन्हींचा तोंडवळा इतका सारखा आहे की त्यात फरक करणे गुंतागुंतीचे झाले. परिणामी युरोपीय-पाश्चात्य राष्ट्रात Business Ethics चाच अभ्यास प्रामुख्याने होतो आणि Professional Ethics हे अॅकेडेमिक चर्चाविश्वापुरते उरले. Business Ethics ही संज्ञा कोण कसा वापरेल, त्यावर त्याचे आकलन अवलंबून राहाते आणि त्या आकलनाचा चांगला-वाईट परिणाम एकूण नैतिक वर्तनावर होतो, असे मत रिचर्ड टी. डी. जॉर्ज या अभ्यासकाने व्यक्त केले आहे.
साधारणपणे Business Ethics चे विश्लेषण तीन पातळ्यांवर केले जाते. पहिली - उद्योगसमूह ज्या व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक परिसरात उभारले जातात त्यातील स्थानिक मूल्ये कोणती ते तपासणे आणि मुक्त बाजारपेठेची उचीतता लक्षात घेता व्यापक मानवी न्याय व सामाजिक कल्याण या मूल्यांशी त्या स्थानिक मुल्यांची सांगड कशी घालावी. दुसरी - खासगी उद्योगसमूहानी बनविलेल्या नीतिनियमांच्या आधारे एकूण उद्योगसमूहांचे नैतिक वर्तनाचे निकष कोणते, यांची थेट पारदर्शी तपासणी करणे; तिसरी - एखाद्या विशिष्ट व्यावसायिक संस्थेतील किंवा उद्योगसमूहातील व्यक्तींचे हक्क आणि त्यांच्या नैतिक बांधिलकीचे स्वरूप कोणते ?
व्यापार जितका जुना आहे तितकेच त्यासंबंधीची नैतिक नियमावली प्राचीन आहे. हम्मुराबी राजाचे नियम (इ.स.पु. १७००), अॅरिस्टॉटलचे नियम (इ.स.पू. ३२२..), ज्यू-ख्रिश्चन परंपरेतील 'देवाच्या दहा आज्ञा' मधील नियम, कौटिल्याचे नियम (इ.स.पु. ३००) हे लोकांचे एकमेकांशी व्यावसायिक नाते कसे असावे याचे निर्देश देतात. पण अॅकेडेमिक अभ्यास विषय म्हणून याचा अभ्यास सुरु झाला तो विसाव्या शतकात. १९८७ मध्ये अमेरिकेचे सिक्युरिटीज अँड एक्सेंज कमिशनचे प्रमुख जॉन शड यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूलला जवळपास तीन मिलियन डॉलर (अंदाजे १८ अब्ज २८ कोटी) ची देणगी असा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी दिली. आज अमेरिका- युरोपात अनेक बिझिनेस स्कूल आणि तत्त्वज्ञान विभागात हा अभ्यासक्रम अगदी जोरात चालू आहे.
प्राचीन भारतात आपापल्या व्यवसाय, धंद्यानुसार वागणे हेच नीतीने वागणे, हा नैतिक नियम होता. व्यवसाय हा जातीचा घटक होता. परिणामी बारा बलुतेदारीचे अर्थशास्त्र मांडताना व्यवसायाचे नीतिशास्त्र मांडण्याऐवजी जातीचे नियमशास्त्र मांडण्यात आले. तिने व्यावसायिक नीतिशास्त्राची भृणहत्या केली.